कोल्हापुरात पोलिसांची धडक कारवाई

गणेशोत्सवाच्या जल्लोषात कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तस्कर मनीष नागोरी आणि समीर उर्फ साजन उर्फ पाबलो गुलाब शेख यांना अटक केली आहे. या कारवाईत १५ लाख ५१ हजार रुपये किंमतीचा बारा ग्रॅम एमडी ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे.

या घटनेमुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात पुणे जिल्ह्यातील समीर उर्फ साजन शेख, ज्याच्यावर 23 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत, कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर वाशी पिरवाडी, सातारा येथून शेखला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान, समीर शेखला हा अंमली पदार्थांचा साठा कुख्यात तस्कर मनीष नागोरी यांनी पुरवला असल्याचे उघड झाले. त्यानंतर पथकाने आज (शनिवार) पहाटे करवीर तालुक्यातील मोरवाडी येथे छापा टाकून नागोरीला अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना दुपारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.