सुनेनेच दिली सासऱ्याच्या हत्येची सुपारी

 नागपुरमधील हिट अँड रन प्रकरणाने एक वेगळे वळण घेतले असून सुनेनेच(revealed) सासऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.ही सून सरकारी अधिकारी असून तिने तिच्या माहेरच्या संपत्तीसाठी सासऱ्याला कारने उडविण्याची सुपारी दिली. यात सासऱ्याचा मृत्यू झाला, असे नागपूर पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८२ वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आपल्या पत्नीची भेट घेऊन घरी जात होते.

२२ मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मानेवाडा येथील बालाजी नगर परिसरात एका कारने पुरुषोत्तम पुट्टेवार यांना धडक दिली. यानंतर त्यांना मानकापूर येथील अलेक्सिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांचा मृत्यू झाला.मानकापूर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मुलगा आणि आरोपी अर्चना पुट्टेवारचा नवरा मनिष पुट्टेवार यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यात हत्येचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला होता.

त्यानंतर अजनी पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्यावरून त्यांनी हिट अँड रन प्रकरणाची नोंद करून कार चालक निरज निमजेला अटक केली.पोलीस चौकशीत या हत्येची मास्टरमाईंड पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून अर्चना पार्लेवार पुट्टेवार असल्याचे समोर आले. अर्चना पार्लेवार पुट्टेवार या गडचिरोलीतील नगर रचना विभागात सहाय्यक संचालक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी त्यांचा ड्रायव्हर सार्थक बागडेच्या माध्यमातून सासरे पुरुषोत्तम यांना मारण्याची सुपारी दिली.

सार्थक बागडेचा मित्र निरज निमजे आणि सचिन धार्मिकला १७ लाख रुपयांत ही सुपारी दिली होती. याच पैशांत अपघातासाठी एक जुनी कार विकत घेतली. त्यानंतर हीच कार निरज निमजेने पुरुषोत्तम यांच्या अंगावर घालून त्यांची हत्या केली, असे सिंगल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पुरुषोत्तम यांची सून अर्चना यांनीच हत्येची सुपारी दिल्याचे समोर आले. यानंतर (revealed)पोलिसांनी ६ जूनला अर्चनाला अटक केली.

आरोपींकडून १७ लाख रुपये आणि एक दुचाकी, हत्येत वापरलेली कार आणि आणखी दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत.सध्या पाच आरोपी अटकेत असून एका आरोपीला अटक करणार असल्याचे पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी सांगितले.अर्चना पार्लेवार-पुट्टेवार या सरकारी अधिकारी आहेत. तरीही त्यांनी माहेरच्या संपत्तीच्या वादातून वृद्ध सासऱ्याचा खून केला.या कुटुंबाचे दोन्ही बाजूने नाते आहे. अर्चना यांची नणंद योगिता या अर्चना यांचे भाऊ प्रवीण यांच्या पत्नी होत्या. प्रवीण यांचा मृत्यू झाला.

अर्चना यांचा भाऊ प्रविण पार्लेवारचा योगिता पुट्टेवारसोबत विवाह झाला होता. मृत पुरुषोत्तम पुट्टेवार हे योगिता यांचे वडील होते.प्रविण पार्लेवार यांचा २००७ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर योगिता यांनी पार्लेवार कुटुंबाच्या म्हणजे नवऱ्याच्या संपत्तीवर दावा सांगितला.आपल्या मुलीला सासरची संपत्ती मिळावी यासाठी पुरुषोत्तम पुट्टेवार प्रयत्न करत होते. तर आपल्या माहेरची संपत्ती नणंदेला जाऊ नये यासाठी अर्चना प्रयत्नशील होत्या.

संपत्तीचा हा सर्व वाद कोर्टात गेला होता.

‘नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर संपत्ती मिळणार नाही,’ असं आरोपी अर्चनाने तिच्या भावाची पत्नी योगिता यांना बजावलं.योगिता यांना दोन मुली असल्याने कोर्टात तिची बाजू वरचढ ठरत होती. योगितांच्या वतीने त्यांचे वडील मृत पुरुषोत्तम पुट्टेवार हेच पूर्ण प्रकरण हाताळत होते. त्यामुळे पुरुषोत्तम यांचाच काटा काढला तर हे संपत्तीच्या वादाचे प्रकरण आणखी कमकुवत होईल. पुरुषोत्तम गेल्यानंतर योगिताच्या बाजूने कोणीही लढणारे नसेल असा विचार करत अर्चना यांनी शांतपणे पुरुषोत्तम यांच्या हत्येचा कट रचला, असे पोलिसांनी सांगितले.

