कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही चालू आहे त्याला तमाशा(films) किंवा लोकनाट्य म्हणता येईल. आता त्यातील काही कलाकारांनी सिनेमा निर्माण करण्याच्या घोषणा केल्या आहेत. अर्थात त्यांच्याकडे पैशाची कमी नाही, त्यामुळे हे सिनेमे बिग बजेट असतील यात संदेह नाही. पण हे सिनेमे प्रत्यक्षात सेटवर जातील काय? सायलेंट, रोल, कॅमेरा अँड ऍक्शन हे शब्द ऐकायला मिळतील की पॅकअप होईल? किंवा यापैकी काहीही होणार नाही. लोकप्रतिनिधी, राजकारणी हे आश्वासने देण्यात माहीर असतात. घोषणा करण्यात पटाईत असतात. पण प्रत्यक्षात काहीच घडत नाही, आणि म्हणूनच सिनेमा काढण्याच्या घोषणा झाल्या असल्या तरी सिनेमा बनणार नाही, तो सेटवर जाण्याआधीच डब्यात जाणार आहे.
गेल्या आठवड्यात आनंद दिघे यांच्या चरित्र पटाचा”धर्मवीर” चा दुसरा भाग प्रदर्शित(films) करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असल्याने त्याच्या प्रीमियर शो ला बरीच राजकारणी मंडळी उपस्थित होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिथे बोलताना जोरदार बॅटिंग केली. अनेकांना चिमटे काढले, काहीजणांना धारेवर धरले आणि मी असा चित्रपट काढावयाचे ठरवले तर अनेकांची बोलती बंद होईल असा इशारा सुद्धा त्यांनी दिला. धर्मवीर चित्रपटाचा पहिला भाग मोठ्या पडद्यावर आला तेव्हा त्याच्या प्रीमियर शो ला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत हे उपस्थित होते पण तेव्हा त्यांनी हा चित्रपट पूर्णपणे पाहिला नाही. मध्यंतराच्या आधीच ते निघून गेले होते आणि त्यानंतर त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचाही मध्यंतर झाला. अर्ध्यावरच मुख्यमंत्रीपद त्यांना सोडावे लागले.
धर्मवीर चा दुसरा भाग रिलीज झाला तेव्हा एकनाथ शिंदे हे स्वतःच मुख्यमंत्री आहेत. म्हणजे धर्मवीर चित्रपटाच्या दोन्ही प्रीमियर शो ला दोन वेगवेगळे मुख्यमंत्री उपस्थित होते. हे या चित्रपटाचे भाग्य म्हटले पाहिजे. तथापि पहिल्या प्रीमियरला उपस्थित असलेल्या संजय राऊत यांना दुसरा प्रीमियर रुचलेला नसावा. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत की फिल्म
प्रोड्यूसर? असा खोचक सवाल त्यांनी केला आहे. त्यांनी आम्ही सुद्धा चित्रपट निर्माण करू शकतो असे सांगितले.
एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी चित्रपटाचे नावही जाहीर केले आहे.”नमक हराम २”असे त्याचे नाव असणार आहे. अर्थात त्यांचा कधीच सेटवर न जाणारा हा चित्रपट आहे. एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना समोर ठेवून त्यांनी या चित्रपटाची “रोखठोक “कथा लिहिली आहे किंवा कागदावर ती अजून उतरावयाची आहे. पण त्यांना कोणीतरी मेरेथॉन मुलाखत आणि चित्रपट निर्मिती यातला फरक सांगितला पाहिजे, तेव्हाच त्यांना”सच्चाई”कळेल.
संजय राऊत यांनी धर्मवीर चित्रपटावरून एकनाथ शिंदे यांना डिवचल्या नंतर संजय शिरसाट कसे गप्प बसतील? मग त्यांनीही “दलाल नंबर वन”असा चित्रपट आम्ही काढू शकतो असा टोला लगावला आहे. संजय राऊत आणि शिरसाट हे दोघेही अविभाजित शिवसेनेचे एकत्र होते. त्यामुळे या दोघांनाही एकमेकाबद्दलचे गुपित माहित असू शकते. आता दोघांचे नेते वेगवेगळ्या आहेत आणि आप आपल्या नेत्यांविषयी ते प्रामाणिक आहेत असे म्हणता येईल. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चित्रपट काढण्याची भाषा केली आहे. चित्रपटाचे नाव त्यांनी सांगितलेले नाही पण”माझा नाद करायचा नाय”असं त्यांच्या चित्रपटाचे नाव असू शकते.
तर अस एकूण महाराष्ट्राचे सिनेमॅटिक रूप आहे. तमाशाची किंवा लोकनाट्याची सुरुवात नमन किंवा नांदीने होते. नंतर गणगवळण किंवा बतावणी असते. सर्वात शेवटी वग सुरू होतो. या सर्व कलाप्रकारांना एका सूत्रात बांधणारा सूत्रधार असतो. तो तमाशा, लोकनाट्याला पुढे नेत असतो. सध्या महाराष्ट्राच्या राजकीय मंचावर तमाशाचे, लोकनाट्याचे प्रयोग सुरू आहेत. आता सर्वसामान्य जनतेला त्या लोककला प्रकारापासून बाहेर काढण्यासाठी संजय राऊत, शिरसाट वगैरेंनी चित्रपट काढण्याच्या घोषणा केल्या आहेत. अर्थात त्यांच्या या केवळ पोकळ घोषणा आहेत हे सर्वसामान्य माणसाला माहित आहे.
हेही वाचा :
आलं-लसणाची पेस्ट चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर…
पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेते स्वप्निल कुसाळे यांचा कोल्हापुरात भव्य स्वागत सोहळा!
शौचालयाच्या दारातच नितेश राणेंच्या पुतळ्याचं दहन, जरांगेंवरील टीकेमुळे मराठा आंदोलक आक्रमक