मराठा आरक्षणासाठी (reservation system) ८ जून पासून उपोषण सुरु केलेल्या मनोज जरांगेंनी आज सहाव्या दिवशी त्यांचं उपोषण मागे घेतलं आहे. सगे-सोयऱ्यांच्या अंमलजावणीसाठी त्यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे एक महिन्यात सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर नाव घेऊन उमेदवार पाडू असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. मनोज जरांगे यांनी याआधीही आंदोलनं केली आहेत. त्या आंदोलनांमधून विविध तोडगेही निघालेले महाराष्ट्राने पाहिलं आहे. अशात मनोज जरांगेंनी महत्त्वाचा इशारा सरकारला दिला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
“आम्ही दिलेल्या व्याखेप्रमाणे सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी. ५७ लाख नोंदी मिळाल्या आहेत, त्यांचा आधार घेत मराठा आणि कुणबी एकच आहेत असा कायदा आणावा. हैदराबादचे गॅझेट आपल्या राज्यातही लागू करावं. सातारा संस्थानचं गॅझेट लागू करावं. आंतरवली सराटीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्यावेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना तातडीने प्रमाणपत्र वाटप करावं. या मागण्या मनोज जरांगेंनी शंभूराज देसाईंकडे केल्या आहेत.
तर नावं घेऊन उमेदवार पाडणार
यानंतर मनोज जरांगे म्हणाले, “आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तर आम्ही आता राजकारणात उतरणार आहोत, तसंच नावं घेऊन उमेदवार पाडणार प्रसंगी काही ठिकाणी उमेदवार देणार नाही पण नावं घेऊन उमेदवार पाडणार एवढं लक्षात घ्या असा थेट इशाराही मनोज जरांगेंनी दिलं आहे. शंभूराज देसाईंनी एक महिन्याचा वेळ मागितला आहे. त्यानुसार हा वेळ दिल्यावर जरांगे यांनी एक महिन्याचा वेळ देत उपोषण स्थगित केलं.
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला मोठा फटका बसला आहे. त्यातून धडा घेत भाजपा आणि महायुतीने कंबर कसून तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडीने १८५ जागा जिंकण्याचा दावा केला आहे. तर आता मनोज जरांगेंनी नावं घेऊन उमेदवार पाडू असा इशारा दिला आहे. त्यामुळे सरकार नेमकं मराठा आरक्षणाबाबत आणि सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीबाबत काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच सरकारने दिलेल्या मुदतीत अंमलबजावणी केली नाही तर मनोज जरांगे राजकारणात उतरणार का? तसंच कुणाकुणाला पाडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
हेही वाचा :
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये चक्क माणसाचं कापलेलं बोट…
पाकिस्तान संघावर चालणार देशद्रोहाचा खटला…