कोल्हापूर काँग्रेसने अवघ्या अडीच वर्षांत गमावले दोन निष्ठावंत आमदार…

कोल्हापूर काँग्रेसने(Congress) अवघ्या अडीच वर्षांत दोन मोठे आघात सहन केले आहेत. मोदी लाटेतही आपली लोकप्रियता कायम राखून कोल्हापूरमधून निवडून आलेले चंद्रकांत जाधव आणि पांडुरंग निवृत्ती पाटील (पी. एन. पाटील) हे दोन आमदार काँग्रेसने गेल्या अडीच वर्षांच्या फरकाने गमावले आहेत. बलाढ्य सत्ताधाऱ्यांशी लढताना काँग्रेसवर निष्ठा ठेवून वाटचाल करणाऱ्या जाधव आणि पाटील यांच्या निधनामुळे काँग्रेसचे कोल्हापूरमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अनेक राजकीय वादळातही पी. एन. यांनी आपली निष्ठा कायम काँग्रेसवर ठेवली.

घरात पाय घसरून पडल्यामुळे 19 मे रोजी पी. एन. पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दखल करण्यात आले होते. त्यानंतर एअर ॲम्बुलन्सद्वारे मुंबईला उपचारासाठी नेण्यात आले होते. उपचादारादरम्यान पाटील यांची आज (ता. 23 मे 2024) प्राणज्योत मालवली. पक्षफोडीच्या या राजकीय दलदलीत खरी निष्ठा काय असते, हे पी. एन. पाटील यांनी दाखवून दिले. अनेक मोठ्या राजकीय वादळातही त्यांनी काँग्रेसवरील आपली निष्ठा कायम राखली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी 1999 मध्ये कोल्हापूर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची आव्हानात्मक जबाबदारी स्वीकारली.

पी. एन. पाटील हे प्रथम 2004 मध्ये आमदार झाले. पण पुढच्या सलग दोन (2009 आणि 2014) निवडणुकांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. खरं तर हे दोन्ही पराभव पक्षातील लोकांनी गद्दारी केल्यामुळेच झाले होते. मात्र, त्याबाबत कुठेही वाच्यता न करता पी. एन. पाटील आपली राजकीय लढाई लढत राहिले. पुढे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते करवीरमधून चंद्रदीप नरके यांचा पराभव करून पुन्हा आमदार झाले.

काँग्रेस(Congress) पक्षावर कायम निष्ठा राखणाऱ्या पी. एन. पाटील यांना मंत्रिपदाच्या स्पर्धेत कायम त्यागाची भूमिका घ्यावी लागली. पण त्याबाबतची नाराजी त्यांनी कधीही बोलून दाखवली नाही. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे विश्वासू अशी पी. एन. पाटील यांची ओळख होती. २००४ मध्ये ते प्रथम निवडून आले होते. त्यामुळे त्यांना त्यावेळी मंत्रिपद मिळू शकले नाही. मात्र, २०१९ मध्ये महाविकास आघाडीमुळे त्यांना संधी मिळू शकली नाही.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असलेल्या आमदार पी. एन. पाटील यांना फेब्रुवारी 2023 मध्ये ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यावेळी त्यांनी ईडीसमोर हजेरी लावली नाही. त्यानंतर ईडीने पुणे, कोल्हापूरमध्ये ठिकठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर ते स्वतःहून ईडीसमोर उपस्थित राहिले होते.

दरम्यान, कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे(Congress) आमदार आणि उद्योगपती चंद्रकांत पंडित जाधव यांचे 02 डिसेंबर 2021 रोजी हैदराबाद येथे निधन झाले होते. आजारी असल्यामुळे त्यांना उपचारासाठी हैदराबाद येथे दाखल केले होते. मात्र त्यांचेही उपचारादरम्यान निधन झाले होते.

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत चंद्रकांत जाधव यांनी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला होता. कोरोनाच्या काळात त्यांना दोन वेळा कोरोना झाला होता. त्यातून ते ठणठणीत बरे झाले होते. मात्र त्यानंतर आजारी पडलेल्या जाधव यांना उपचारासाठी हैदराबाद येथे दाखल करण्यात आले होते. त्याच ठिकाणी त्यांची प्राणज्योत मालवली होती.

फुटबॉलप्रेमी आमदार अशी चंद्रकांत जाधव यांची ओळख होती. कोल्हापुरात फुटलबॉलचा खेळ रुजावा आणि तो मोठ्या प्रमाणात वाढावा, यासाठी ते कायम कार्यरत असायचे. त्यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी जयश्री जाधव या मोठ्या मताधिक्यांनी निवडून आल्या. चंद्रकांत जाधव यांचा राजकीय वारसा त्याच चालवित आहेत. या दोन निष्ठावंत आमदारांच्या निधनामुळे कोल्हापूर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दोन महत्वाचे नेते अवघ्या अडीच वर्षांत कोल्हापूर काँग्रेसला मुकावे लागले आहेत.

हेही वाचा :

गृहिणींचे बजेट बिघडणार, मेथी, कोंथिबीर महागली, एका जुडीचा दर तब्बल…

यंत्रमाग उद्योगाला अतिरिक्त वीज सवलतीसाठी मुख्यमंत्र्यांना महासंघाचे निवेदन

महाराष्ट्रात येऊ घातलेला आणखी एक मोठा उद्योग बाहेर…