ढिंग टांग – चारसोपार अने तडीपार…!

नमोजीभाई : (humble) या देशातले १४० कोटी लोक माझ्यावर प्रेम करतात, तसंच देशातले सव्वा लाख मोरसुद्धा करतात.

नमोजीभाई : (humble) मोदी की गारंटी माने सारु छे! आमच्या गुजरातीत ‘केम छो?’ असं विचारलं की उत्तर देतात- सारु छे!

निवासस्थानाच्या हिरवळीवर नेहमीप्रमाणे मोरांचे नृत्य सुरु आहे. ढग येवोत, न येवोत, अधूनमधून पिसारा फुलवून नाचून दाखवणे, हीच या मोरांची नेमून दिलेली ड्यूटी आहे. हिरवळीच्या एका कोपऱ्यात वंदनीय नमोजीभाई यांची प्रदीर्घ महामुलाखत सुरु आहे. महामुलाखतकार भगिनी धडाडीच्या पत्रकार (humble) असून नमोजीभाईंच्या भक्तही आहेत. त्यात काही नवल नाही! या देशात सगळेच नमोजीभाईंचे भक्त राहतात. अब आगे…

नमोजीभाई : (मोरांना प्रेमाने हाकलत) हिर्रर्र हिर्रर्र…हैक..हैक..! छुत, हडी, हडी!! (मोर दुर्लक्ष करतात. एकदोघे गोंधळून पिसारा फुलवून नाचू लागतात.)

मुलाखतकार भगिनी : (हसून) मोर फारच लोभस आहेत हं! तुम्ही पाळलेत की काय? कम्मॉलच आहे तुमची!! (पहिला प्रश्न आला होऽऽ..!)

नमोजीभाई : (नम्रभावाने) या देशातले १४० कोटी लोक माझ्यावर प्रेम करतात, तसंच देशातले सव्वा लाख मोरसुद्धा करतात! इन फॅक्ट, दे लव्ह मी मोर..!! (अत्युच्च दर्जाचा विनोद झाल्यामुळे काही मोर तांतडीने पिसारा फुलवतात.)

मु. भ. : (जमेल तितका थेट सवाल करत) ‘अबकी बार चारसोपार’ ही घोषणा देण्याचं कारण काय? चारसोपार जागा मिळाल्या तर काय होणार आहे?

नमोजीभाई : (सहजगत्या उत्तर देत) यमक जुळलं, म्हणून दिली घोषणा! बाकी काही नाही!

मु. भ. : (कागदावरला छापील प्रश्न वाचत) बेरोजगारी, महागाईसारख्या प्रश्नांकडे तुम्ही कधी बघणार?

नमोजीभाई : (कठोरपणे) कोण रोखतंय निवडणूक? मी लोकशाहीवादी व्यक्ती आहे, हे सांगितलं की तुम्हाला! (ये हुईना बात…एक मोर दुसऱ्याला पीस देतो. माणसे एकमेकांना टाळी देतात, मोर पीस देतात.)

मु. भ. : (फोड करुन सांगत) इलेक्टोरल बाँड्स! इलेक्टोरल बाँड्स!

नमोजीभाई : (पाठीमागे रेलून बसत) माझा बाँड थेट जनतेशी आहे! दुसऱ्या कुठल्याही बाँडची मला गरज नाही! (हे बरीक खरंच, असं एक लांडोर एका मयुरेशला सांगते.)

मु. भ. : (कुतुहल लपवून न ठेवता) दहा वर्षातली कामगिरी ही तर नुसती ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, असं तुम्ही म्हणालात!

नमोजीभाई : (आत्मविश्वासानं) अर्थात!! आगे आगे देखो होता है क्या!!

मु. भ. : (शेवटला गोऽऽड प्रश्न…) मोदी की गारंटी म्हंजे नेमकं काय?

नमोजीभाई : (गहनगूढ स्मित करत) मोदी की गारंटी माने सारु छे! आमच्या गुजरातीत ‘केम छो?’ असं विचारलं की उत्तर देतात- सारु छे! म्हणजेच मोदी की गारंटी! कछु सांभळ्यो? (सगळे मोर पिसारा फुलवून नाचू लागतात.)

हेही वाचा :

राज ठाकरेंकडून मुलांच्या शाळेबाबत सरकारकडे महत्त्वाची मागणी

कोल्हापुरात खळबळ; महायुतीची साथ सोडताच ए. वाय. पाटलांवर गुन्हा दाखल

‘जुन्या वादात अडकून पडू नका, भविष्याचा विचार करून निर्णय घ्या’; जयंत पाटलांचा काँग्रेसच्या विशाल पाटलांना सल्ला