पुढील दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या(congress) जवळ येतील किंवा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय सर्वोत्तम आहे असे त्यांना वाटत असेल असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शरद पवार यांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार यांची एका इंग्रजी दैनिकाने नुकतीच मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी सद्य राजकीय परिस्थितीबद्दल भाष्य करताना हे विधान केले. राष्ट्रवादी काँग्रेस(congress) पक्षही काँग्रेसमध्ये विलीन होणार का, असा प्रश्नही पवार यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना ते म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीच फरक नसून दोन्ही पक्ष गांधी, नेहरू विचारसरणीचे आहेत. वैचारिकदृष्टय़ा काँग्रेसच्या जवळ असलो तरी पक्षाबाबतचा निर्णय हा सहकाऱयांशी सल्ला केल्यानंतर सामूहिकरीत्या घेतला जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेसुद्धा समविचारी पक्षांबरोबर एकत्र काम करण्याबद्दल सकारात्मक आहेत. त्यांची विचारसरणीही आमच्यासारखीच आहे, असे मतही पवार यांनी व्यक्त केले.
मोदींसोबत गेलेले नेते लोकांना आवडत नाहीत
शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फुटीबद्दल बोलताना, मोदींबरोबर गेलेले नेते लोकांना आवडत नाहीत, असे शरद पवार म्हणाले. सद्यस्थितीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे असून विरोधी पक्षांची विचारसरणी सर्वसाधारण असल्याने निवडून आल्यानंतर स्थिर सरकार दिले पाहिजे, असेही मत शरद पवार यांनी मांडले.
देशाचा कल मोदींविरुद्ध
अनेक प्रादेशिक पक्षांना भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी आवडत नाहीत. त्यामुळे ते भाजपाविरुद्ध एकत्र येऊ लागले आहेत. देशाचा कल मोदींविरुद्ध जातोय आणि आम्ही गांधी-नेहरू विचारसरणीनुसार सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहोत, असे शरद पवार म्हणाले.
अजित पवारांना पुन्हा स्वीकारणार नाही
शरद पवार यांनी या मुलाखतीमध्ये बारामतीतील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला. अजित पवार यांना राजकीयदृष्टय़ा परत यायचे असेल तर आम्ही त्यांना स्वीकारणार नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
1977 सारखी परिस्थिती येऊ शकते
मागील निवडणुकीच्या तुलनेत देशातील तरुणवर्ग हा सत्ताधारी पक्षापेक्षा विरोधी पक्षांशी जुळवून घेत आहे. 1977 मध्ये असेच घडले होते. निवडणुका जाहीर झाल्यानंतर विविध पक्ष एकत्र येऊन त्यांनी जनता पक्षाची स्थापना केली होती आणि सरकार स्थापन केले होते. आताही तशी परिस्थिती येऊ शकते असे शरद पवार म्हणाले. त्यावेळीही विरोधकांनी निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. मोरारजी देसाई यांची पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली ती नंतर झाली. जनता पक्ष स्थापन करण्यासाठी विलीन झालेल्या पक्षांच्या खासदारांशी बोलून जयप्रकाश नारायण आणि जे. बी. कृपलानी यांनी तो निर्णय घेतला होता, असे शरद पवार यांनी मुलाखतीत सांगितले. 1977 मधील मोरारजी देसाईंपेक्षा आज राहुल गांधींना पक्षांतर्गत सर्वाधिक समर्थन आहे, असेही पवार म्हणाले.
हेही वाचा :
आदित्य बिर्ला समूहाने भाजपला 100 कोटींची देणगी दिल अन् दोन महिन्यांतच…
IPL ची तिकिटं तुम्ही ऑनलाईन बूक करताय? पाहा ‘या’ मुलीसोबत काय घडलं… सावध व्हा
टेस्लाने सुरू केली ‘राइट-हँड ड्राईव्ह’ गाड्यांची निर्मिती; लवकरच भारतात करणार लाँच