सेनेच्या जागांवर मनसेचा डोळा, पुतण्या विरोधात देणार हा शिलेदार?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठींबा
(support)दिला होता. राज ठाकरे यांनी भाजपच्या समर्थनार्थ राज्यात सहा सभा घेतल्या होत्या. निवडणुकीच्या निकालानंतर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, राज ठाकरे यांनी सभा घेतलेल्या सहाच्या सहा जागा निवडून आल्या. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर करून एकच खळबळ माजवली. त्या धक्क्यातून भाजप सावरत नाही तोच आता मनसेनेही भाजपचे टेन्शन वाढवले आहे. मनसेने आगामी विधानसभेसाठी 20 जागांची मागणी केली आहे. विशेष म्हणजे यातील अनेक जागांवर शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधान सभेच्या 288 जागांपैकी 20 जागांची मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर विधानसभा उमेदवारांची यादीही मनसेने तयार केली आहे. मनसेने भाजपकडे वरळी, दादर-माहीम, शिवडी, मागाठाणे, जागेश्वर, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, चेंबूर, ठाणे, भिवंडी ग्रामीण, दिंडोशी, कल्याण ग्रामीण, नाशिक पूर्व, पंढरपूर, औरंगाबाद आणि पुण्यातील एका जागा मागितली आहे.

उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि राज ठाकरे यांचे पुतणे आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेचे आमदार आहेत. ही जागा मनसेने भाजपकडे मागितली आहे. येथून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तर, वरळी शेजारील आणि राज ठाकरे यांचे वास्तव्य असणाऱ्या दादर – माहीम मतदारसंघाचीही मागणी मनसेने केली आहे. येथे शिंदे गटाचे सदा सरवणकर हे विद्यमान आमदार आहेत. येथून माजी आमदार नितीन सरदेसाई यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. याशिवाय शालिनी ठाकरे यांना वर्सोव्यातून तर माणसे नेते बाला नांदगावकर यांना शिवडी विधानसभेतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजपला केवळ 9 जागा मिळाल्या. मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एक जागा जिंकता आली. भाजपच्या जागा 23 वरून 9 वर आल्या आहेत. दुसरीकडे, इंडिया आघाडीअंतर्गत काँग्रेसला 13, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 9 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 8 जागा मिळाल्या आहेत. तर सांगलीमधून अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत. एनडीए आघाडीच्या जागा कमी झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस 14 जून रोजी आहे. राज्यभरातील मनसे कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर येणार आहेत. तर, भाजप प्रदेशने याच दिवशी मुंबईमध्ये जिल्हा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

हेही वाचा :

राहुल गांधींनी सांगितलं अयोध्येतील भाजपच्या पराभवाचं कारण

गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खानच्या घरी पोहचले पोलिस

रेशन कार्ड ला आधार लिंक करण्यासाठी तारखेत मुदतवाढ