कोल्हापूरच्या शिवसेनेला पाचवीला पुजलेली दुफळी!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : सुमारे 35 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख(political) बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात शिवसेनेची मुहूर्त मेढ लावण्यात आली. तिचा विस्तार झाला. जिल्ह्यात गाव तिथे शिवसेना दिसू लागली. मात्र इथल्या शाखेच्या स्थापनेपासून शिवसेना अंतर्गत दुफळी ही पाचवीला पुजलेली आहे असे आत्तापर्यंतचा इतिहास पाहता म्हणता येईल. आजच्या घडीला उद्धव ठाकरे यांच्या कोल्हापुरातील शिवसेनेत संजय पवार विरुद्ध रवी इंगवले असा संघर्ष विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झाला असून तो आता मुंबईतील मातोश्री पर्यंत पोहोचला आहे.

शेतकरी कामगार पक्षातील आक्रमकता संपल्यानंतर प्रखर हिंदुत्ववादी आणि आक्रमक असलेल्या शिवसेनेला कोल्हापुरात आपले पाय रोवण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली. या संधीचे सोने करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूर दौरे सुरू झाले. आणि मग त्यांच्याच उपस्थितीत कोल्हापुरात शिवसेनेची शाखा स्थापन करण्यात आली. कपिल तीर्थ मार्केट येथे सध्या जिथे कार पार्किंग आहे तिथे शिवसेनेचा पहिला फलक बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते दिनांक सहा मे 1986 रोजी सायंकाळी लावण्यात आला आणि त्याच दिवशी संध्याकाळी बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा झाली.

शिवसेनेचे(political) कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख म्हणून सुरेश साळोखे यांच्या नावाची घोषणा ठाकरे यांनीच केली होती. शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर वर्षभरातच रामभाऊ चव्हाण यांनी साळोखे हटाव अशी भूमिका घेतली. या दोघांच्या वादात 1990 मध्ये दिलीप देसाई हे शिवसेनेचे पहिले आमदार कोल्हापुरातून निवडून गेले.

‌दिलीप देसाई हे आमदार असताना सुरेश साळुंखे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. या दोघांचेही पटले नाही. दिलीप देसाई यांनी शिवसेनेतील बंडात छगन भुजबळ यांना साथ दिल्यानंतर त्यांच्या निवासस्थानावर सुरेश साळोखे यांनी मोर्चा काढला होता. नंतर सुरेश साळोखे हे आमदार झाले तेव्हा रामभाऊ चव्हाण जिल्हाप्रमुख होते. या दोघांमध्ये संघर्ष होता.

2009 मध्ये कोल्हापूर शहर मतदारसंघातून राजेश क्षीरसागर हे शिवसेनेचे आमदार झाले तेव्हा संजय पवार हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. या दोघांचेही कधी पटले नाही. संपर्कप्रमुख दिवाकर रावते यांचा मेळावा शाहू स्मारक भवन येथे झाला होता तेव्हा सभागृहाबाहेर शिवसेनेच्या दोन गटात राडा झाला होता. राजेश क्षीरसागर हे दुसऱ्यांदा आमदार झाले तेव्हा शिवसेनेचे शहर प्रमुख दुर्गेश लिंग्रज हे होते. क्षीरसागर यांनी त्यांना पदावरून हटवले आणि रवी किरण इंगवले यांची शिवसेनेच्या शहर प्रमुख पदी नियुक्ती करवून घेतली. क्षीरसागर आणि इंगवले. यांचेही कधी पटले नाही.

शहर प्रमुख विनायक साळोखे विरुद्ध रामभाऊ चव्हाण यांच्यातही बिनसले होते. शाहू स्टेडियम परिसरातील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेण्यासाठी रामभाऊ चव्हाण व त्यांच्या समर्थकांनी प्रयत्न केला होता तेव्हाही वातावरण तंग होते.राजेश क्षीरसागर हे पहिल्यांदा आमदार बंगल्यापासून त्यांचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्याशी कधीही जमले नाही.

शिवसेना(political) अविभाजित होती तोपर्यंत क्षीरसागर विरुद्ध पवार हे दोन गट अस्तित्वात होते. शिवसेना फुटल्यानंतर क्षीरसागर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. संजय पवार हे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उपनेते असून शहर प्रमुख रवीकिरण इंगवले यांनी त्यांच्याविरुद्ध आघाडी उघडली आहे. “अंबाबाईला जनतेच साकडं, कोल्हापूरचा उत्तर मिळू दे”अशी होर्डिंग इंगवले यांनी शहरात प्रमुख ठिकाणी लावली आहेत.

इंगवले यांची ऑडिओ क्लिप चार-पाच दिवसापूर्वी व्हायरल झाली होती. त्यातून उबाठा सेनेत अंतर्गत बेदीली माजली असल्याचे स्पष्ट झाले. आता तर या दोघांमधील वाद मातोश्री पर्यंत पोहोचला आहे. या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कडून संजय पवार यांची उमेदवारी कोल्हापूर उत्तर या मतदारसंघातून निश्चित करण्यात आली तर पवार विरुद्ध इंगवले यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच कोल्हापूरच्या शिवसेनेमध्ये गेल्या 35 वर्षांपासून अंतर्गत गटातटाचे राजकारण आहे, दुफळी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना ही एकसंघ रहावी,
ती मजबूत व्हावी यासाठी आत्तापर्यंतच्या एकाही संपर्क प्रमुखाने प्रयत्न केलेले नाहीत हे वास्तव आहे.

हेही वाचा:

मारुतीची सर्वात स्वस्त कार ‘या’ दिवशी होणार लाँच

शिक्षकाच्या अंगात भूत शिरले की काय? अचानक वर्गात करू लागले विचित्र कृत्य

अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर जाणूनबुजून केलेला कट?, आव्हाडांच्या पोस्टने उडाली खळबळ