प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आता “रात्रीस खेळ चाले”

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानसभेची(assembly) सार्वत्रिक निवडणूक आता अंतिम टप्प्याकडे चालली असून सर्वच उमेदवारांनी उपलब्ध असलेली साधने सुविधा वापरून प्रचारात रंगत आणली आहे. महाराष्ट्रात आणि कोल्हापुरात राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांनी प्रचार सभा घेऊन सत्ता आमच्या हाती द्या, आम्ही महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकू असा विश्वास सर्वसामान्य मतदाराला दिला आहे.

या विधानसभा(assembly) निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे दिसले नाही. मात्र अनेक ठिकाणी काहीजणांनी भाषा सभ्यतेला सोडचिठ्ठी देऊन, वादग्रस्त विधाने केली. त्यात कोल्हापुरही अपवाद ठरले नाही. दिवसभर प्रचार आणि सर्व प्रकारच्या जोडण्याचा”रात्रीस खेळ चाले”असे सुरू आहे.

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अर्थात एन डी ए विरुद्ध इंडिया अशाच सर्वत्र लढती आहेत. संभाजी राजे छत्रपती यांची स्वराज्य संघटना, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच बच्चू कडू यांची प्रहार संघटना या तिघांनी मिळून स्थापन केलेली तिसरी आघाडी या निवडणुकीत उतरली आहे.

वंचित आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात आहे. निवडणुकीच्या आधी काही दिवस चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले मनोज जरांगे पाटील हे कुठेच दिसत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील एकूण आठ ठिकाणी जाहीर सभा झाल्या. त्यांनी आपल्या भाषणात राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ होणार असे भाजपच्या काही नेत्यांनी भाकीत केले आहे. तर महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेवर येणार असून, आमचा विजय हा मोदी युगाचा अस्त करणारा असेल असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊन काँग्रेसच्या सभेला उपस्थित राहणाऱ्या महिलांचे फोटो आणि नाव द्या मी त्यांची”चांगलीच व्यवस्था करतो, त्यांना बघून घेतो” अशी चक्क धमकी भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातील प्रचार सभेत दिल्यानंतर त्याचे राज्यभर पडसाद उमटले. राज्यस्तरीय महिला नेत्यांनी त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला शिवाय त्यांच्याविरुद्ध काही ठिकाणी पोलीस ठाण्यात महिलांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हाही दाखल झाला आहे.

हे वादग्रस्त विधान चांगलेच अंगलट येत आहे असे दिसल्यानंतर धनंजय महाडिक यांनी पहिल्यांदा माझ्या बोलण्याचा विपर्यास केला असे म्हटले आणि नंतर माफीच मागितली. महाडिक यांचे हे वक्तव्य महायुतीला चांगलेच त्रासदायक ठरले आहे. ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी महायुतीच्या एका महिला उमेदवारास इम्पोर्टेड माल असा उल्लेख केला आणि त्यानंतर त्यांना माफी मागावी लागली. भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे यांची विधाने अनेकदा वादग्रस्त ठरली आहेत आणि आता तर फोटोच्या आडवे येणाऱ्या एका कार्यकर्त्याला लाथ मारण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

एकूणच या निवडणूक(assembly) प्रचारात काही जणांनी भाषा सभ्यता गुंडाळून ठेवून संतापजनक विधाने केली आहेत. ही विधानसभा निवडणूक प्रचंड खर्चाची बनली असून निवडणूक आयोगाने खर्च करण्याची दिलेली मर्यादा निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसातच ओलांडली गेली आहे. उमेदवारी अर्ज भरताना बहुतांशी उमेदवारांनी आपल्या संपत्तीचे जे विवरण दिले आहे ते कोटीच्या घरात असल्यामुळे उमेदवारांच्याकडून निवडणुकीच्या खर्चाची कोटीची उड्डाणे सुरू आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी “काय पण”करण्याची तयारी सर्वच उमेदवारांनी केलेली आहे.

निवडणूक आता अंतिम टप्प्याकडे चालली असून, कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी, दुय्यम फळीतील नेत्यांची मर्जी राखण्यासाठी उमेदवारांच्या कडून हात सैल सोडले जाऊ लागले आहेत. पैशाचे व्यवहार करण्यासाठी उमेदवारांनी आपल्या विश्वासू साथीदारांची एक यंत्रणा उभी केली आहे. पैशाची पाकिटे पोहोच करण्यासाठी त्यांच्याकडून “रात्रीस खेळ चाले” चे प्रयोग रंगू लागले आहेत.

हेही वाचा :

“‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेवर अजितदादांचा आक्षेप? फडणवीसांचे स्पष्टीकरण, ‘जनभावना काय आहे…’”

प्रवाशांनो लक्ष द्या! 16 आणि 17 नोव्हेंबरला पश्चिम रेल्वेवर 12 तासांचा मेगाब्लॉक

“लग्नसराईत ग्राहकांना आनंदाची बातमी; पंधरा दिवसांत सोन्याचे दर 5 हजारांनी घसरले, चांदीचीही घसरण”