कुत्रा, मांजर चावलं, उपचारच घेतले नाहीत; 27 वर्षांच्या एकुलत्या एक मुलासोबत घडलं भयंकर

कल्याण : कुत्रा चावल्यानंतर तातडीने उपचार(treatment) घेणं आवश्यक असतं. कुत्रा चावल्यानंतर काही वेळात रुग्णालयात जाऊन इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास ते जीवावर बेतू शकतं. अशीच एक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. कल्याणमधील एका तरुणाला आधी भटका कुत्रा चावला आणि नंतर मांजर चावली. पहिल्यांदा कुत्रा चावल्यानंतर आणि दुसऱ्या वेळी मांजर चावल्यावरही तरुणाने दुर्लक्ष केलं. हेच त्याच्या जीवावर बेतलं आहे.

कल्याणमध्ये कुत्रा चावलेल्या तरुणाचं नाव शुभम चौधरी असं होतं. २७ वर्षीय शुभम त्याच्या कुटुंबीयांसह कल्याण पश्चिमेत राहात होता. त्याचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि तो नोकरीच्या शोधात होता. शुभम दोन महिन्यांपूर्वी रात्री फेरफटका मारण्यासाठी गेला होता. त्याठिकाणी एका भटक्या कुत्र्याने शुभमला चावा घेतला.

हा चावा किरकोळ असल्याचं समजून शुभमने कुत्रा चावल्यानंतर कोणतेही उपचार घेतले नाहीत. त्यानंतर मागच्या आठवड्यात त्याला एका मांजरीने चावा घेतला. तो चावाही किरकोळ असल्याने त्याने उपचार(treatment) केले नाहीत. कल्याणच्या गोल्डन पार्क परिसरातील ही घटना आहे.

दरम्यान १० डिसेंबर रोजी त्याची प्रकृती बिघडली. त्याच्या घरच्यांनी त्याला प्रथम कल्याणमधील दोन खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेलं. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला कळवा येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला गेला. त्यानंतर कळवा रुग्णालयातून त्याला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात नेण्यात आलं. त्याच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्याच्यावर उपचार सुरू असताना १२ डिसेंबर रोजी पहाटे मृत्यू झाला.

कल्याणमध्ये कुत्रा आणि मांजरींचा सुळसुळाट झाला आहे. माझा मुलगा अडीच ते तीन महिन्यांपूर्वी रात्री फेरफटका मारत असताना त्याला कुत्रा चावला. तो कुत्रा पिसाळलेला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्या कुत्र्याचा मृत्यू झाला. दोन आठवड्यांपूर्वी माझ्या मुलाला मांजर चावली, आधी डॉग बाईट आणि नंतर कॅट बाईटने माझ्या मुलाचा मृत्यू झाल्याची प्रतिक्रिया शुभम चौधरी याच्या वडिलांनी दिली आहे.

दरम्यान राज्यातील सर्वच शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे प्रशासनाने कुत्रे आणि मांजरी यांच्या लसीकरण आणि निरबिजिकरणाकडे लक्ष घातलं पाहिजे, भटक्या कुत्रा, मांजरांचा बंदोबस्त करा, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

हेही वाचा :

सांगली जिल्ह्यात मोठा अपघात; ट्रक पुलावरुन 55 फूट खाली कोसळला

“आता तुला फक्त उचललंय, नंतर…”; ठाकरे गटाच्या नेत्याचं भर चौकातून अपहरण

“भाजपच्या कोणत्या नेत्याला तुरुंगात टाकायचं हे ठरलं होतं”, दानवेंनी केला ‘मविआ’चा प्लॅन उघड