कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : शेतकऱ्यांचे आणि तेही प्रामुख्याने ऊस उत्पादक(political news today) शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या राजू शेट्टी यांनी बिगर शेतकरी जनतेच्या समस्या सोडवण्याचा कधी प्रयत्न केला नाही. किंबहुना त्यांना जमेत धरले नाही. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा शेतकऱ्यांच्यासाठीच आरक्षित मतदारसंघ आहे अशा गैरसमजूतीत ते होते.
या मतदारसंघात(political news today) आजही आपलीच हवा आहे अशा फाजील आत्मविश्वासात त्यांनी मतमोजणीच्या आधी दोन दिवस आपले मताधिक्य किती असणार हे सांगून टाकले होते. पण त्यांची या निवडणुकीत”हवा “च नव्हती आणि हवाच नसेल तर” शिट्टी” कशी वाजणार? ती वाजलीच नाही. राजू शेट्टी हे तिसऱ्या क्रमांकावर गेले. आता ते म्हणतात माझं काय चुकलं? चुका तर त्यांच्या अनेक झाल्या म्हणूनच मग मतदारांनी”चुकीला माफी नाही”अशी भूमिका घेतली त्यात त्यांचे काय चुकले?
लोकसभा निवडणुकीत साखरपट्ट्यातील सहा लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना आपले उमेदवार उभा करणार अशी गेल्या वर्षी घोषणा करून महाविकास आणि महायुतीच्या नेत्यांवर राजू शेट्टी यांनी एक प्रकारचा दबाव टाकला होता. या निवडणुका स्वबळावर लढवणार असेही त्यांनी स्पष्ट केले होते. दोन्ही आखाड्याकडून आपल्यासाठी पाय घड्या घातल्या जातील, काही जागा सोडल्या जातील अशा स्वप्न रंजनात ते वावरत होते. महाविकास आघाडी कडून त्यांच्यासाठी हातकणंगलेची जागा सोडली जाणार होती पण त्यासाठी त्यांनी आघाडीत आले पाहिजे अशी सामान्य अट होती. मी कोणाकडे जाणार नाही, आघाडीत येणार नाही, महाविकास आघाडीने मला बिनशर्त पाठिंबा द्यावा, समर्थन द्यावे ही त्यांची भूमिका राजकीय शहाणपणाची होती असे कोणीही म्हणणार नाही.
आपल्या भूमिकेवर ठाम असलेल्या राजू शेट्टी यांनी एकदा नव्हे दोनदा मातोश्री च्या पायऱ्या चढल्या. मला पाठिंबा द्यावा अशी त्यांची मागणी होती. तर तुम्ही शिवसेनेची मशाल हाती घेऊन निवडणूक लढवावी अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. पण मी माझ्या स्वाभिमानी शेतकरी संघटना या राजकीय पक्षाशी प्रतारणा करणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सत्यजित पाटील सरूडकर उर्फ आबा यांची उमेदवारी जाहीर केली. आबांचा प्रभाव फक्त शाहूवाडी पुरता मर्यादित आहे.
धैर्यशील माने यांचे तर मतदार संघातील काही गावात”खासदार हरवले आहेत”असे फलक लागले होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल मतदार संघात नकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे आपल्याशिवाय समर्थ पर्याय मतदारांच्या समोर कोणताही नाही अशा मानसिकतेत राजू शेट्टी वावरत होते.
इथेनॉल आणि साखरेला आहे चांगला दर मिळाला असल्यामुळे साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन तीनशे रुपये ज्यादा द्यावेत या मागणीसाठी त्यांनी आंदोलन केले होते आणि गळीत हंगाम रोखून धरला होता. शेवटी त्यांनी केवळ शंभर रुपयांवर तडजोड करून आंदोलन थांबवले. या आंदोलनातून शेतकऱ्यांच्या हाती फार काही लागले नाही मात्र ऊस तोड लांबल्यामुळे नुकसानच झाले.
त्यामुळे या निवडणुकीत साखरपट्ट्यातील ऊस उत्पादक राजू शेट्टी यांच्यावर नाराज होता. ही नाराजी त्यांनी मतदान यंत्राच्या माध्यमातून व्यक्त केली. बिगर शेतकरी मतदार हा त्यांच्यावर पूर्वीपासूनच नाराज होता. या मतदारांच्या काही समस्या आहेत, त्यांचे काही प्रश्न आहेत ते आपण सोडवले पाहिजेत असे त्यांना कधीच वाटले नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत बिगर शेतकरी मतदार हा त्यांच्या बरोबर नव्हता हे स्पष्ट झाले.
उद्धव ठाकरे यांची मशाल त्यांनी हातात घेतली असती या मतदारसंघातील निकाल वेगळा दिसला असता. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून आपली या मतदारसंघात चांगली”हवा”आहे अशा गैरसमजूतीत ते होते. प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी आणि इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न हे प्रतिकूल ग्रह आपल्या राजकीय कुंडलीत आहेत याचा त्यांना विसर पडला होता. अनुकूल “हवा” आपल्या आसपासही नाही, याचा अंदाज त्यांना शेवटपर्यंत आला नाही.” हवा” नसल्यामुळे त्यांची शिट्टी वाजली नाही.
राजू शेट्टी यांना त्यांचा यंदाच्या निवडणुकीत झालेला पराभव हा चांगलाच जिव्हारी लागला आहे. कारण ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. धैर्यशील माने यांच्यासाठी आपण निकटचे प्रतिस्पर्धी राहिलो नाही याची त्यांना मोठी खंत आहे. या मतदारसंघात त्यांचा झालेला हा सलगचा दुसरा पराभव आहे. सर्वसामान्य मतदारांनी “चुकीला माफी नाही”अशी भूमिका राजू शेट्टी यांच्यासाठी घेतलेली आहे. त्यामुळे माझं काय चुकलं? असा मतदार संघाला प्रश्न विचारण्याऐवजी आपण कुठे चुकलो याचे आत्मचिंतन करण्याची राजू शेट्टी यांना गरज आहे.
हेही वाचा :
नरेंद्र मोदींच्या विजयाने राहुल गांधी झाले मालामाल
मराठा आरक्षण पुन्हा तापणार! जरांगे पाटलांचे आजपासून अंतरवालीत उपोषण
सुजल्यावर कळतंय, शरद पवारांनी मारलंय कुठं! कोल्हापुरी बॅनर्सची रंगली एकच चर्चा