कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : आंदोलन करण्यासाठी, एखादा वाद उपस्थित करण्यासाठी, विषय सापडत नसला की मग काहीजण हमखास संवेदनशील विषयाकडे वळतात. आता अचानक शिवाजी विद्यापीठ(Shivaji University) नामविस्ताराचा मुद्दा हिंदुत्ववादी संघटनांनी उपस्थित करून नजीकच्या काळात तो लावून धरला जाईल असा इशारा दिला आहे. या संघटनांनी उपस्थित केलेला मुद्दा योग्य असला तरी नामविस्तार झाल्यानंतर हे विद्यापीठ संक्षिप्त नावाने ओळखले जाईल त्याचे काय? हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.

साठ वर्षांपूर्वी शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली. तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांच्या हस्ते या विद्यापीठाचे उद्घाटन झाले होते. पण त्यानंतर शिवाजी विद्यापीठ या नावामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होतो असा आक्षेप वेळोवेळी घेतला गेला होता.
विद्यापीठाच्या(Shivaji University) प्रधान प्रशासकीय वास्तू समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे. आणि त्यामुळे हे विद्यापीठ त्यांच्याच नावाने स्थापन करण्यात आलेले आहे, शिवाजी विद्यापीठ या नावातून छत्रपती शिवरायांचा थेट एकेरी उल्लेख होतो असे म्हणता येत नाही. पण तरीही त्याचा नाम विस्तार झाला पाहिजे अशी वेळोवेळी मागणी करण्यात आली होती.
विश्व हिंदू परिषद, हिंदू महासभा, हिंदू एकता आंदोलन, सनातन संस्था, महाराष्ट्र मंदिर महासंघ, पतित पावन संघटना, शिवसेना ठाकरे गट आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या हिंदुत्ववादी संघटनांच्या कडून विद्यापीठाच्या नामविस्ताराचा मुद्दा हाती घेतला गेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची नावे अनेक ठिकाणांना देताना ती आदरयुक्त करण्यात आली आहेत. आणि म्हणूनच शिवाजी विद्यापीठाचेही छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे आदरयुक्त नामांतर किंवा नामविस्तार करण्यात यावा असा युक्तिवाद या हिंदुत्ववादी संघटनांनी केलेला आहे.

मुंबईच्या मुख्य रेल्वे स्थानकाला छत्रपती शिवाजी टर्मिनस असे नाव देण्यात आलेले असले तरी मुंबईकर या रेल्वे स्थानकाला सीएसटी असे म्हणतात. नामविस्तारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव प्रत्यक्षात घेतले जात नाही.
शिवाजी विद्यापीठाचा(Shivaji University) “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ”असा नामविस्तार केला गेला तर”सी एस एम व्ही”असे संक्षिप्त नावाने ते ओळखले जाईल. शिवाजी महाराजांचे नावच घेतले जाणार नाही हा मोठा धोका नामविस्तारामुळे पुढे दिसतो आहे. सुटसुटीत सात अक्षरी नावामुळे किमान छत्रपती शिवरायांचे नाव तरी तोंडी येते. नामविस्तार झाला तर हे नावच अदृश्य होणार आहे.
एस एन डी टी विद्यापीठ, डी के टी ई संस्था, के टी आय, अशा संक्षिप्त रूपाने ओळखल्या जाणाऱ्या शिक्षण संस्थांचे विस्तारित नाव काय आहे हे आजच्या पिढीला सांगताही येणार नाही. कोल्हापुरात शिवाजी पेठ आहे, शिवाजी चौक आहे. शिवाजी मंदिर आहे, शिवाजी टेक्निकल स्कूल आहे. मुंबईत शिवाजी पार्क आहे, शिवतीर्थ आहे, बहुतांशी सर्वच शहरात आणि जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची काही स्थळे आणि संस्था आहेत. त्याचाही आपण सर्वजण अप्रत्यक्षपणे एकेरीच उल्लेख करत असतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिमालया इतके काम, महापराक्रम कमी होत नाही.
जगातील 22 देशांमधील लष्करी महाविद्यालया मध्ये जमिनीवरचे युद्ध तंत्र हा अभ्यासक्रम शिकवला जातो आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे महान आहेतच, त्यांची जागा अन्य कोणीही घेऊ शकत नाही. सर्वसामान्य जनता शिवरायांचा उल्लेख आदरानेच करते. कोल्हापूरच्या या विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे विस्तारित नाव दिले तरीही सर्वसामान्य जनता “शिवाजी विद्यापीठ”असाच उल्लेख करणार आहे. याचाही विचार होणे गरजेचे आहे.
शिवाजी विद्यापीठाने(Shivaji University) जगातील काही प्रमुख देशांशी शैक्षणिक करार केलेले आहेत. त्यामुळे शिवाजी हे नाव जागतिक स्तरावर जाऊन पोहोचलेले आहे. शिवाजी विद्यापीठाने देशभर ठरलेल्या वेळेत परीक्षा घेणारे, निर्धारित वेळेत परीक्षेचा निकाल देणारे म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. शिवाजी विद्यापीठाचा नयनरम्य परिसर हा 850 एकर मध्ये पसरलेला आहे.

विद्यापीठातील विविध विभाग आपली स्वतंत्र ओळख करून देत असतात. शिक्षणाचा दर्जा ही उत्तम आहे. अनेक महान व्यक्तींच्या नावाने या शिवाजी विद्यापीठात अध्यासने आहेत. विद्यापीठाचा प्रत्येक विद्यार्थी हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव अतिशय आदराने घेत असतो. शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात यावा ही मागणी काही नवीन नाही. यापूर्वीही ती अनेकदा करण्यात आलेली होती. नामविस्तार केला तर हे विद्यापीठ संक्षिप्त नावाने ओळखले जाईल या भीतीपोटी नामविस्तार करण्यात आलेला नाही. हे हिंदुत्ववादी संघटनांनी इथे लक्षात घेतले पाहिजे.
शिक्षण विभागात संचालक पदावर काम करणारे डॉक्टर आप्पासाहेब पवार हे या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आहेत. विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज अगदी सुरुवातीला स्टेशन रोडवरील रेल्वे स्टेशनच्या समोरच्या दगडी इमारतीमध्ये चालायचे. नंतर विद्यापीठाचे हे कार्यालय सध्या जेथे हॉटेल ओपल आहे तेथे स्थलांतरित करण्यात आले होते. शिवाजी विद्यापीठाच्या 850 एकर जमिनीपैकी बऱ्याच जमीनी या शिवाजी पेठेतील सरनाईक, निकम, साळुंखे या शेतकऱ्यांच्या होत्या. हे आजच्या पिढीला माहीत असण्याची शक्यता फारच कमी आहे. शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार केला तर तो सर्वांना हवाच आहे मात्र हा नामविस्तार संक्षिप्त रूपात आला तर त्याचे काय?
हेही वाचा :
वयानुसार एका दिवसात किती बदाम खाणे आरोग्यासाठी फायदेशीर?; ‘ही’ आहे बदाम खाण्याची योग्य पद्धत
राजकीय भूकंपाची चाहूल? शिंदे कनेक्शन असलेलं ‘ते’ Whatsapp Status चर्चेत; काही दिवसांपूर्वीच…
राज्यात कधी थंडी तर कधी उन्हाचा तडाखा…! 48 तास महत्त्वाचे, जाणून घ्या महाराष्ट्रातील हवामान