कोल्हापुरात आठ फूट उंच महिला मध्यरात्री सीसीटीव्हीत कैद; डोके विरहीत धड नव्हे

सानेगुरुजी परिसरातून मध्यरात्री एक महिला पायी कळंब्याकडे जात होती. मध्यरात्री अचानक लोकांच्या घराच्या दारावर कोणी ठोठावत असल्याचा प्रकार घडत होता. परंतु, या महिलेच्या हातात चाकू, कोयत्यासारखी हत्यारे असल्याने कोणीही तिच्या पुढे जाण्यास धजावत नव्हते.तिच्याकडून असे प्रकार वारंवार घडू लागल्याने अनेकांनी परिसरातील सीसीटीव्ही(cctv) फुटेजही तपासून पाहिले. यामध्ये या महिलेची उंची सात ते आठ फुटांपर्यंत दिसून आल्याने अनेकजण आश्चर्यचकीत झाले. अंगावर एकावर एक असे अनेक कपडे, जॅकेट परिधान केल्यानंतर डोक्यावरही एक जॅकेट घालत असल्याने तिचा चेहराच कोणी पाहू शकले नव्हतं.

आपटेनगर सानेगुरुजी वसाहत, कळंबा भागात मध्यरात्री आठ फूट उंच महिला फिरते. हातात चाकू, कोयता, काठी असल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण, परिसरातील सीसीटीव्हींमध्येही(cctv) डोके विरहित काळ्या कलाकृतीचं चित्रीकरण झाल्याने महिन्याभरापासून अफवांना ऊत आला आहे. तिने रागामध्ये एका तरुणाचा मोबाईल फोडल्याची तक्रार आल्याने अखेर जुना राजवाडा पोलिसांनीच याचा पर्दाफाश केला.

गुरुवारी आपटेनगर परिसरात रस्‍त्‍यावर फिरणाऱ्या तरुणाच्या हातातील मोबाईल या महिलेने हिसकावला. तो थेट जमिनीवर आदळून फोडल्याने संबंधित तरुणाने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनीही तातडीने दखल घेऊन त्या महिलेचा शोध सुरू केला. ही महिला मनोरुग्ण असून, मूळची पुण्याची राहणारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तिच्या नातेवाइकांशीही संपर्क करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

संबंधित महिला मध्यरात्री फिरत असल्याने तिच्याविषयी अनेक अफवा पसरल्या होत्या. काहींनी भूतप्रेताचा प्रकार असल्याचे सांगून मस्करीचा विषय बनवला होता. तिच्या हातात धारदार हत्यारे असल्याने या मार्गावरून रात्री फिरण्याचंही अनेकांनी बंद केले होते. मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या सर्व अफवांचा अखेर शुक्रवारी खुलासा झाला.

हेही वाचा :

उर्फी जावेदनं उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली;

ही सुवर्णसंधी सोडू नका! आज सोन्याचे दर पुन्हा घसरले, 24 कॅरेटचे भाव

एकनाथ शिंदे यांची मोठी कारवाई; अनेक पदाधिकाऱ्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी