पूजेमध्ये आंब्याचे, विड्याचे पान; दसऱ्याला आपट्याच्या पानाला का मान?

शनिवार, 12 ऑक्टोबर रोजी दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून या दिवसाचे महत्त्व आहे. नवरात्रोत्सवामधील नऊ दिवसांची पूजा(puja) याच दिवशी संपन्न होते. दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने देण्याची प्रथा आजही टिकून असल्याचे दिसून येते. विजयादशमी म्हणजे दसऱ्याला आपट्याचीच पाने सोने म्हणून का वाटली जातात? याबाबत जाणून घेऊया.

दसरा शब्दाची व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांत म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्ती रुपांनी दाही दिशांवर विजय मिळवला, असे सांगितले जाते. विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत.

श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्‍या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात.

दरवर्षी दसऱ्याला आपण सोने म्हणून आपट्याची पाने एकमेकांना देतो, नव्हे तर त्याला सोने लुटणे असे म्हणतो. परंतु वर्षभरात याच आपट्याच्या पानांकडे आपले लक्षसुद्धा देत नाही. मग एरव्ही तुळशीची किंवा बेलाची, आंब्याची पाने पवित्र म्हणून पूजेत(puja) वापरली जातात.

दसर्‍याच्या दिवशी इष्टमित्रांना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या-नाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की, दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे. घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवीत. नंतर देवाला आणि वडिलधारी व्यक्तींना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेत असत. या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली आहे, असा एक मतप्रवाह आहे.

आपट्याची पाने वाटण्याची कथा
पैठण शहरात देवदत्त नावाच्या एका गृहस्थास कौत्स नावाचा हुशार आणि सद्गुणी मुलगा होता. तो विद्यासंपादनासाठी वरतंतु ऋषींच्या घरी येऊन राहिला होता. त्या काळात ऋषींच्या म्हणजे गुरुच्या घरी राहूनच विद्या संपादन करण्याचा परिपाठ होता. कौत्स जात्याच हुशार असल्यामुळे तो थोड्याच दिवसात सर्व शास्त्रांमध्ये प्रवीण झाला. गुरुंचा आश्रम सोडताना काय गुरुदक्षिणा द्यावी, या विचारात पडून त्याने शेवटी गुरुंनाच `मी काय गुरुदक्षिणा द्यावी?’ असे विचारले. यावर गुरु म्हणाले, ‘गुरुदक्षिणा मिळावी, म्हणून मी तुला विद्या शिकवली नाही. शिष्य विद्या उत्तम शिकला की गुरुला गुरुदक्षिणा मिळाली.’ पण या उत्तराने कौत्साचे समाधान झाले नाही. तो पुन्हा पुन्हा काय गुरुदक्षिणा देऊ, विचारत राहिला.

शेवटी वरतंतु म्हणाले, ‘मी तुला चौदा विद्या शिकवल्या. प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे मला तू चौदा कोटी सुवर्णमुद्रा आणून द़े पण त्या अनेकांकडून जमा केलेल्या नकोत. एकाच दात्याकडून आणलेल्या असल्या पाहिजेत.’

गुरुजींची ही अट पाळणे कौत्सास थोडे कठीण गेले. त्यावेळी सिंहासनावर असलेला रघुराजा म्हणजे प्रभू रामचंद्रांचा पूर्वज, हा उदार आणि विद्वानांची कदर करणारा आहे, हे कौत्साला माहीत होते. तो मोठ्या आशेने रघुराजाकडे गेला. त्याने आपली मागणी रघुराजासमोर मांडली. पण त्यावेळी रघुराजाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्याने यज्ञयागात आपली सर्व संपत्ती दान केली होती. राजापासून आपणास काही अर्थलाभ होण्याची शक्यता नाही, हे ध्यानी येताच कौत्स परत जाऊ लागला.

आपल्या दारी आलेला याचक रिकाम्या हाती परत जाऊ नये, म्हणून रघुराजाने प्रत्यक्ष इंद्रावर चढाई करून त्याच्याकडून सुवर्णमुद्रा आणाव्यात, अशा निश्चय केला. हे इंद्राला समजताच, इंद्राने अयोध्यानगरीच्या बाहेर असलेल्या आपट्याच्या आणि शमीच्या झाडावर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षाव करवला. त्या सर्व सुवर्णमुद्रा घेऊन रघुराजाने कौत्साला दिल्या.

कौत्साने त्या मुद्रा आपल्या गुरुंसमोर ठेवून स्वीकारण्याची विनंती केली. गुरुंनी फक्त चौदा कोटी मुद्रा घेतल्या आणि बाकीच्या कौत्सास परत दिल्या. परत मिळालेल्या सुवर्णमुद्रा या आपल्या नव्हेत, म्हणून कौत्साने रघुराजाकडे त्या परत आणल्या. पण रघुराजा म्हणाला, `या माझ्याही नव्हेत, आता त्या तुझ्याच आहेत. मी त्या घेणार नाही.’ कौत्साला ते पटले नाही. त्याने ज्या आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली या सुवर्णमुद्रा पूर्वी मिळाल्या होत्या, तिथे त्या नेऊन ठेवल्या आणि लोकांना त्या लुटून न्या असे सांगितले. तो दिवस होता…विजयादशमीचा!

हेही वाचा:

केंद्र आणि महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये शिक्षणासंबंधी महत्वाचा करार!

मोठी बातमी! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून बालाजी मंदिर हटवले

दसऱ्याचा दिवस 3 राशींसाठी ठरणार सोन्याचा; 12 ऑक्टोबरपासून उजळणार नशीब