‘काँगेसमुक्त भारत’ करण्याच्या फंदात अर्धा भारत ‘भाजपमुक्त’ झाला; शिवसेना ठाकरे गटाचा मोदींना टोला

लोकसभा निवडणुकीत(Congress) यंदा भाजपला स्वबळावर बहुमत मिळवता आलं नाही. मात्र, मित्रपक्षाच्या मदतीने त्यांनी सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठताना मोदी-शहा यांची दमछाक झाली. मोदी यांचा तोरा उतरला, असा टोला सामना अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

“नरेंद्र मोदी 2014 साली प्रथम सत्तेवर आले तेव्हा ‘काँग्रेसमुक्त(Congress) भारता’चा नारा त्यांनी दिला. 2024 साली त्याच काँग्रेसने मोदींच्या गर्वाने फुगलेल्या छातीचा फुगा फोडला आहे. काँग्रेसने मुसंडी मारून भाजपच्या बहुमताचे मुंडके उडवले. किमान नऊ राज्यांतून भाजप हद्दपार झाला. भाजपला तेथे खाते उघडता आले नाही”, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली.

“तामिळनाडूसारख्या मोठय़ा राज्यात भाजपला एकही जागा मिळाली नाही. पंजाब हे महत्त्वाचे राज्य आहे. या राज्यातही भाजप खाते उघडू शकला नाही. मेघालय, मणिपूर, नागालॅण्ड, सिक्कीम अशा सीमावर्ती राज्यांत भाजपची कामगिरी शून्य आहे. पुद्दुचेरी, चंदिगढमध्येही भाजप उरलेला नाही”, असं सामना अग्रलेखात मांडण्यात आलं.

“मोदी यापुढे हिंदुत्वाचा ‘हि’सुद्धा तोंडातून काढू शकणार नाहीत. त्यांनी जे ठरवले तसे काहीच झाले नाही. सत्तेसाठी मोदी यांनी आधी पक्षफोडी केली, आता तडजोडी केल्या. कारण ‘काँगेसमुक्त भारत’ करण्याच्या फंदात अर्धा भारत ‘भाजपमुक्त’ झाला व मोदींचा तोरा कुबडय़ांवर लटकला आहे”, असा घणाघात सामनातून करण्यात आला.

“चिराग पासवान यांचा ‘लोजपा’ अमित शहांनी फोडला व चिराग यांच्या काकांच्या हाती दिला. चिन्ह व पक्षही गमावून चिराग उभे राहिले. आज त्याच चिराग यांच्या टेकूवर मोदी सत्ता स्थापन करीत आहेत. मोदी यांचे धोरण हे असे आहे. उद्या ते काँगेस पक्षाचेही गुणगान सुरू करतील व सत्ता टिकविण्यासाठी गरज पडली तर सोनिया गांधींच्या दारात उभे राहतील”, असा टोलाही सामना अग्रलेखातून लगावण्यात आला.

“देशाच्या प्रगतीत काँग्रेस कोठेच नाही असे मोदीकृत नव भाजपचे म्हणणे होते, पण या वेळी काँग्रेसने शंभर जागांचा टप्पा पार करून मोदी यांचा तर्क खोटा पाडला. मोदी यांच्याप्रमाणेच भाजपचे अध्यक्ष डॉ. नड्डा यांनीही असे जाहीर केले होते की, यापुढे देशात फक्त भाजपच राहील व प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व आम्ही नष्ट करू, पण त्यांच्यावर काळाने सूड घेतला”, असंही सामना अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.

हेही वाचा :

समृध्दी महामार्गावर वैजापूरजवळ कार ट्रकला धडकली तिघांचा जागीच मृत्यू

एका वर्षात मध्यावधी लागू शकते, काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याच्या दावा

यूएसएच्या विजया सुपर ओव्हरमुळे टीम इंडियाला मोठा फटका