पंधरवड्यावर आलेल्या दिवाळीच्या सणाला राज्यातील रस्ते प्रवास काहीसा सुखद होणार आहे. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या(ST) ताफ्यात या महिन्याअखेरील १०० नवीन ई-बस दाखल होणार आहेत. या बसगाड्या १२ मीटर लांबीच्या असल्याने सध्या धावत असलेल्या ई-बसच्या तुलनेत त्यांची आसनक्षमता अधिक आहे. मुंबई-पुणे मार्गावरील ई-शिवनेरीच्या ताफ्यात १७ नव्या बसगाड्या दाखल झाल्याने ई-शिवनेरी बसगाड्यांची एकूण संख्या १००वर पोहोचली आहे.
केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे, सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन सेवेत अधिकाधिक विद्युत वाहनांचा समावेश करण्याचे सर्वच राज्य सरकारांचे धोरण आहे. राज्यातील एसटी(ST) महामंडळाच्या ताफ्यात ३० टक्के गाड्या विजेवर चालवण्याच्या उद्देशाने पाच हजार १५० ई-बस भाडेतत्त्वावर घेण्यात येत आहेत.
ऑक्टोबरअखेरीस १२ मीटर लांबीच्या नव्या वातानुकूलित ई- बसगाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. ई-शिवाईच्या नावाने राज्यातील सर्व मार्गांवर टप्प्याटप्प्याने त्या धावणार आहेत. पहिल्या टप्प्यात नागपूर-चंद्रपूरमधील मार्गांवर बस धावणार आहेत. त्यानंतर नाशिक-बोरिवली, नाशिक-छत्रपती संभाजी नगर या मार्गांवर नवीन ई-बस चालवण्याचे नियोजन आहे. सध्या धावत असलेल्या ई-शिवाईच्या तिकीट दरांनुसारच याचेही तिकीट असणार आहे, असे एसटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
या १२ मीटरच्या बसची आसनक्षमता ४५ प्रवाशांची आहे. सध्याच्या नऊ मीटरच्या बसची आसनक्षमता ३२ आहे. सध्या राज्यात १३६ ई-मिडीबस (नऊ मीटर लांबीच्या) धावत आहेत. ठाणे, नाशिक, सातारा, नागपूर, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर आणि बीड अशा विभागांत धावणाऱ्या बसगाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरीच्या ताफ्यात १७ नव्या बस दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत या मार्गावर ८३ गाड्या होत्या. नवीन बसगाड्यांच्या समावेशामुळे ई-शिवनेरीची संख्या १०० वर पोहोचली आहे. यामुळे दिवाळीच्या सुट्टीच्या हंगामात मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा:
‘परदेसी गर्ल’चा नवरात्रीत ‘बहरला हा मधुमास’, डान्स पाहून चाहत्यांनी केले कौतुक
बाबा सिद्धीकींच्या हत्येमागे ‘या’ गँगचा हात; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
आता उलथापालथ करावीच लागेल, पर्यायच नाही; मनोज जरांगे कडाकडले