नाशिक-सुरत महामार्गावर गुजरातमधील आहवा-डांग जिल्ह्यातील सापुताराजवळील माळेगाव घाटात रविवारी पहाटेच्या सुमारास मध्य प्रदेशातील भाविकांना घेऊन जाणारी एक खासगी बस(private bus) २०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात ५ भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून, ४५ भाविक जखमी झाले आहेत. हे सर्व भाविक नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून दर्शन आटोपून गुजरात मार्गे द्वारकेला निघाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील भाविक चार खासगी बसमधून गेल्या २३ डिसेंबरपासून धार्मिक पर्यटनासाठी निघाले होते. शनिवारी त्यांनी शिर्डी , नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेऊन गुजरातच्या दिशेने प्रस्थान केले. यातील एक बस(private bus) माळेगाव घाटातून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती लगतच्या २०० फूट खोल दरीत जाऊन कोसळली. या बसमध्ये सुमारे ५० प्रवासी होते.
याच दरम्यान, मध्य प्रदेशातील शहाडौल येथून यात्रेकरूंना घेऊन निघालेल्या आणखी एका खासगी बसला हरसूलजवळील तोरंगण-खरपडी घाटात शनिवारी मध्यरात्रीनंतर १ वाजेच्या सुमारास अपघात झाला.
या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य २३ प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच, चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातातील जखमींना हरसूल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये बस चालक रतनलाल देवीराम जाटव (४१, रा. वशल्ला, मध्य प्रदेश), भोलाराम फोसाराम कुशवाह (५५, रामगढ, मध्य प्रदेश), गुड्डीबेन राजेशसिंह यादव (६०, रामगढ, मध्य प्रदेश), बिजेंद्रसिंह बादलसिंह यादव (५५, बिजरऊनी, भादरवड) आणि कमलेशाबाई बिसपालसिंह यादव (६०, रामगढ) या पाच जणांचा समावेश आहे. माळेगाव घाटात रविवारी पहाटे झालेल्या या भीषण अपघातात बसचे अक्षरशः दोन तुकडे झाले.
एकाच दिवशी झालेले हे दोन अपघात अतिशय दुर्दैवी आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हे अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या अपघातांमुळे भाविकांच्या धार्मिक यात्रेला गालबोट लागले आहे.
हेही वाचा :
शरद पवारांना धक्का ‘बडा नेता’ अजित पवार गटात करणार प्रवेश
Apple च्या भारतीय युजर्ससाठी खुशखबर; कंपनीने केली मोठी घोषणा
लाडक्या बहिणींची धास्ती वाढली ! ‘या’ लाभार्थ्यांवर दाखल होऊ लागले गुन्हे