नवी दिल्ली : खाद्यान्नाच्या किंमती उतरल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात यावर्षी घाऊक दराधारित महागाई (Inflation)मागील तीन महिन्यांच्या नीचांकी जात १.८९ टक्के नोंदवली गेली आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीकडून फेब्रुवारीमध्ये आगामी पतधोरण आढाव्यात रेपो दरात किमा पाव टक्का कपात केली जाईल, असा अंदाज या घाऊक चलनवाढीच्या टक्केवारीमुळे तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
याआधी ऑक्टोबरमध्ये घाऊक दराधारित महागाई(Inflation) २.३६ टक्के नोंदवली गेली होती. ही महागाई गेल्याावर्षी नोव्हेंबरमध्ये ०.३९ टक्के होती. मात्र यावर्षी ऑगस्ट महिन्यात ही महागाई १.२५ टक्के होती. बर्कलेज या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, खाद्यान्नाची महागाई कमी झाली असली तरी वस्तूनिर्मिती अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांची महागाई मात्र वाढली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीपासून आजपर्यंत जागतिक किंमती ०.७ टक्क्यांनी वाढल्या आहेत. यामुळे डिसेंबरमधील घाऊक दराधारित महागाई अधिक येण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारकडून मागील आठवड्यात ग्राहक किंमत आधारित किरकोळ (रिटेल) महागाईची टक्केवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार, नोव्हेंबरमध्ये रिटेल महागाई ५.५ टक्के नोंदवली गेली आहे. ही महागाई ऑक्टोबरमध्ये ६.२ टक्के होती.
तीन महिन्यांपूर्वी खाद्यान्नांच्या किंमती १३.५ टक्के वाढल्या होत्या. या किंमती नोव्हेंबर महिन्यात घसरून ८.६ टक्क्यांनी वाढल्या. नोव्हेंबरमध्ये खाली आलेली घाऊक चलनवाढ ही मुख्यतः खाद्यान्नांच्या किंमती घसरल्यामुळे दिसून आल्याचे इक्राचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ राहुल अगरवाल यांनी सांगितले आहे. चालू (डिसेंबर( महिन्यात घाऊक दराधारित महागाई २.५ ते ३ टक्के या दरम्यान राहिल, असा इक्राचा अंदाज आहे. ही महागाई डिसेंबर २०२३मध्ये +०.९ टक्के होती.
देशातून जगभरात विविध प्रकारच्या व्यापारी वस्तू पाठवल्या जातात. या व्यापारी वस्तूंची निर्यात नोव्हेंबरमध्ये ४.८५ टक्क्यांनी घसरली आहे. वर्षभरापूर्वी, नोव्हेंबर २०२३मध्ये व्यापारी वस्तूंची निर्यात ३३.७५ अब्ज डॉलर होती. यावर्षी ती ३२.११ अब्ज डॉलरवर आली आहे. ही माहिती केंद्र सरकारने सोमवारी दिली.
निर्यात घसरली असताना आयातीत मात्र २७ टक्क्यांनी वाढ होऊन ती ६९.९५ अब्ज डॉलरवर गेली आहे. ही आयात गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये ५५.०६ अब्ज डॉलर होती. सोन्याची आयात नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर वाढून या महिन्यात १४.८ अब्ज डॉलरचे सोने आयात केले गेले आहे.
देशाच्या आयात व निर्यात यामधील फरक मोठा असल्याने नोव्हेंबरमध्ये हा फरक अर्थात व्यापारी तूट ३७.८४ अब्ज डॉलर नोंदवली गेली आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात व्यापारी वस्तूंची निर्यात १७.२५ टक्के वाढली आणि ३९.२ अब्ज डॉलर नोंदवली गेली होती. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या काळात निर्यात २.१७ टक्के वाढून २८४.३१ अब्ज डॉलर झाली आणि आयात ८.३५ टक्के वाढून ४८६.७३ अब्ज डॉलर झाली.
हेही वाचा :
उद्धव ठाकरेंनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
संसदेत ‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयकाला ‘इतकी’ मते विरोधात पडली!
शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीचं होणार ‘थ्रीडी स्कॅनिंग’; शुक्रवारी दुपारी मंदिर 3 तास दर्शनासाठी बंद