रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (royal challengers bangalore)ग्रेट फिनिशर दिनेश कार्तिकची राजस्थान रॉयल्सविरुद्धची एलिमिनेटर लढत त्याच्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या कारकीर्दीतील अखेरचा सामना असू शकतो. कारण बंगळुरूचे आयपीएलच्या 17 व्या हंगामातील आव्हान संपुष्टात आल्यानंतर दिनेश कार्तिकने हातातील ग्लोव्हज काढून प्रेक्षकांना अभिवादन केले. अश्रू अन् हुंदके अनावर झालेल्या कार्तिकला विराट कोहलीने गळाभेट घेऊन सावरले. एवढेच नव्हे तर बंगळुरूच्या खेळाडूंनी आपल्या या जिगरबाज यष्टिरक्षक फलंदाजाला मैदानाबाहेर जाताना ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. सामन्यानंतरचा सर्व माहोल दिनेश कार्तिकच्या निरोप समारंभासारखा भासत होता. केवळ या समारंभाला अधिकृत निवृत्तीची झालर नव्हती.
पराभवाच्या षटकारानंतर बंगळुरू संघाने विजयाचा षटकार ठोकून राखेतून उठून फिनिक्स भरारी घेत अखेरच्या क्षणी आयपीएलची प्ले ऑफ गाठली. स्टार खेळाडू विराट कोहलीसाठी बंगळुरूने एकदा तरी आयपीएलच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरावे, अशी तमाम क्रिकेटप्रेमींची इच्छा होती, मात्र सलग 17 व्या हंगामातही विराटचे स्वप्न एक अधुरी कहाणीच राहिले. आपली ही अखेरची आयपीएल असेल, असे संकेत त्याने आधीच दिले होते. कार्तिकने बंगळुरूसाठी(royal challengers bangalore) ग्रेट फिनिशरची भूमिका चोखपणे बजावताना अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले. आपल्या संघाला प्ले ऑफचे तिकीट मिळवून देण्यात कार्तिकचे बहुमोल योगदान होते. दिनेश कार्तिकने आपल्या आयपीएल कारकीर्दीत 257 सामन्यांत 22 अर्धशतकांसह 4842 धावा पटकाविल्या आहेत. या अनुभवी यष्टिरक्षक फलंदाजाने अजूनही आयपीएलमध्ये खेळत राहावे, अशी त्याच्या चाहत्यांची मनापासून इच्छा आहे.
आयपीएलच्या 17 हंगामांत 6 संघांसाठी योगदान
पहिल्या आयपीएलपासून या लोकप्रिय क्रिकेट स्पर्धेत दिनेश कार्तिकने आतापर्यंत झालेल्या17 हंगामांत तब्बल सहा संघांसाठी योगदान दिलेले आहे. त्याने 2008 मध्ये दिल्ली डेअर डेविल्सकडून (आताची दिल्ली कॅपिटल्स) आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. 2011 मध्ये तो पंजाब संघात दाखल झाला. त्यानंतर मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स, कोलकाता नाईट रायडर्स व बंगळुरू अशा सहा संघांकडून कार्तिकला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने एकूण 15 सामने खेळताना 36.22 च्या सरासरीने 187.36 च्या जबरदस्त स्ट्राइक रेटने 326 धावा फटकाविल्या आहेत.
हेही वाचा :
महिना 50 हजार देऊन हिंदुंना ख्रिश्चन बनवण्याचा प्लान असा फसला
खरंच परिणीती चोप्रा प्रग्नेंट आहे का?, अभिनेत्रीने VIDEO शेअर करत सांगितलं सत्य
अमरावतीत होणार तिरंगी लढत! बच्चू कडूंच्या उमेदवारामुळं महायुती की मविआचा होणार गेम?