मागची १० वर्षे सत्ता तुमची आणि हिशेब माझ्याकडे कसा मागता?

देशात केंद्र सरकारचा ज्या पद्धतीने कारभार सुरू आहे, (Govt)तो एककेंद्री प्रवृत्तीचा आहे. सध्या मोदींची शक्ती कमी करणे देशाची गरज आहे. मोदींची एक एक जागा कमी करणे, मोदींची संसदेतील संख्या कमी करणे ही देशाची गरज आहे. देशाची सत्ता मोदींच्या हाती आहे. मागील 10 वर्षे त्यांच्याकडे सत्ता आहे आणि हिशेब माझ्याकडे कसा मागतात? असा सवाल खा. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. राज्यात 70 टक्के जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला.

आ. शशिकांत शिंदे यांचा लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सातार्‍यातील प्रीती (Govt)एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण, खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील, डॉ. भारत पाटणकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने उपस्थित होते.

खा. शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट असल्यामुळे राज्यात मविआच्या 70 टक्के जागा निवडून येतील. आम्ही महाराष्ट्रात जिथे दौरा करतो तेथे मतदार राजा आम्हाला प्रतिसाद देत आहे. सातारा जिल्ह्यात आम्ही आ. शशिकांत शिंदे हा उमेदवार दिला आहे. उमेदवारी अर्ज भरताना झालेले शक्तिप्रदर्शन ही परिवर्तनाची सुरुवात आहे. पुरोगामी विचारांचा सातारा जिल्हा नेहमीच परिवर्तनाला बळ देतो, जे चांगलं आहे त्यालाच प्राधान्य देतो. गेल्यावेळी आघाडी नव्हती आता आघाडी आहे. एक एक जागा निवडून आणण्यासाठी इंडिया आघाडी काम करतेय. शशिकांत शिंदे हे आमचे नाणे खणखणीत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भात आरोप करणारे नेमके आत्ताच आरोप का करतात हे समजत नाही, असेही पवार म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या टीकेवर खा. पवार म्हणाले, गेल्या 10 वर्षांत त्यांचीच सत्ता होती त्यामुळे अमित शहा यांनी काय केले ते त्यांनी सांगावे? 2004 ते 2014 या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबरोबर मी महाराष्ट्रासाठी काय केले हे मात्र निश्चित सांगू शकतो. इंडिया आघाडीच्या उमेदवारांना समाजातील सर्व घटकांचा पाठिंबा आहे. मागील निवडणुकीत विरोधकांना एकूण 6 जागा मिळाल्या होत्या. त्यात आम्हाला 4, काँग्रेसला 1 तर एमआयएमला 1 अशा जागा होत्या. या निवडणुकीत यंदा 70 टक्के जागांवर आम्ही विजयी झालो तर आश्चर्य वाटणार नाही. विशेषत: विदर्भात काँग्रेसला यश मिळेल, असेही खा. पवार म्हणाले.

सुनेत्रा पवारांच्या विधानाबाबत छेडले असता खा. पवार म्हणाले, मी तसं बोललो नव्हतो, मला प्रश्न विचारला होता, अजित पवारांनी भाषण केले होते, त्यात मला निवडून दिले, लेकीला निवडून दिले आता सुनेला निवडून द्या असं म्हणत पुढे त्यांनी एक वाक्य वापरलं. त्यावर मी प्रतिक्रिया दिली होती. त्यापेक्षा वेगळे काही सांगितले नाही. या देशात महिला आरक्षणाचा निर्णय राज्यात घेणारा मुख्यमंत्री मी होतो. शासकीय सेवेत विशिष्ट आरक्षण देण्याचा निर्णय मी घेतला. संरक्षण दलात मुलींना सहभागी करून देण्याचा निर्णय मी घेतला. त्यामुळे महिलांना प्रतिष्ठा मिळवून देण्याची काळजी मी घेतली. कारण नसताना एखाद्या शब्दावरून वेगळे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी फार यशस्वी होणार नाही.

आ. रामराजे ना. निंबाळकर यांचे बंधू रघुनाथराजे यांनी तुतारी हाती घेतली याबाबत छेडले असता खा. पवार म्हणाले, माझे कोणाशी बोलणे झाले नाही. काल अकलूज येथे रघुनाथ राजे हे मोहिते-पाटील यांच्या तिथे आले होते. त्यांनी सांगितले की फलटण परिसरातील लोकांचा पाठिंबा हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला असेल. आमचे सर्व सहकारी ताकतीने काम करतील. त्यांनी कार्यकर्त्यांची नावे मात्र सांगितली नाहीत. राज ठाकरेंचं मत परिवर्तन झालं असेल, ते अधूनमधून होत असते. गेल्या अनेक वर्षांचा अनुभव पाहिला तर त्यावेळची स्थिती योग्य होती, तेव्हा मुक्तपणे त्यांनी आपली मते मांडली असेही पवारांनी सांगितले.

मराठवाड्यात जरांगे पाटील यांच्याबद्दल आस्था आहे, परंतु त्याचं मतात किती रुपांतर होईल हे मला सांगता येणार नाही. मनोज जरांगे पाटील आणि माझी फारशी ओळख नाही. मी राज्यात फिरत असल्याने त्यांची व माझी भेट नाही. आंदोलनाच्या सुरुवातीला त्यांचा प्रश्न समजून घेण्यासाठी एकदाच भेट झाली. त्यानंतर पुन्हा माझी त्यांची भेट नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केले.

दुष्काळ हा प्रचाराचा मुद्दा असू शकत नाही का? या प्रश्नावर खा. शरद पवार म्हणाले, दुष्काळ हा मुद्दा नक्की आहे. आम्ही लोकांनीसुध्दा राज्य व केंद्र सरकारसमोर हा प्रस्ताव मांडलेला आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून आचारसंहिता आहे. त्यामुळे काही गोष्टींचा निर्णय जाहीर करायला मर्यादा दिसते. आम्हा लोकांना बाजूला ठेवा पण दुष्काळी भागातील लोकांना जगवा. जनावरांना चारा द्या, काही ठिकाणी पाण्याची सोय करा हा आग्रह आम्ही केंद्रसरकारकडे केला असून त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले.

हेही वाचा :

लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के यशासाठी अजित पवार यांची सर्वात मोठी रणनीती

धोनीच्या फटेबाजीनंतर गावसकर Live मॅचमध्ये पंड्यावर बरसले! 

आमदार आवाडेंच्या बंडखोरीमागे नेमका कोणाचा हात? राजकीय क्षेत्रात चर्चेला ऊत