आत्महत्येचा विचार करणारा इथला शेतकरी खूष कसा ?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कधी अवकाळी पावसाने उभी पिके(crop) झोपतात, तर कधी कोसळणारा पाऊस उभ्या पिकात पाणीच पाणी करतो, तर कधी बोगस बियाणामुळे दुबार पेरणी करावी लागते तर कधी कृषी मालाचे भाव कोसळतात, पिक विमा योजना असूनही तिचे लाभ मिळत नाहीत, अखंडित वीज पुरवठा कधीच केला जात नाही, अशी परिस्थिती असेल तर महाराष्ट्रातील शेतकरी खूष कसा?

टोमॅटोचे पीक(crop) अमाप येते आणि त्याचवेळी त्याचे भाव गडगडतात. मग त्याचा चिखल केला जातो किंवा रस्त्यावर फेकण्याची वेळ येते. परदेशात जेव्हा मोठी मागणी असते तेव्हा कांदा निर्यातीवर बंदी आणली जाते. किंवा निर्यात शुल्क वाढवले जाते. निर्यात विषयक धोरणात ठामपणा नसल्याने तयार झालेला कृषी माल नासतो. देशांतर्गत मागणी वाढते तेव्हा कांद्याचे दर वाढतात पण तो पैसा शेतकऱ्याच्या खिशात जाण्याऐवजी दलालाच्या तिजोरीत जातो. शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी येते मग इथला शेतकरी खूष कसा?

राज्य शासनाच्या वतीने तसेच जिल्हा बँकांच्या वतीने शेतकऱ्याला पीक विम्याचे कवच दिले जाते, शेतकऱ्यांच्या हातातून पीक जाते तेव्हा त्याला विम्याचे पैसे मिळायला हवेत पण विमा कंपन्या पसार होतात. किंवा पैसे द्यायला लागू नयेत म्हणून तांत्रिक बाबी पुढे करतात. शेतकऱ्याच्या हातात मात्र काहीच पडत नाही तर मग इथला शेतकरी खूष कसा?

कोसळणाऱ्या पावसाचे पाणी उभ्या पिकात(crop) शिरते आणि पिके करपतात. पेरणी वाया जाते. मग केव्हातरी पंचनामे होतात आणि शेतकऱ्याच्या खात्यावर जे काही पैसे जमा होतात त्यातून पेरणीचा खर्चही भागत नाही. पुन्हा दुबार पेरणी करण्याची वेळ येणारा इथला शेतकरी खूष कसा? विदर्भात गाभ्रीचा पाऊस म्हणतात. खरे तर ही वैदर्भीय शिवी आहे. जेव्हा हवा असतो तेव्हा येत नाही आणि जेव्हा नको असतो तेव्हा नेमका टपकतो आणि उभे पीक घेऊन जातो अशा लहरी पावसाला वैदर्भीय भाषेत गाभ्रीचा पाऊस म्हणतात. अशा प्रकारच्या पावसाला सातत्याने सामोरे जाणारा इथला शेतकरी खूष कसा? पावसाने झोडपले, आणि राजानेही (शासनकर्ते) झोडपले तर बळीराजांने, शेतकऱ्याने दाद कुणाकडे मागायची? तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणारा इथला शेतकरी खूष कसा?

तीन वर्षांपूर्वी एका संस्थेने शेतकऱ्यांविषयी केलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले होते की, महाराष्ट्रातील एक लाख शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार करतो आहे. अशी भयान स्थिती असेल तर इथला शेतकरी खूष कसा? कृषी मालाला हमीभाव नाही, बाजारपेठेत चांगला दर मिळेल असे वातावरण नाही. शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर जात नाहीत. बँक थांबायला तयार नाही. वसुली अधिकारी शेतकऱ्यांच्या दारात जातात आणि त्याला “नापत “करतात. त्याची अप्रतिष्ठा करतात. अशावेळी शेतकरी शेतातल्या झाडाच्या फांदीला स्वतःला लटकावून घेतात. आत्महत्या करतात.
त्यात थांबता थांबत नाहीत तर मग इथला शेतकरी खूष कसा? शेतकऱ्याने आत्महत्या केली तर त्याच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची शासन मदत करते. पण ही मदतही सहजासहजी मिळत नाही. तरीही महाराष्ट्रातला शेतकरी खूष तर देश खूष असे कसे म्हणता येईल?

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथे बोलताना महाराष्ट्रातील शेतकरी खुश तर देश खुश असे म्हटले आहे. एक तर त्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या माहित नाहीत किंवा त्याबद्दलची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली जात नाही. केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांविषयी ज्या योजना राबवल्या जातात त्याचा लाभ इथल्या शेतकऱ्यांना मिळतो आहे आणि म्हणून तो खुश आहे असे अनुमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले असावे. महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत आहे याबद्दलची सखोल माहिती त्यांच्यापर्यंत कुणीतरी पोहोचवली पाहिजे तरच शेतकऱ्याला चांगले दिवस येऊ शकतील. पंतप्रधानांच्या भाषेत बोलायचे झाल्यास इथला शेतकरी खुश होईल.

हेही वाचा:

सुवर्णसंधी! CV ठेवा तयार, IT कंपन्यांमध्ये भरती सुरु

राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ भागात पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी

सरकारी कार्यालयातच शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; विष प्राशन केले अन्…