भाजप-शिंदे गटात वादाची पहिली ठिणगी; मंत्रिमंडळातून अब्दुल सत्तार यांच्या हकालपट्टीची मागणी

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला(removal). अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा देखील समावेश आहे. काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांनी दानवेंचा तब्बल १ लाख मताधिक्यांनी पराभव केलाय. दरम्यान, या दानवे यांच्या या पराभवाला मंत्री अब्दुल सत्तार हेच जबाबदार असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

अब्दुल सत्तार यांनी पक्षाविरोधात काम केले(removal). त्यांनी निवडणुकीत युतीधर्म पाळला नाही. त्यामुळे त्यांची तातडीने मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी भाजपचे सिल्लोड तालुका शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी केली आहे. यासंदर्भात कटारिया यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र देखील लिहलं आहे.

“नुकत्याच देशभरात लोकसभा निवडणुका पार पडल्यात त्यात आपल्या पक्षाची सत्ता आली आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी तिसऱ्या वेळेस देशाच्या पंतप्रधानपदी विराजित झाले. त्यांच्या विजयात बाम्हाला अपेक्षित वाटा उचलता आला नाही याची सल मनात आहे. कारण आमच्या लोकसभा मतदारसंघात आम्हाला अपेक्षित मत मिळवून देता आली नाही”, असं कटारिया यांनी म्हटलं आहे.

“एकगठ्ठा मुस्लिम मते, आरक्षणाच्या विषयावरून नाराजी या सोबतच सिल्लोड विधानसभा मतदार संघात एक अजून कारण म्हणजे महायुतीचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधात केलेले काम. निवडणुकीच्या काळात दोन अगोदर पासून अब्दुल सत्तार व त्यांचे कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांनी काँग्रेस उमेदवाराचे उघड-उघड काम केले”, असा आरोप कटारिया यांनी केला.

“सिल्लोड तालुक्यात भाजपला मानणारा एकगठ्ठा मतदार आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार तालुक्यातील भाजपा संपवू पाहत आहेत. या अगोदर अनेक भाजपा कार्यकर्त्यांना त्यांनी त्रास दिला आहे. कारण नसतांना तालुका मुख्य भाजपा कार्यालया समोर ताब्यात असलेल्या नगरपरिषदेच्या माध्यमातून भिंत बांधणे, जमिनी हडपणे, भाजपा पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करायला लावणे, असे अनेक प्रकार ते वारंवार करीत असतात”, असं देखील कटारिया म्हणाले.

“पक्षाच्या हितासाठी आम्ही आजपर्यंत सर्व सहन केलं पण आता देशातील सगळ्यात महत्वाच्या निवडणुकीत त्यांनी गद्दारी करून लोकनेते आदरणीय रावसाहेब पाटील दानवे यांना पराभूत करण्यात वाटा उचलण्याचे पाप त्यांनी केले आहे. आम्ही सर्व भाजपा कार्यकर्त्यांची याविषयी प्रचंड नाराजी आहे. याविषयावर आपण त्वरित निर्णय घेऊन त्यांची राज्य मंत्री मंडळातून हकालपट्टी करावी, ही नम्र विनंती”, अशी विनंती देखील कटारिया यांनी बावनकुळे यांना केली आहे.

हेही वाचा :

सुनील गावस्करांनी केली Virat Kohli ची पाठराखण

मर्सिडिझ बेंझ महाराष्ट्रात करणार मोठी गुंतवणूक

मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; म्हणाले “ नावं घेऊन तुमचे उमेदवार पाडणार”