दुही माजवण्यासाठीच होतोय इतिहासाचा वापर?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : वर्तमान काळात इतिहासापासून(history) ऊर्जा घेतली तर भविष्यकाळ उज्वल बनतो. पण गेल्या काही वर्षांपासून, गेल्या काही महिन्यांपासून, आणि गेल्या काही दिवसांपासून इतिहासाचा, इतिहासातील काही घटनांचा वापर समाजात दुही माजवण्यासाठी, सामाजिक वातावरण गढूळ करण्यासाठी केला जातो आहे. मंत्री नितेश राणे यांच्यासह अनेक जण इतिहासकाराच्या भूमिकेत सध्या दिसू लागले आहेत.

विशेष म्हणजे ऐतिहासिक(history) घटनांवर व्यक्त होणारा प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या जाती शोधू लागला आहे. त्यांचे हे वर्तन वर्तमान काळातल्या “जातकलहा” शी सुसंगत असले तरी त्याच्यातून काही चांगले निष्पन्न होणार नाही हे वास्तव समजून सांगण्यासाठी समाजातील विचारवंतांनी आता पुढे आले पाहिजे.

महायुती सरकारमधील एक मंत्री नितेश राणे यांना स्वतःला जहाल हिंदुत्ववादी नेता म्हणून सिद्ध करावयाचे आहे आणि त्यासाठी मंत्री होण्याच्या आधीपासून त्यांचे त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. लव्ह जिहाद विरोधी त्यांनी अनेक जिल्ह्यात मोर्चे काढले होते. तिथे आक्रमक भाषणे केली होती. विशाळगड अतिक्रमण विषय त्यांनी हाती घेतला होता. काँग्रेस, स्वाभिमानी संघटना ते भारतीय जनता पक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. अचानक त्यांनी हिंदुत्वाचा विचार स्वीकारला आणि मग जहाल हिंदुत्ववादी अशी स्वतःची ओळख निर्माण करायला त्यांनी सुरुवात केली.

आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची मोगला विरुद्धची लढाई ही हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. आणि नितेश राणे हे निखालच असत्य बोलत आहेत, त्यांना कोणीतरी इतिहासाचे(history) धडे शिकवले पाहिजेत अशा प्रतिक्रिया नेहमीच्या मंडळींनी द्यायला सुरुवात केली आहे.

नितेश राणे यांचे हे वक्तव्य गांभीर्याने घ्यावे असे नाही. त्यांना बेदखल केले पाहिजे. त्यांच्या वक्तव्याची दखलच कोणी घेऊ नये असे म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात आणि त्यांच्या विश्वासू वर्तुळात किती मुसलमान होते याची यादीच देऊ लागले आहेत. वास्तविक छत्रपतींच्या मावळ्यामध्ये, सैन्यांमध्ये अनेक मुसलमान होते हे सगळ्यांनाच माहीत आहे पण त्यांची नेमकी संख्या कोणीही सांगू शकत नाही हेही तितकेच सत्य आहे. भविष्यात म्हणजे आणखी तीनशेहे ते चारशेहे वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडे किती मुसलमान होते हा प्रश्न चर्चेत येईल असे वाटले असते तर तत्कालीन बखरकारांनी नेमका आकडा लिहून ठेवला असता.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीपातीचे राजकारण केलेले नाही. पण श्रीमंत शहाजीराजे हे ज्या शहाजहांनशी लढले, छत्रपती शिवाजी महाराज हे ज्या औरंगजेबाशी लढले ते मुस्लिम होते. पण त्याचबरोबर छत्रपती शिवराय हे डच, पोर्तुगीजांशीही लढले.

स्वराज्याचे खरे शत्रू हे मोगल होते, मुसलमान होते म्हणून हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी लढाई होती अशी मांडणी करता येणार नाही. पण नितेश राणे हे छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही हिंदू विरुद्ध मुस्लिम अशीच होती अशा प्रकारची मांडणी करतात पण त्याचे सबळ पुरावे देत नाहीत. अजित दादा पवार यांनी नितेश राणे यांना इतिहास वाचण्याचा सल्ला दिला आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते पण ते देशभक्त होते असे सांगितले आहे. खरे तर त्यांनी तत्कालीन मुस्लिम हे स्वराज्य भक्त होते असे म्हटले पाहिजे होते.

महाराष्ट्राच्या समोर ज्या काही समस्या आहेत, सर्वसामान्य माणूस महागाईने किती त्रस्त आहे, याच्यावर चर्चा होणे आवश्यक असताना गेल्या काही महिन्यांपासून, गेल्या काही दिवसांपासून इतिहासातील काही घटनांवर आणि त्या काळातील जातीवर चर्चा सुरू झाली आहे. कोण कुठला हा प्रशांत कोरडकर? महाराष्ट्राला हे नावही माहीत नव्हते तर अशा या”चिल्लर”माणसाची चर्चा सध्या सुरू आहे.

हा माणूस शिल्लक असला तरी त्याने केलेली विधाने ही संताप जनकच आहेत. मराठ्यांचा इतिहास प्राधान्याने अगदी तपशीलासह पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून शिकवला गेला नाही. मोघ्यांचा इतिहास विस्तृतपणे शिकवला गेला किंबहुना बिंबवला गेला. त्यावर चर्चा कधी झाली नाही. मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास प्राथमिक शाळेपासून ते अगदी महाविद्यालयीन पातळीपर्यंत शिकवला गेला असता तर शिवकालीन जाती शोधण्याचे काम आज कोणाकडून झालेच नसते.

हेही वाचा :

१७८ प्रवासी असलेल्या विमानाला भीषण आग; लँडिंग करताच फ्लाइटने घेतला पेट

Cigarette ओढल्यामुळे खरचं मानसिक तणाव कमी होतो का जाणून घ्या

ट्रिपल सीट अन् नियमांची पायमल्ली; भर रस्त्यात तरुण-तरुणींचे अश्लील चाळे, Video Viral