मुलीला भेटायचे असल्यास आई सोबत राहणार; हायकोर्टाचा निर्वाळा

मुलीला भेटायचे असल्यास तिची आईदेखील(mother) सोबत राहणारच, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने पनवेल जिल्हा न्यायालयाच्या आदेशात बदल केला.

पनवेल न्यायालयाने केवळ पती व त्याचा कुटुंबीयांना मुलीला भेटण्याची मुभा दिली होती. ही भेट होत असताना मलाही तेथे उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पत्नीने केली होती.(mother)

न्या. फिरदोश पुन्नीवाला यांच्या सुट्टीकालीन एकल पीठासमोर ही सुनावणी झाली. पती व त्याचे कुटुंब मुलीला भेटत असताना पत्नी उपस्थित राहू शकते. यास पतीने परवानगी दिल्यास मुलगी व पतीचा संवाद सुरू असताना पत्नीने त्यामध्ये लुडबुड करायची नाही, असेही न्यायालयाने बजावले आहे.
काय आहे प्रकरण…

मुलीला भेटता यावे यासाठी पतीने पनवेल जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. पनवेल न्यायालयाने पती व त्याच्या कुटुंबीयांना दुपारी 2 ते रात्री 8 या वेळेत भेटण्याचे आदेश दिले. याला विरोध करत पत्नीने उच्च न्यायालयात धाव घेतली. मुलीला भेटता यावे यासाठी मार्च 2024 मध्ये पतीने अर्ज केला होता. त्यावेळी न्यायालयाने माझ्या 7 वर्षांच्या मुलीला याबाबत विचारणा केली होती. मी आईला सोडून जाणार नाही, असे मुलीने सांगितले होते. त्यानंतर पुन्हा मे महिन्यात त्याच न्यायाधीशाने पतीला व त्याच्या कुटुंबीयांना मुलीला भेटण्याची परवानगी दिली, असा आरोप पत्नीने याचिकेत केला.

पतीचा दावा

पत्नी असली तर मुलीसोबत नीट बोलता येणार नाही. पत्नीने आधीच माझ्याविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. भेटीवेळी उपस्थित राहण्याची परवानगी दिली तर पत्नी अजून काही तरी खोटी तक्रार करेल. पनवेल न्यायालयाचे आदेश योग्यच आहेत, असा दावा पतीने केला होता. हा दावा न्यायालयाने मान्य केला नाही. पती मुलीला भेटत असताना पत्नी खोटी तक्रार करेल या युक्तिवादात काहीच तथ्य नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.

न्यायालयाचे निरीक्षण

पती-पत्नीत वाद असला तरी उन्हाळी व दिवाळीच्या सुट्टीत मुलांना भेटण्याची मुभा देणारा नियम आहे. या नियमाची अंमलबजावणी करताना मुलांचे हितही जपायला हवे. पती-पत्नीच्या भांडणाचा त्रास मुलांना होता कामा नये. मुलगी आईला सोडण्यास तयार नव्हती. अशा परिस्थितीत पनवेल न्यायालयाने पतीला स्वतंत्रपणे मुलीला भेटण्याची मुभा देणे अपेक्षित नव्हते. पती व मुलीच्या संभाषणात हस्तक्षेप करू नये, अशी अट घालून पनवेल न्यायालयाने पत्नीलाही भेटीवेळी उपस्थित राहण्यास परवानगी द्यायला हवी होती, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

हेही वाचा :

सावधान..! सावधान..! दिल्ली पोलिसांचा धोनीबाबत डोळ्यात अंजन घालणारा प्रश्न

12वी नंतर पुढे काय करायचं? वाचा करिअरच्या संधी

आईसोबत फिरते जग, आराध्या बच्चन कधी जाते शाळेत?