कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य हे पर्यटन(tourism) समृद्ध आहे. त्याचा आर्थिक दृष्टीने, रोजगार निर्मितीच्या दृष्टीने राज्यकर्त्यांनी गांभीर्याने विचार केलेला नाही. शरद पवार हे मुख्यमंत्री असताना त्यांनी 40 वर्षांपूर्वी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सक्षम केले होते. त्यातून कोकणात कुणकेश्वर, तारकर्ली वगैरे काही पर्यटन स्थळे विकसित करण्यात आली. त्यांच्यानंतर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील पर्यटन विकासाला फारसे महत्त्व दिले नाही. त्यामुळेच जागतिक पर्यटन नकाशात महाराष्ट्रात ठळकपणे दिसतो का? या प्रश्नाचे उत्तर समाधानकारक मिळत नाही. आता महायुती सरकारने पर्यटन स्थळांच्या विकासाचे धोरण जाहीर केले आहे आणि त्यासाठी एक लाख कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.
महाराष्ट्रात अनेक जागतिक वारसा स्थळे आहेत. जगप्रसिद्ध अजिंठा वेरूळ येथील प्राचीन लेणी आहेत. चंद्रपूर, नागपूर, नागझिरा, पेंच, चांदोली, राधानगरी, दाजीपूर, मुंबई जवळचे बोरिवली अशी कितीतरी अभयारण्य आहेत. ती जैवविविधतेने समृद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले आणि त्या पूर्वीचेही गडकोट किल्ले आहेत. सिंधुदुर्ग आणि जंजिरा हे सागरी किल्ले आहेत. राजापूरची कातळ शिल्पे आहेत. करवीर निवासिनी अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, सप्तशृंगी ही भक्ती आणि शक्तीपीठे आहेत. खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, नरसिंहवाडीचे दत्त मंदिर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्योतिबा डोंगर, बाजीप्रभूंनी लढवलेली पावनखिंड अशी शेकडो ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटन स्थळे महाराष्ट्रात आहेत.
महाराष्ट्रातील पर्यटन(tourism) वाढीसाठी राज्य शासनाने एक लाख कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दहा वर्षात पर्यटन स्थळे जागतिक पर्यटन नकाशावर आणली जाणार आहेत. दरवर्षी दहा हजार कोटी रुपये खर्च त्यासाठी केले जाणार आहेत. त्यातून दहा वर्षात 18 लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत.
शरद पवार हे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी पर्यटन विकासाकडे विशेष लक्ष दिले होते. काही नवी पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला उत्साहीत केले होते. महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरात पर्यटन विकास महामंडळाची कार्यालय होती.
कोल्हापुरात तर प्रादेशिक पर्यटन विकास महामंडळ होते. आज महामंडळाची कार्यालये किती प्रभावीपणे काम करताना दिसतात? अनेक कार्यालयामध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. पर्यटन विकास महामंडळाकडे असलेली विश्राम धामे ही आता खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित केलेली आहेत.
महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटन(tourism) स्थळे यांची माहिती उर्वरित भारतातील किती शहरांना दिली गेली आहे.? देशाच्या पर्यटन नकाशावर महाराष्ट्र ठळकपणे दिसण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत? जागतिक पर्यटन नकाशावर महाराष्ट्राचा ठिपका दिसतो का? असे अनेक प्रश्न आज उपस्थित केले जातात.
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याचा पर्यटन विकास झालेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले 13 गडकोट किल्ले कोल्हापुरात आहेत. करवीर निवासिनी अंबाबाई च्या दर्शनासाठी रोज किमान 50 हजार धार्मिक पर्यटक कोल्हापुरात येत असतात. मात्र त्यांना पर्यटक म्हणून आवश्यक असलेल्या सोयी आणि सुविधा यांची आजही वाणवा आहे. कोल्हापुरात ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे अनेक आहेत. पण पर्यटन विकास महामंडळाकडून त्याचे प्रभावीपणे मार्केटिंग केले गेलेले नाही. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील ए आणि बी श्रेणीतील पर्यटन स्थळे विकसित केली गेली तर त्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते. पर्यटन विकासावर प्रतिवर्षी दहा हजार कोटी रुपये खर्च केले जाणार असतील तर त्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला कार्यरत, मोटिवेट करावे लागेल. तज्ञ व्यक्तीकडे या महामंडळाची सूत्रे दिली गेली पाहिजेत.
परदेशातून महाराष्ट्रात येणारे पर्यटक प्रामुख्याने अजिंठा वेरूळ येथील प्राचीन लेणी पाहण्यासाठी जातात. या लेण्यांच्या शिवाय महाराष्ट्रात कितीतरी ऐतिहासिक, जागतिक वारसा स्थळ यादीत असलेली, तसेच प्राचीन मंदिरे आहेत. पण त्यांचे मार्केटिंग व्यवस्थित न झाल्यामुळे पर्यटक तिकडे फिरकत नाहीत. ज्या शहरात पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात त्यांना साधे पार्किंग उपलब्ध होत नाही. पर्यटकांच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई वाहतूक नियंत्रण पोलीस शाखेकडून केली जाते. देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या केरळमध्ये तसेच गोवा राज्यात पर्यटकांना चांगल्या सोयी आणि सुविधा मिळतात. म्हणून तिथले पर्यटन वाढले आहे. पर्यटकांच्या माध्यमातून या राज्यांना मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. हे महाराष्ट्रात सुद्धा घडू शकते. पण त्यासाठी इच्छाशक्ती आवश्यक आहे.
हेही वाचा :
विशाळगडावर ऐक्य अबाधित, परंतु दंगलीच्या बातम्या ऐकून मुश्रीफ भावुक
“उत्तर प्रदेशात योगींच्या नेतृत्वावर भाजपमधील विरोधकांची सक्रियता; नेतृत्व बदलणे आव्हानात्मक”
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे आजपासून अंतरवली येथे उपोषण सुरू