महाविकास आघाडी तडीपार युतीच्या गळ्यात विजयाचा हार

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : विधानसभा(political news todyas) निवडणुकीच्या राज्यातील निकालाचे प्रतिबिंब कोल्हापूर जिल्ह्यात पडले आहे. महायुतीने जोरदार मुसंडी मारत जिल्ह्यातून महाविकास आघाडीला तडीपार केले आहे. लाडकी बहीण योजना आणि हिंदू मतांचे ध्रुवीकरण या दोन बाबी महायुतीसाठी गेम चेंजर ठरल्या. जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाने सतेज पाटील यांची जिल्ह्याच्या राजकारणातून पीछेहाट झाली आहे. त्यांच्या राजकीय महत्त्वकांक्षेला लगाम बसला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांचा या जिल्ह्यातील राजकीय दबदबा संपुष्टात आला आहे.

2014 मध्ये जिल्ह्यातील दहा पैकी सहा आमदार शिवसेनेचे होते. 2019 मध्ये शिवसेना बॅक फुटवर गेली होती. गेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी आपले संघटन कौशल्य दाखवून दहा पैकी चार जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आणले होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कोल्हापूर जिल्हा हा तर बालेकिल्ला होता. पण या किल्ल्याचे बुरुज हळूहळू ढासळत गेले.

आता तर त्यांच्या गटाचे नामोनिशानही या जिल्ह्यात(political news todyas) राहिलेले नाही. महाविकास आघाडीचा दारुण पराभव हा सतेज पाटील यांच्यासाठी व्यक्तिगत पातळीवरील मोठा धक्का मानला जातो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात चांगले यश मिळाले होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अर्थात काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती हे विजयी झाले आहेत. पण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदारांना आपली चमक धमक दाखवता आलेली नाही.

करवीर विधानसभा मतदारसंघातील राहुल पी एन पाटील यांना निवडून आणण्याची नैतिक जबाबदारी विद्यमान खासदारांना पार पाडता आलेली नाही. कोल्हापूर उत्तर मध्ये महाविकास आघाडीला विजयाचे खाते उघडता आले असते तथापि दरबारी राजकारण आडवे आले आणि काँग्रेसची हक्काची जागा महायुतीकडे गेली.

शरद पवार यांचे कोल्हापूर हे आजोळ. कोल्हापूरच्या जनतेशी त्यांचा तसा जिव्हाळा. कागल विधानसभा मतदारसंघातून
हसन मुश्रीफ यांचा कोणत्याही स्थितीत पराभव करायचाच अशी भूमिका घेऊन मोठ्या निर्धाराने ते कोल्हापूरच्या प्रचारात उतरले होते. समरजीत सिंह घाटगे यांच्या विजयासाठी त्यांनी चांगले प्रयत्न केले होते. त्यांच्या भगिनी सरोज पाटील
ह्या सुद्धा मुश्रीफ यांच्या पाडावासाठी मोठ्या जिद्दीने या मतदारसंघात उतरल्या होत्या.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांनी मुसळधार पावसात भाषण केले होते. पण तेथे मतांचा पाऊस मात्र काही पडला नाही. एक दोन महिन्यापूर्वीच भारतीय जनता पक्षात दाखल झालेल्या राहुल आवाडे यांना तेथे विजयाचे वस्त्र विनता आले. त्यांच्या विजयात सुरेश हळवनकर यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे.

कोल्हापूर उत्तर मध्ये महाविकास आघाडी कडून मधुरिमा राजे छत्रपती यांनी ऐनवेळी काँग्रेसची उमेदवारी मागे घेतली नसती तर कदाचित या मतदारसंघाचे उत्तर वेगळे आले असते. या मतदारसंघातून काँग्रेसचा हात गायब झाला त्याचाही मोठा फटका महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांना बसला. राजेश लाटकर यांना शहराच्या “ई” वार्डने चांगली साथ दिली तर महायुतीच्या राजेश क्षीरसागर यांना कोल्हापूरच्या पेठांनी मोलाची साथ दिली. त्यामुळेच त्यांचा विजय झाला.

राधानगरी भुदरगड विधानसभा(political news todyas) मतदारसंघात विद्यमान आमदार प्रकाश अबिटकर यांनी हॅट्रिक केली. शिवसेनेच्या आतापर्यंतच्या कोणाही आमदाराला हॅट्रिक करता आलेली नाही. अबिटकर यांनी मात्र, ही परंपरा मोडीत काढत तिसऱ्यांदा विजय हस्तगत केला. के पी पाटील आणि त्यांचे मेहुणे के वाय पाटील हे दोघेही या मतदारसंघात रिंगणात होते. पण मतदारांनी मेव्हण्या पाहुण्यांच्या राजकारणाला सोडचिठ्ठी देत अबिटकर यांना पसंती दिली.

के पी पाटील यांनी दोन महिन्यात एकापेक्षा अधिक वेळा पक्ष बदल केले. हे तेथील जनतेला पटलेले दिसत नाही.
राजेंद्र पाटील यड्रावकर हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते. नंतर त्यांनी शिंदेंना साथ दिली. पण तरीही मतदारांनी त्यांची साथ सोडली नाही. चांगले मताधिक्य घेत ते निवडून आले. हातकणंगले या राखीव मतदारसंघात काँग्रेसच्या विद्यमान आमदार असलेल्या राजीव बाबा आवळे यांना पराभवाचा धक्का देत दलित मित्र अशोकराव माने यांनी विजयाचा झेंडा फडकवला आहे. चंदगड मध्ये राष्ट्रवादीचे राजेश पाटील, शरद पवार गटाच्या डॉक्टर नंदाताई बाभुळकर आणि अपक्ष शिवाजीराव पाटील यांच्यात लढत होती. या तिरंगी लढतीत अपक्ष उमेदवारांने अनपेक्षितपणे विजयाची हंडी फोडली.

कोल्हापूर जिल्ह्यात दहाच्या दहा जागांवर महायुतीची(political news todyas) मोहर लागेल असे राजकीय विश्लेषकांनाही वाटत नव्हते. महाविकास आघाडीच्या किमान काही जागा येथील असे वातावरण होते. करवीर, कागल, कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण इथे महाविकास आघाडी जिंकेल असे वाटत होते. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील मतदारांनी महायुतीला निर्विवाद कौल दिला आहे. लाडकी बहिण योजना आणि मताचे ध्रुवीकरण यामुळे महायुतीला यश मिळाले आहे असे म्हणता येईल.

हेही वाचा :

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचा सुपडासाफ; महायुती ठरली ‘बाजीगर’

निकालानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य!

शरद पवारांना धक्का, अजित पवार पुन्हा घेणार आमदारकीची शपथ