अखेर काँग्रेसच्या पंचांगात “लाटकर” मुहूर्त निघाला, पण..!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी नऊ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली, पण कोल्हापूर उत्तर मधील उमेदवारांच्या नावाची घोषणा होत नव्हती. त्यातही महायुतीचा उमेदवार जवळपास निश्चित होता. हा मतदारसंघ काँग्रेसला(Congress) मिळणार की उबाठा सेनेच्या वाटणीला जाणार याचा निर्णय होतं नव्हता.

हा मतदारसंघ काँग्रेसच्या(Congress) वाट्याला आला तर उमेदवारी कोणाला मिळू शकते याची काही नावांसह चर्चा सुरू झाली होती. चर्चेच्या केंद्रस्थानी मधुरिमा राजे छत्रपती यांचे नाव होते. पण नक्की काय ते ठरत नव्हते. लोकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अखेर काँग्रेसच्या पंचांगात शनिवारी “लाटकर”मुहूर्त निघाला. आता हा मुहूर्त काँग्रेसला आणि सतेज पाटील यांना चित्रपट ठरणार याची चर्चा सुरू झाली पण त्याचबरोबर या मुहूर्ताला दगडफेकीचा अपशकूनही झाला आहे. कारण उमेदवारीचं”उत्तर”खुद्द काँग्रेस कार्यकर्त्यांनाही चकित करणारं होतं.

कोल्हापूर उत्तर या नावाने हा मतदारसंघ अस्तित्वात येण्याच्या आधी तो कोल्हापूर या नावाने ओळखला जात होता. दिनांक सहा मे 1986 रोजी शिवसेनेची कोल्हापुरात स्थापना झाल्यानंतर इसवी सन 1990 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने कोल्हापूरचे मैदान मारले होते. दक्षिण महाराष्ट्रात शिवसेनेने कोल्हापुरातून पहिल्यांदा विजयाचे खाते उघडले होते. त्यानंतर 2004 चा अपवाद सोडला तर 2014 पर्यंत या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार निवडून येत होता.

2019 मध्ये सेनेचा पहिला पराभव या मतदारसंघात झाला आणि आता तर हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेल्याने शिवसेना उबाठा गटाचे अस्तित्वच धोक्याचा आले आहे. आता 2019 ते 2019 अशी सलग दहा वर्षे शिवसेनेला तिथे पोकळी जाणवणार आहे. जागा वाटपात हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेल्यानंतर शिवसेना उबाठा गटात मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झाली आहे. आम्ही फक्त काँग्रेसच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भरायला त्यांच्याबरोबर जायचे का? असा सवाल शिवसैनिकांच्या कडून उपस्थित केला जातो आहे.

राजू लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे(Congress) शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांचे कार्यकर्ते भलतेच संतप्त बनले. रविवारी चव्हाण यांना भेटण्यासाठी गेलेल्या राजू लाटकर यांना कार्यकर्त्यांच्या कडून धक्काबुक्की करण्यात आली. लाटकर हे महापालिका स्थायी समिती सभापती होते. त्यांच्या पत्नी सुरमंजिरी या कोल्हापूरच्या महापौर होत्या. नाटकर यांचे वडील भरत लाटकर हे समाजवादी आंतरभारती परिवारातले.

राजू लाटकर यांचे नाव सुरुवातीला आघाडीवर नव्हते. मजुरीला राजे छत्रपती यांनी निवडणूक लढवण्यास आपण इच्छुक आणि उत्सुक नाही हे स्पष्ट केल्यानंतर सतेज पाटील यांचे विश्वासू शारंगधर देशमुख तसेच शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांची नावे उमेदवार म्हणून घेतली जाऊ लागली होती. शनिवारी राजू लाटकर यांचे नाव निश्चित झाल्यानंतर, त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केल्यानंतर कोल्हापुरातून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांच्या पंचांगातून लाटकर मुहूर्त काढला अशी एक खोचक आणि मिश्किल प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केली गेली.

महाविकास आघाडीच्या काँग्रेसकडून कोल्हापूर उत्तर मधून राजू लाटकर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पाठोपाठ
महायुतीच्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे सत्यजित उर्फ नाना कदम हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी विधानसभेच्या यापूर्वी दोन निवडणुका लढवल्या होत्या. पण त्यात त्यांना यश आले होते. या निवडणुकीत हा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिला गेल्यामुळे नाना कदम यांना थांबावे लागते. आता काँग्रेसचे राजू लाटकर विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभिजीत राऊत हे निवडणूक रिंगणात आहेत. तथापि लाटकर विरुद्ध क्षीरसागर अशीच लढत होणार आहे.

क्षीरसागर यांनी कोल्हापूर दक्षिण मध्ये त्यांचे चिरंजीव पुष्कराज यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न चालवले होते. त्यांची उत्तरची उमेदवारी सुद्धा तशी धोक्यात होती. खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांचे चिरंजीव कृष्णराज यांच्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू केले होते. अखेर कोल्हापूर उत्तर ची जागा एकनाथ शिंदे गटाला मिळाली आणि त्यांनी क्षीरसागर यांना उमेदवारी बहाल केली.

कोल्हापूर उत्तर या प्रतिष्ठेच्या मतदार संघासाठी सतेज पाटील यांनी अद्याप कोणतीही टॅगलाईन दिलेली नाही. मात्र राजू लाटकर यांना निवडून आणण्यासाठी त्यांना आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे. ते कोल्हापूर उत्तर साठी किती वेळ देणार आणि कोल्हापूर दक्षिण साठी किती वेळ देणार यावर बरेचसे काही अवलंबून आहे. काँग्रेस पंचांगात निघालेल्या लाटकर मुहूर्ताला अपशकुन झालेला आहे आणि तो दूर करण्यासाठी त्यांना”” शांती यज्ञ”” करावा लागणार आहे.

हेही वाचा :

आली आली दिवाळी! आज वसुबारस सण, जाणून घ्या पूजा पद्धत आणि शुभ मुहूर्त

नोव्हेंबरमध्ये आयपीओची रांग, स्विगी-एनटीपीसीसह दिग्गज कंपन्यांचा समावेश  

विजांच्या कडकडाटात दिवाळीचं स्वागत; पावसाच्या हजेरीनं उत्साहावर विरजण