कोल्हापुरात मोठी चोरी; तब्बल साडेअठरा तोळे सोन्यासह रोकड लंपास

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील दोन घरातून शस्त्राचा धाक दाखवून साडेअठरा तोळे सोने आणि रोख 50 हजार रुपये घेऊन अज्ञात चोरट्यांनी पलायन केले. दरम्यान, अन्य दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला. प्रदीप मारुती चव्हाण यांच्या घरातील आतून असणारी कडी कटावणीने तोडून घरात प्रवेश केला. आवाजाने घरातील लोक जागे झाले. त्यामुळे चोरट्यांनी(Theft) प्रदीप चव्हाण यांच्या आईच्या गळ्यात असलेली सोन्याची साखळी हिसकावून घेऊन पलायन केले.

या प्रकारानंतर चोरट्यांनी(Theft) तळसंदे वारणानगर रोडवरील सीमा बायोटेकनजीक असलेल्या बाळासाहेब चौगुले वाठारकर यांच्या घराकडे मोर्चा वळवला. या घरातील बाळासाहेब व त्यांच्या पत्नी गावातच असलेल्या नातेवाईकांच्या घरी मृत्यू झाल्याने रात्री गेले होते. मुलगा सुधीर बाहेरगावी गेला होता.

त्यामुळे बाळासाहेब यांनी जाताना घराला बाहेरून कुलूप लावले होते व घरी त्यांची सून प्रीतम सुधीर चौगुले, नात सिद्धी सुधीर चौगुले (वय ४) या घरी होत्या. चोरट्यांनी घराला बाहेरून असलेले कुलूप तोडून घरात प्रवेश केला. एका खोलीतील रोख रक्कम चोरट्यांना मिळाली.

दरम्यान, दुसऱ्या खोलीत प्रवेश करताच तिथे सून प्रीतम व नात सिद्धी झोपल्या होत्या. चोरट्यांचा आवाज ऐकून त्या जाग्या झाल्या व भयभीत झाल्या. चोरट्यांनी प्रीतम व सिद्धी यांच्या गळ्याला चाकू व कोयता लावला आणि तिजोरी फोडली. त्या तिजोरीत अठरा तोळे सोने व रोख ४५ हजार रुपये घेऊन पलायन केले.

प्रीतम व सिद्धी जोराने ओरडू लागल्याने शेजाऱ्यांना जाग आली. परंतु, चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वीच शेजाऱ्यांच्या घराला बाहेरून कडी लावली होती. या घटनेनंतर शेजाऱ्यांनी नवजीवन दूध संस्थेच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधून सायरन वाजविण्यात आला. त्यामुळे अख्खा गाव जागा झाला. तोपर्यंत चोरांनी पलायन केले होते. दोन्ही घरातील मिळून साडेअठरा तोळे सोने व रोख 50 हजार रुपये घेऊन चोरटे पसार झाले. या घटनेची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली असून, अधिक तपास वडगाव पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

आत्याबाईला मिश्या असत्या तर? जर आणि तर ची भाषा निरोपयोगी

लसूण सोलून फ्रीजमध्ये ठेवणे योग्य की अयोग्य? तज्ञांकडून जाणून घ्या

महिलांना 50 टक्के सवलत दिल्यामुळेच एसटी तोट्यात गेली, परिवहन मंत्र्यांची कबुली

महाकुंभात स्नान करण्यासाठी जाणाऱ्या महिलांनो सावधान! तुमचे फोटो होतायेत व्हायरल