पुणे : शिंदे सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला(scheme) गालबोट लागले आहे. या योजनेविरोधात पुण्यात पहिली पोलीस तक्रार दाखल झाली आहे. परवानगी न घेता या योजनेच्या जाहिरातीमध्ये आपला फोटो वापरला, असा आरोप करत एका महिलेने शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. नम्रता कावळे असे या तक्रारदार महिलेचे नाव आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नावाने सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे या महिलेने तक्रार अर्ज दिला आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारची(scheme) महत्वकांक्षी योजना आहे. आतापर्यंत एक कोटीहून अधिक अर्ज या योजनेत प्राप्त झाले आहेत. सत्ताधारी तिन्ही पक्षातील आमदारही या योजनेला आणखी प्रतिसाद मिळावा म्हणून जाहिरात मोहीम आखत आहेत. याच मोहिमेअंतर्गत शिवाजीनगर मतदारसंघात आमदार शिरोळे यांनी गत दोन आठवड्यांपासून होर्डिंग्ज आणि फ्लेक्स लावले आहेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सिद्धार्थ शिरोळे यांचा देखील फोटो आहे. त्यासोबतच “नात्यांचा मान, माय बहिणींचा सन्मान” अशा मथळ्याखाली दोन महिलांचा फोटो छापण्यात आला आहे.
जाहिरातीमध्ये वापरलेले हेच फोटो आपले असल्याचा दावा नम्रता कावळे यांनी केला आहे. तसेच परवानगी न घेता या आपला फोटो वापरला, असा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नावाने सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे या महिलेने तक्रार अर्ज दिला आहे. विना संमती फोटो छापल्याने माझ्या कुटुंबात गैरसमज आणि वादविवाद सुरू झाला आहे. त्यामुळे अयोग्य आणि बोगस काम केलेल्या आमदार शिरोळेंवर कारवाई करावी अशी तक्रार या अर्जामधून करण्यात आली आहे.
दरम्यान, महिलांने केलेल्या तक्रारीनंतर सिद्धार्थ शिरोळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. या योजनेच्या जाहिरातीचे कंत्राट मी जाहिरात कंपनीला दिले होते. पण ज्या महिलांचा या योजनेच्या पोस्टर, बॅनरवर फोटो आहे, त्यांचे फोटो यापूर्वी सुद्धा जाहिरातीमध्ये वापरण्यात आले आहेत. शटर स्टॉक या संकेतस्थळावर हे फोटो आहेत. 2016 सालच्या या फोटोचे मालकी हक्क हेही संबंधित फोटोग्राफरकडे आहे. आम्ही पैसे देऊन हे हक्क विकत घेतले आहेत. तरीही त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असेही आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :
खेळताना दोराचा लागला फास; 7 वर्षाच्या मुलीचा झाला मृत्यू…
“…तर उद्या एखादा दहशतवादीही नाव बदलून भेटायला येईल”; सुप्रिया सुळे संतापल्या
धोनी खेळणार पुढील आयपीएल? बीसीसीआयच्या एका निर्णयामुळे माही आणखी खेळताना दिसणार