आवाडे पिता-पुत्रांच्या हातात आता “कमळ”!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गेल्या पाच वर्षांपासून विधानसभेत भारतीय जनता पक्षाचे(political circle) सहयोगी सदस्य असलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांनी बुधवारी अमित शहांच्या कोल्हापूर दौऱ्याचे निमित्त साधून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी त्यांचे चिरंजीव डॉक्टर राहुल आवाडे यांचा राजकीय प्रवास अधिक सुकर व्हावा म्हणून हा निर्णय घेतला आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीत डॉक्टर राहुल हे भाजपचे उमेदवार असतील. आवाडे हे इचलकरंजी या वस्त्रानगरीतील महत्त्वकांक्षी राजकीय घराणे आहे.

वस्त्र नगरीतील लोकांचे भाजपशी “सुत” कधीही जुळू नये यासाठी कायमपणे प्रयत्न करणाऱ्या आवाडे यांच्यासाठी
पायघड्या घातल्या गेल्याबद्दल भाजपमध्ये(political circle) नाराजी आहे, ही नाराजी दूर करण्याचे आव्हान आवाडे पिता-पुत्रांसमोर असणार आहे.

आमदार, राज्यमंत्री, खासदार अशी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द असणाऱ्या कल्लाप्पांना आवाडे दादांनी आता जवळपास राजकारण सोडले आहे. त्यांनी राजकीय निवृत्ती स्वीकारली आहे. त्यांचे चिरंजीव प्रकाश आवाडे हे विद्यमान आमदार आहेतच शिवाय त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम केले आहे. ते सहकार खात्याचे राज्यमंत्री होते. त्यांच्या पत्नी सौ. किशोरी आवाडे या अनेक वर्षे नगराध्यक्ष होत्या.

प्रकाश आवाडे यांचा विधानसभेत पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सुरेश हळवणकर यांचा आमदार म्हणून राजकीय उदय झाला. त्यानंतर मात्र प्रकाश आवाडे यांनी त्यांचे सेक्युलर विचार बदलले. त्यांनी काँग्रेसचा “हात” सोडला. ताराराणी आघाडीची स्थापना केली. हिंदुत्ववादी विचार मांडण्यास सुरुवात केली. आणि 2019 मध्ये ते अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून गेले. नंतरच्या राजकारणात ते भाजपचे सहयोगी सदस्य बनले आणि त्यांचा प्रवास भाजपाकडे सुरू झाला. ते बुधवारी भारतीय जनता पक्षाच्या स्टेशनवर उतरले.

ठोस शब्द घेऊनच आवाडे पिता पुत्र भाजपवासी झालेले आहेत, यात शंका घ्यायचं कारण नाही. पण इचलकरंजी शहरात “कमळ” खुलवणाऱ्या सुरेश हाळवणकर यांचे राजकीय पुनर्वसन कसं करणार? राहुल आवाडे यांचा भाजपने विधानसभेसाठी विचार केला तर मी नाराज होणार नाही, आणि बंडखोरी सुद्धा करणार नाही असे हळवणकर यांनी स्पष्टपणे सांगितले असले तरी ते मनापासून बोलतात असं नाही. त्यांच्या मनात कुठेतरी सल आहे. ते नाराज आहेत. आपली नाराजी त्यांनी दाखवून दिलेली नाही.

आवाडे यांच्या पक्षप्रवेशामुळे इचलकरंजी शहरात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली हे खरंच आहे पण भाजपची मजबूत बांधणी या आधीच झाली आहे. शंकरराव पुजारी, मिश्रीलाल जाजू, सुरेश हाळवणकर यांचे त्यात मोठा योगदान आहे. सुमारे 40 वर्षांपूर्वी आधी जनसंघ आणि नंतर भाजपची आजरा, मलकापूर आणि इचलकरंजी ही तीनच पॉकेट्स होती. तिथे भाजपचा प्रभाव होता आणि आहे. आता तो जिल्हाभर पसरला असला तरी या तीन पॉकेट्सच महत्त्व कमी होत नाही.

आवाडे घराण्याचे या वस्त्र नगरीत तथा इचलकरंजी, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात संस्थात्मक कार्य मोठे आहे. आवडे यांच्यामुळे इचलकरंजी मतदारसंघ अधिक बळकट होईल. नव्याने स्थापन झालेली इचलकरंजी महापालिका भाजपच्या हाती येऊ शकते, शिवाय त्यांचा दोन तालुक्यातील प्रभावाचा भाजपला फायदा होईल, असा हिशोब भाजपने केलेला दिसतो. शिवाय पाच वर्षे आवाडे हे भाजपचे(political circle) सहयोगी सदस्य राहिले आहेत. बदलत्या राजकारणातही त्यांनी वेगळा विचार केला नाही हे प्लस पॉईंटही त्यांच्याकडे असल्याने भाजप नेत्यांनी आवडे यांना अधिकचे महत्त्व दिलेले आहे. हे महत्त्व देताना या वस्त्र नगरीतील “शंभर धागे दुःखा”चे होणार नाहीत याची खबरदारी भाजपच्या नेत्यांनी नक्कीच घेतली असणार.

गेल्या काही वर्षांपासून भारतीय जनता पक्षाकडे इतर पक्षातील कार्यकर्ते आणि नेते यांची वर्दळ सुरू आहे. नव्या लोकांना आत घेताना, त्यांना महत्त्व दिले जात आहे. जुन्या निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांच्या कडे पक्ष नेतृत्वाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. याच कारणावरून बाबा देसाई यांच्या नेतृत्वाखाली निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली होती.

पक्ष वाढीसाठी, पक्ष विस्तारासाठी इतर पक्षातील लोकांच्यासाठी दरवाजे उघडे ठेवताना, त्याच दरवाज्यातून निष्ठावंत कार्यकर्ते बाहेर जाणार नाहीत याची दक्षता घ्या असा अप्रत्यक्ष इशाराच भाजप नेतृत्वाला यापूर्वी देण्यात आला होता. भाजप अंतर्गत असलेली ही खदखद लक्षात घेऊन प्रकाश आवाडे आणि त्यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांना काम करावे लागणार आहे आणि त्यासाठी त्यांच्या राजकीय कौशल्याचा “कस” लागणार आहे.

हेही वाचा:

विराटची एक झलक पाहण्यासाठी 15 वर्षांच्या मुलाने केलं असं काही

कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार, कृष्णराज महाडिकांनी शड्डू ठोकला

‘शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माझ्या संपर्कात’, मातब्बर नेत्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!