कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी जेष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने बिटकॉइन घोटाळा क्लिप च्या माध्यमातून सोशल मीडियावर आणला गेला, आता निवडणुकीच्या मतमोजणीच्या आधी अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील न्यायालयात दाखल झालेल्या उद्योगपती गौतम अदानी(adani) यांच्या विरोधातील एका खटल्याने राजकारण्यांनी महाराष्ट्रात गदारोळ उठविला आहे.
काँग्रेस आणि उबाठा गटाने हा मुद्दा तापवण्यास सुरुवात केली आहे मात्र महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार यांनी मात्र कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी नेमके काय संबंध आहेत याचा खुलासा भारतीय जनता पक्षाने तातडीने करण्याऐवजी, अदानी समूहाचे जनसंपर्क अधिकारी असल्यासारखे भाजपच्या प्रवक्त्यांनी भूमिका मांडलेली आहे.
भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील महत्त्वाची बंदरे, विमानतळे अदानी(adani) समूहाकडे खाजगी तत्त्वावर विकसित करण्यासाठी किंवा त्यांची देखभाल करण्यासाठी देण्यात आलेली आहेत. यापूर्वीच्या अशाच एका प्रकरणात अदानी समूहाचे नाव समोर आले. त्यावरून संसदेत प्रचंड गदारोळ उडवण्यात आला होता. राहुल गांधी यांनी चौकशीची मागणी केली होती. आताही त्यांनी चौकशीची मागणी मोठ्या आवाजात केलेली आहे.
सरकारी काम मिळविण्यासाठी किंवा टेंडर निविदा मंजूर होण्यासाठी अदानी उद्योग समूहाने पंचवीस कोटी डॉलर लाच स्वरूपात वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत असा ठपका न्यूयॉर्क येथील न्यायालयाने गौतम अदानी यांच्यासह सात जणांच्या वर ठेवला आहे.
ज्या पद्धतीने अदानी उद्योग समूहाला खाजगीकरणाच्या नावाखाली सरकारी पातळीवरील विशेषता केंद्रस्तरीय पातळीवरील कामे दिली जातात हे ओपन सीक्रेट आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर मुंबईतील धारावी झोपडपट्टी विकास प्रकल्पाचे देता येईल. राज्य शासनाने या प्रकल्पाचे काम अदानी उद्योग समूहाला दिल्यानंतर त्याच्या विरुद्ध उद्धव ठाकरे यांनी जोरदार आवाज उठवला होता. या निवडणुकीत त्यांनी हा विषय चर्चेत आणून महाविकास आघाडीची सत्ता आली तर धारावीचे कंत्राट रद्द करू असे त्यांनी म्हटले आहे.
वास्तविक न्यूयॉर्क न्यायालयाने अदानी समूहावर खटला दाखल केला आहे. त्याचा या देशाशी अर्था अर्थी काहीही संबंध नाही. न्यायालय आणि अदानी हे काय ते पाहून घेतील. त्यांच्यावर खटला दाखल केल्यामुळे भारताची बदनामी झाली असे म्हणतात येणार नाही. अदानी उद्योग समूह म्हणजे संपूर्ण देश नव्हे. तसे या देशात अनेक उद्योगपती आहेत. त्यांचे ही सर्व काही आर्थिक व्यवहार रीतसर असतात, कायदेशीर असतात असे म्हणता येत नाही. पण अदानी उद्योग समूहाचे नाव आले, की पाठोपाठ भारतीय जनता पक्षाचे तसेच भाजपच्या काही नेत्यांची नावे येतात.
याचा अर्थ या उद्योग समूहाशी भाजपचे तसेच भारतीय जनता पक्षांच्या काही नेत्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत असा होतो. भ्रष्टाचार प्रकरणात अदानी यांचे नाव आल्यानंतर भाजपच्या प्रवक्त्याला त्याबद्दल पक्षाची भूमिका मांडणे का गरजेचे वाटले. देशात अनेक उद्योग समूह आहेत. त्यांचे या देशाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे. अदानी यांचा उद्योग समूह हा काल परवाचा आहे. या समूहाचे व्यवहार संशयास्पद असल्याचे काही प्रकरणातून पुढे आले आहे. अशावेळी या उद्योगासमूहाशी आमचा काडीमात्र संबंध नाही हे ठामपणे सांगितले गेले पाहिजे. आणि अशा प्रकारचे संबंध देश म्हणून शासनकर्त्यांचे असता कामा नयेत.
या उद्योग समूहाने त्यांच्यावरील न्यूयॉर्क न्यायालयाने घेतलेले आक्षेप किंवा केलेले आरोप फेटाळून लावलेले आहेत. अर्थात ही त्यांच्याकडून अपेक्षित अशीच बाब आहे. कारण कोणीही आम्ही गुन्हेणार आहोत असे म्हणत नाहीत. आता रीतसर न्यायालयात याचा निर्णय होईल. हा उद्योग समूह अशा प्रकारे अडचणीत आल्यानंतर काँग्रेसला तसेच उद्धव ठाकरे यांना सरकारवर टीका करण्यासाठी मुद्दा मिळालेला आहे. अदानी उद्योग समूहावर अमेरिकेत दाखल झालेल्या खटल्याचा उल्लेख स्फोट असा उद्धव ठाकरे यांनी केला असून विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी किंवा त्याच्या आधी हा स्फोट झाला असता तर बरे झाले असते अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. पण बिटकॉइन घोटाळा प्रकरणात ते एक शब्दही बोलत नाहीत.
तोही आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आहे. शरद पवार आणि गौतम अदानी(adani) यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि ते लपून राहिलेले नाही. त्यामुळेच अदानी उद्योग समूहाच्या विरोधात एखादा मुद्दा उपस्थित झाला तर तेव्हा शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहसा व्यक्त होताना दिसत नाही.
हेही वाचा :
शरद पवारांचे मानसपुत्र केवळ ‘इतक्या’ मतांनी आघाडीवर
काकाच पुतण्यावर सरस! दुसऱ्या फेरीत लीड दुप्पटीने वाढवला