कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : राजकारण्यांवर, राज्य शासनावर, मंत्र्यांवर, आमदार, खासदार यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींवर, भ्रष्टाचारावर, तावातवाने बोलणारे, व्यवस्था बदलली पाहिजे, लोकशाही सदृढ झाली पाहिजे, परिपक्व बनली पाहिजे, भ्रष्टाचार मुक्त शासन आणि प्रशासन असलं पाहिजे अशा अपेक्षा व्यक्त करणाऱ्या मंडळींच्या बद्दल तथाकथित विचारवंतांच्या बद्दल आदरच व्यक्त केला पाहिजे. पण नेमकी हीच बहुतांशी मंडळी निवडणूक वेळी मतदानासाठी घरातून मतदान केंद्रांपर्यंत(polling station) जाताना दिसत नाहीत.
लोकां संगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असं या निरुत्साही मतदारांच्या बद्दल म्हणता येईल. खरंतर या अशा आळशी मतदारांनी विद्यमान स्थितीबद्दल आणि व्यवस्थेबद्दल तसेच भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा अधिकार गमावलेला असतो. आणि आपणाला सर्वांना हा अधिकार गमवायचा नसेल तर मग आज बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी नजीकच्या मतदान केंद्रावर यायला लागतंय.
ग्रामपंचायती पासून लोकसभापर्यंतच्या निवडणुकीत प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. कारण मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदान हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या उत्सवात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. कारण सर्वसामान्य मतदाराच्या लायकीप्रमाणे लोकप्रतिनिधी मिळत असतात. सामान्य जनतेचे प्रतिबिंब मतदान यंत्राचा दिसले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक पात्र व्यक्तीला एका मताचा अधिकार दिला आहे. हा अधिकाराचा राष्ट्र घडवणारे देश बलवान करणारे लोकप्रतिनिधी तयार करत असतात. म्हणूनच मताला लोकशाहीत अमूल्य मानले जाते.
शेतकरी त्याच्या शेतीच्या बांधावरच उभा आहे. तो पिकासाठी शेत तयार करायला शेतात उतरलाच नाही तर मग पीक येणार कसे? मतदानाचा तसंच आहे. मतदानाच्या दिवशी घरात राहून विश्रांतीच घेतली तर पात्र उमेदवार लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतील कसे?
पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात बदल झाला. संदर्भ बदलले, समीकरणे बदलली आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले आणि मग गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात सत्ता संघर्ष निर्माण झाला. या सत्ता संघर्षाचे सर्वोच्च न्यायालयात घटनापिठासमोर काय झाले हा इतिहास सर्वांनाच ज्ञात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे आणि त्याचे एकाच टप्प्यात बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे.
सर्वसामान्य मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान केंद्रापर्यंत(polling station) आले पाहिजे असे आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या जनतेला केले आहे. महाराष्ट्रात जवळपास नऊ कोटीच्या आसपास मतदार आहेत. पुरुष मतदारांच्या पेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत आणि निवडणूक आयोगाने जवळपास एक लाखाच्या आसपास मतदान केंद्र स्थापन केलेली आहेत. एकूण मतदारांमध्ये 18 ते 35 या वयोगटातील तरुण मतदारांची संख्या लक्षणीय आहे.
मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून शासनाने सुट्टी जाहीर केली आहे. तथापि मतदानाची टक्केवारी विक्रमी पातळीवर येत नाही. सध्या हिवाळा आहे. हवामान थंड आहे त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. उमेदवारांचे प्रचारक किंवा प्रतिनिधी मतदानासाठी घेऊन जायला येतील अशी वाट पाहू नये. स्वतः उत्साहाने मतदान करण्यासाठी बाहेर पडले पाहिजे.
मतदानाच्या दिवशी सुट्टी आहे म्हणून बाहेर सहलीसाठी जाणे किंवा एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडणे याचे नियोजन करणारे हे लोकशाही विरोधी आहेत असे मानले पाहिजे. अशा लोकांना मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांनी प्रयत्न करायला हवेत.
मतदान करताना उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे याच्याकडे फारसे लक्ष न देता उमेदवार हा चारित्र्यसंपन्न आहे का? तो सुशिक्षित आहे का? त्याला विकासाची दृष्टी आहे का? तो मतदारांच्या हितासाठी झटणार आहे का? याचा विचार करून मतदान केले गेले पाहिजे. त्यामुळे कायदेमंडळाला चांगले लोकप्रतिनिधी मिळतील. चांगले राज्यकर्ते मिळतील. या राज्यकर्त्यांकडून भ्रष्टाचार मुक्त प्रशासन मिळेल. सर्वसामान्य जनतेला अडचणीत आणणारी व्यवस्था बदलली जाईल आणि हे सर्व तुमच्या मतामुळे घडेल आणि म्हणूनच सर्वांनाच मतदान करण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत(polling station) यायला लागतंय.
हेही वाचा :
नाईलाज! स्वत:लाच मतदान करू शकणार नाहीत फडणवीस, ठाकरे; पण असं का?
मतदानाच्या दिवशी, रायगडमध्ये देवदेवस्कीचा प्रकार? रस्त्यावर मडकी रचून ठेवली आणि…
निवडणूक आयोगाच्या ‘नॅशनल आयकॉन’ने कुटुंबासोबत केले मतदान, सचिन तेंडुलकरने केले जनतेला आवाहन