दिल्लीला कामगिरीत सुधारणेची आशा! आज लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान

लय मिळवण्यासाठी झगडणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स (delhi capitals)संघासमोर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या सामन्यात आज, शुक्रवारी लयीत असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान असेल.


लखनऊ : लय मिळवण्यासाठी झगडणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स (delhi capitals)संघासमोर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या सामन्यात आज, शुक्रवारी लयीत असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान असेल. या सामन्यात लखनऊच्या फलंदाजांसमोर दिल्लीच्या गोलंदाजांचा कस लागणार आहे.
लखनऊच्या संघाने यंदाच्या हंगामाची दमदार सुरुवात केली असून या सामन्यात त्यांचेच पारडे जड मानले जात आहेत. लखनऊच्या संघाचे चार सामन्यांत सहा गुण झाले असून ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत. दिल्लीला पाच सामन्यांत केवळ एकच विजय मिळवता आला आहे. त्यामुळे दोन गुणांसह ते गुणतालिकेत तळाला आहेत. स्पर्धेतील आपले आव्हान टिकवून ठेवायचे झाल्यास दिल्लीला कामगिरी उंचावण्याशिवाय पर्याय नाही.लखनऊच्या फलंदाजीची भिस्त क्विंटन डिकॉक आणि केएल राहुल या सलामीवीरांवर असेल. डिकॉकने आतापर्यंत दोन अर्धशतकी खेळी केल्या आहेत.


दिल्ली कॅपिटल्सला गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. त्याआधीच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने त्यांचा १०६ धावांनी धुव्वा उडवला होता. त्यामुळे त्यांना खेळात मोठी सुधारणा करावी लागणार आहे. दिल्लीच्या संघाची सर्वाधिक निराशा त्यांच्या गोलंदाजांनी केली आहे. खलील अहमद आणि अनुभवी ईशांत शर्मा यांना धावा रोखण्यात अपयश आले आहे. आनरिक नॉर्किएला दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर चमक दाखवता आलेली नाही. विशेषत: अखेरच्या षटकांत तो महागडा ठरतो आहे. तो कामगिरी उंचावतो का, याकडे सर्वाचे लक्ष असेल. कर्णधार ऋषभ पंत आणि ट्रिस्टन स्टब्स सोडल्यास दिल्लीच्या फलंदाजांनाही यंदा चमक दाखवता आलेली नाही. त्यामुळे या दोघांवर दिल्लीच्या फलंदाजीची मदार असेल. पृथ्वी शॉने मुंबईविरुद्ध चांगली खेळी केली. त्याने सातत्य राखणे आवश्यक आहे.

हेही वाचा :

भारतीय संघातील सीता आणि गीता कोण आहे? विराट कोहलीने केला खुलासा

गुगलचं यूजर्सना खास गिफ्ट! फोटो एडिटिंगचे एआय टूल्स सगळ्यांना मिळणार मोफत

शरद पवारांनी डाव टाकलाच! ‘हा’ नेता घेणार तुतारी हाती; पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला