लाडक्या बहिणींसाठी फडणवीसांचा ‘श्रावण प्लान’

लोकसभा निवडणुकीत राज्यात अपयश आल्यामुळे महायुतीने विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. यासाठी महिला मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी श्रावणाच्या पवित्र महिन्यात एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

श्रावण महिन्यातील सोमवारांना विशेष महत्त्व असते. श्रावणातील सोमवारी भाविक मोठ्या संख्येने शिव मंदिरांमध्ये जातात. यात महिलांचे प्रमाण मोठे असते. श्रावणातील सोमवारी उपवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. त्यामुळे श्रावणी सोमवारांचे महत्त्व अधोरेखित होते. याच बाबीचा विचार करून उपमुख्यमंत्री फडणवीसांनी श्रावणातील दर सोमवारी शिव मंदिरांमध्ये ‘मेरा वचन, मेरा शासन’ या बॅनरखाली एक नवे आश्वासन देणार आहेत. या माध्यमातून राज्यातील जवळपास ४ कोटी महिलांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या उपक्रमाद्वारे भाजप महिलांशी थेट संवाद साधणार आहे.

भाजपसाठी महिला मतदार नेहमीच महत्त्वाच्या राहिल्या आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट देताना महिलांना प्राधान्य दिले होते. भाजपचे १०५ उमेदवार विजयी झाले, त्यात १२ महिला होत्या. हा पॅटर्न कायम राखण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. गेल्या दशकभरातील निवडणुकांमध्ये महिला मतदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. महिला मतदारांच्या वाढत्या संख्येचा फायदा भाजपला होत आला आहे. त्यामुळेच भाजपने विविध योजनांच्या माध्यमातून महिला मतदारांना आपल्याकडे राखण्याचा प्रयत्न केला आहे.

उज्ज्वला योजना, लखपती दिदी, मुद्रा योजनेच्या माध्यमातून केंद्राने महिला मतदारांकडे विशेष लक्ष दिले. आता राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती महिला मतदारांना साद घालत आहे. ही योजना मध्य प्रदेशात भाजप सरकारने सर्वप्रथम राबवली. या योजनेचा फायदा भाजपला विधानसभा निवडणुकीसह लोकसभेलाही झाला. त्यामुळेच हीच योजना आता महाराष्ट्रात राबवली जात आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी श्रावण प्लान आखला आहे. या प्लानच्या माध्यमातून भाजप महिलांशी थेट संपर्क साधणार आहे.