फक्त माहेरच्या संपत्तीसाठी अर्चनाने वृद्ध सासऱ्याचा खून केला. पण, या प्रकरणात सरकारी अधिकारी असलेली अर्चनाच नाहीतर तिच्या सरकारी अधिकारी असलेल्या भावाचाही समावेश आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चनाचा भाऊ प्रशांत पार्लेवार जो केंद्र सरकारचा अधिकारी आहे तो देखील या प्रकरणात आरोपी आहे.पार्लेवार कुटुंबाची संपत्ती फक्त अर्चना आणि प्रशांत दोघांना वाटून घ्यायची होती. (revealed)यामध्ये त्यांचा मृत भाऊ प्रविण पार्लेवारच्या पत्नी योगिताला हिस्सा द्यायचा नव्हता.त्यामुळे योगिताला या प्रकरणात मदत करणारे तिचे वडील पुरुषोत्तम पुट्टेवार यांचाच काटा काढण्यासाठी अर्चनाने प्लॅन आखला आणि तिला प्रशांत पार्लेवार यांनी मदत केली.

या हिट अँड रन अपघातासाठी कार चालक पुरविणे, कार खरेदी करण्यात मदत करणे हे काम प्रशांत पार्लेवार यांनीच केले. त्यांना अद्याप अटक झालेली नाही.पण, अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी सांगितले. प्रशांत पार्लेवार केंद्र सरकारचे अधिकारी आहेत. तसेच ते नागपुरातील एका बड्या नेत्याच्या जवळचे असल्याची माहिती आहे.अर्चनाच्या माहेरी कोट्यवधींची रुपयांची संपत्ती आहे. आतापर्यंत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अर्चनाच्या माहेरी पार्लेवार कुटुंबाकडे जवळपास २२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. या व्यतिरिक्त आणखी काही संपत्ती आहे का याची शहानिशा पोलीस करत आहेत.

यात नागपुरातील मध्यवर्ती भागात उंटखाना परिसरात ५५०० स्क्वेअर फुटांचा प्लॉट आणि व्यावसायिक दुकानं आहेत. या प्रकरणात तपास सुरूच असून संपत्तीत आणखी काही भर पडते का? याचाही पोलीस तपास करत आहेत.पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मुलगा आणि आरोपी अर्चनाचा नवरा मनिष पुट्टेवार डॉक्टर आहे. पण, स्वतःची पत्नी वडिलांच्या हत्येची प्लॅनिंग करत असल्याची भनक सुद्धा त्याला नव्हती.याआधी दोनवेळा अपघात झाल्यानं वडिलांनी आपल्या क्लिनिकमध्ये उपचार घेतले. पण, असं काही प्रकरण असेल असं वाटलं नव्हतं अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

या प्रकरणात पोलिसांनी घटनेची मास्टरमाईंड अर्चना पार्लेवार-पुट्टेवार, अर्चनाचा ड्रायव्हर सार्थक बागडे, त्याचे मित्र सचिन धार्मिक आणि निरज निमजे, तसेच आरोपींसोबत सुपारीच्या पैशांचा व्यवहार करणारी अर्चनाची सेक्रेटरी पायल नागेश्वर या पाच आरोपींना अटक केली असून केंद्र सरकारचा अधिकारी प्रशांत पार्लेवारला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.या आरोपींवर हत्येचा कट रचणे आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढे आणखी कोणी आरोपी आहेत का? याचाही तपास करणार असल्याचे पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी सांगितले.

हेही वाचा :

इचलकरंजीत ऐन पावसाळ्यात तीव्र पाणी टंचाई

पुढील 15 तास हवामान विभागाकडून हायअलर्ट

ठाकरे गटात ठिणगी, शिवसेनेच्या बड्या नेत्याविरोधात दंड थोपटले