कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात(politician website), एक राजकीय नेता म्हणून स्वतःची अशी “स्पेस” तयार करणाऱ्या आमदार पी एन पाटील यांची “एक्झिट” मनाला चटका लावून गेली. गेल्या चार दिवसांपासून येथील एका खाजगी रुणालयात त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. दुर्दैवाने ते हारले आणि मृत्यू जिंकला. पी एन पाटील यांची एक सरळमार्गी राजकारणी म्हणून दक्षिण महाराष्ट्रात ओळख होती. प्रत्यक्षात मात्र त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व दिले होते.
यशस्वी उद्योजक असलेले पी एन पाटील यांनी समाजकारणातून, सहकारात आणि सहकारातून राजकारणात (politician website) प्रवेश करताना स्वतःमधील “माणूस”जिवंत ठेवला होता. कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते माजी कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांचे ते जावई होत. पण कसबा सांगाव चे शामराव भिवाजी पाटील यांनी त्यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सहकारात आणले. सलग पाच वर्षे ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. बावीस वर्षे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते आणि सध्या ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून काम करत होते. केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळ, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ येथे त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जवळच्या वर्तुळातील ते होते. या दोघांमध्ये मैत्र होते. विलासराव देशमुख यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातील एका कार्यक्रमात बोलताना तुम्ही पी एन पाटील यांना विधानसभेवर पाठवा, त्यांना मंत्री करण्याची जबाबदारी माझी. असे आवाहन केले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत पी एन पाटील निवडून आले असते तर त्यांची राज्य मंत्रिमंडळात नक्की वर्णी लागली असती.
कोल्हापूर महापालिकेचे नेतृत्व महादेवराव महाडिक यांच्याकडे होते तेव्हा पी एन पाटील आणि अरुण नरके हे त्यांचे विश्वासू सहकारी होते. तेव्हा जिल्ह्याच्या राजकारणात”म.न.पा.”या नावाने या त्रिमूर्तीला ओळखले जात होते. कार्यकर्त्याला न्याय कसा द्यायचा हे त्यांच्याकडून शिकावे. महादेवराव महाडिक यांनी महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदावर संजय निकम यांना निवडून आणले होते. पण पी एन पाटील यांना ते मान्य नव्हते. त्यांना इंद्रजीत सलगर यांना सभापती करावयाचे होते. त्यांनी महाडिक यांना तसे सांगितले. संजय निकम यांची मिरवणूक घरी जाईपर्यंत, त्यांचा राजीनामा महाडिक यांनी घेतला होता. त्यानंतर इंद्रजीत सलगर हे महापालिका स्थायी समितीचे सभापती झाले.
कोल्हापूर महापालिका, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ तथा गोकुळ, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भोगावती सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, अशा अनेक संस्थांवर त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली होती. राजकारणासाठी राजकारण असे त्यांनी आपल्या राजकारणाचे सूत्र कधीही ठेवले नव्हते. शह, काटशह, साम, दाम, दंड आणि भेद अशा राजकारणावर त्यांचा विश्वास नव्हता.
फुलेवाडी परिसरातील त्यांचे गॅरेज आणि शाहूपुरीतील श्रीपतराव दादा बोंद्रे सहकारी बँक या दोन ठिकाणी ते लोकांच्या समस्या सोडवत असत. वेळ नाही, उद्या या, बघूया, असे त्यांनी त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांना कधी सांगितले नाही.
एक आमदार म्हणून त्यांचा प्रशासनावर वचक होता. पण ते केव्हाही बेकायदेशीर काम करा असे प्रशासनाला सांगत नसत. जे सनदशीर काम आहे ते मात्र झालेच पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. त्यांची अशी जगण्याची एक वेगळी स्टाईल होती. त्या स्टाईलवर टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी प्रयत्न करून त्या लाईफ स्टाईलला सोडचिट्टी दिली. त्यानंतर मतदार संघातील लोकांनीही त्यांना विधानसभेवर पाठवले.
विलासराव देशमुख हे हयात असते, तर त्यांनी पी एन पाटील यांना मंत्री केले असते. मंत्री पद मिळवण्यासाठी फिल्डिंग लावणे, लॉबी करणे, गटाची बांधणी करणे, पक्षश्रेष्ठींवर दबाव आणणे असे राजकारणातले प्रचलित प्रकार त्यांनी केले नाहीत. एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे आवश्यक असणारे नेतृत्व गुण होते. पण तरी त्यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली. राजकारणात आपणास हवे ते साध्य करण्यासाठी अनेक राजकारणी आपल्या उपद्रव मूल्याचा वापर करतात. तथापि पी एन पाटील यांनी आपले उपद्रव मूल्य निर्माण केले नाही, म्हणूनच त्यांना सरळमार्गी राजकारणी म्हणून ओळखले जात होते.
हेही वाचा :
मुलाला गुपचूप बेडरुममध्ये घेऊन गेली जान्हवी; वडिलांनी सीसीटीव्ही पाहताच…
AI च्या जाळ्यात गुरफटलेल्या बापाचा संघर्ष दाखवणाऱ्या Dharma- The AI Story ची रिलीज डेट जाहीर
शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला तरुणांकडून बेदम मारहाण