कोयत्याने हात तोडणाऱ्यांना ठोकल्या बेड्या, कोल्हापुरात पोलिसांची मोठी कारवाई

कोल्हापूर : ग्रामसभेत झालेल्या वादातून एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करत त्याचा मनगटापासून हात तोडणाऱ्या संशयितावर उंब्रज पोलीस ठाण्यात ७ मे रोजी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील चौघे गेल्या दिड वर्षांपासून उंब्रज पोलिसांना चकवा देत होते, मात्र पोलिसांनी(police) त्यांचा पाठलाग सोडला नाही. अखेर पसार असलेले संशयित कोल्हापुरच्या ताराराणी चौकात वावरत असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरिक्षक रविंद्र भोरे यांच्या पथकाने त्यांच्यावर झडप टाकत बेड्या ठोकल्या. उंब्रज येथून वेगाने कोल्हापुरला जात चौघांचा शोध घेऊन फिल्मी स्टाईलने अटक केली.

पोलिसांकडून(police) मिळालेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील इंदोली येथे मे २०२३ रोजी ग्रामसभा झाली होती. ग्रामसभेत झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भांडणांमध्ये झाले. यातून दिनांक ७ मे २०२३ रोजी इंदोलीतील गुन्ह्यांतील जखमी अधिक शंकर नागमले यांचा मनगटामधून हात तुटला अन् ते कायमचे जायबंदी झाले.

याप्रकरणी उंब्रज पोलिसात नयन निकम, जीवन ज्योतीराम शिंदे, दीपक दत्तात्रेय लोकरे, तुषार पंडित निकम, प्रज्वल तुकाराम निकम, दीपक दत्तात्रेय लोकरे, अविनाश बाबुराव निकम (सर्व रा. इंदोली, ता. कराड), शुभम उर्फ प्रेम सुरेश कदम (रा. उंब्रज) यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

पोलिसांनी तत्काळ काही हल्लेखोरांना ताब्यात घेतले, मात्र जीवन शिंदे, दीपक लोकरे, प्रज्वल निकम, अविनाश निकम गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झाले होते. उंब्रज पोलिसांनी गोपनीय पाळत ठेवत संशयितांच्या शोधासाठी प्रयत्न सुरूच ठेवले होते.

पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी प्रलंबित गुन्ह्यातील संशयितांना तत्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर पसार असलेल्या गुन्हेगारांना शोधण्यासाठी वारंवार बैठका घेऊन सापळा रचण्यास मार्गदर्शन करत होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक रविंद्र भोरे यांनी पसार हल्लेखोर संशयितांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी फिल्डींग लावली.

२२ आक्टोंबर रोजी त्यांना गोपनीय माहितीदाराकडून इंदोली गुन्ह्यातील चौघे कोल्हापुरात ताराराणी चौकात वावरत असल्याची माहिती मिळाली. पोलीस अधिक्षक समीर शेख, अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रविंद्र भोरे यांचे पथक वेगाने कोल्हापुरकडे रवाना झाले.

कोल्हापुरात सायंकाळी सातच्या सुमारास ताराराणी चौकात उंब्रज पोलीस स्टेशनच्या पथकाने सापळा रचला. संशयितांना पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागताच त्यांनी गर्दीचा फायदा घेत पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र डोळ्यात तेल घालून सज्ज असलेल्या उंब्रज पोलिसांनी गर्दीतच संशयितांचा पाठलाग करून चौघांवर वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी झडप टाकली. त्यांना अटक करून उंब्रजला आणण्यात आले. त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत असून, बुधवारी चौघांनाही कराड न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायलयाने सुनावली आहे.

दिड वर्षापासून पसार असलेले संशयित त्या काळात नेमके कोठे राहिले? त्यांना कोणी आश्रय दिला? ते पसार असलेल्या काळात त्यांना अर्थपुरवठा कोणी केला? या सर्व प्रश्नांची चौकशी होणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी दिली.

हेही वाचा :

धक्कादायक! 85 विमानं बॉम्बने उडवण्याची धमकी

मुन्नाभाई 3 कधी येणार? संजय दत्तने अखेर मौन सोडलं

आता तर हद्दच झाली! तरूणाचा उलटे बसून बाईक चालवण्याचा स्टंट; व्हिडिओ व्हायरल