पुन्हा एकदा जरांगे विरुद्ध हाके; धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरु न देण्याची धमकी!

राज्यामध्ये (Political news)बीड हत्या प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घुणपणे हत्या करण्यात आली. 9 डिसेंबर रोजी हा प्रकार झाल्यानंतर तपासामध्ये दिरंगाई दिसून आली.

यावरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्याचबरोबर मराठा नेते (Political news)मनोज जरांगे पाटील यांनी देखील या प्रकरणामध्ये स्वतः लक्ष घातले आहे. तसेच जरांगे पाटील यांनी बीडमधील सर्वपक्षीय मूकमोर्चाला उपस्थिती लावली होती. यानंतर आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील व ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यामध्ये नवा वाद सुरु झाला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासोबत ते संपर्कात आहेत. धनंजय देशमुख यांना पोलीस ठाण्यामध्ये धमकवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच अशी कोणत्याही प्रकारची धमकी देण्याचा प्रयत्न केला तर मंत्री धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरु देणार नाही असा धमकीवजा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “मी कुणाचेही नाव घेऊन उगाच बोलत नाही. पण यापुढे संतोष देशमुख यांचे कुटुंबिय आणि त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्या केसाला जरी धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावरही फिरू देणार नाही.

आमचा एक भाऊ गेला, तो आम्ही सहन केला. आतापर्यंत आम्ही कुणाचेही नाव घेतले नाही. पण यापुढे देशमुख कुटुंबियांना जर त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही. आम्हाला माज किंवा मस्ती नाही. पण आमची मुले जर रस्त्यावर येणार असतील तर आमच्यापुढे आता पर्याय नाही,” अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली होती.

आता मनोज जरांगे पाटील यांच्या धमकीला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यापूर्वी मराठा आरक्षणावरुन या दोघांमध्ये मोठा शाब्दिक वादंग झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा जरांगे विरुद्ध हाके असे वाकयुद्ध होताना दिसत आहे. लक्ष्मण हाके यांनी धनंजय मुंडे यांना धमकी दिल्यामुळे जोरदार टीका केली आहे.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “काळ 200- 250 वर्षांपुर्वीचा नाही, मला वाटतं अशी चितावणीखोर वक्तव्य मनोज जरांगे करत असतील तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे, अशा माणसांचा तात्काळ बंदोबस्त करावा. नाहीतर जातीय तेढ निर्माण होईल सामाजिक सुरक्षा धोक्यात येईल आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन या महाराष्ट्रमध्ये अराजकता निर्माण होईल.

जरांगे घुसायची भाषा आम्हाला सांगायची नाही, तुमच्यात जर दम असेल कधी, कुठे, केव्हा, ते सांगा. तो काळ गेला महाराष्ट्रात काट्या कुऱ्हाड्यांचा, आताचा काळ हा कायद्याचा, संविधानाचा आणि इथल्या न्यायव्यवस्थेचा आहे,” असे मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले आहे.

तसेच लक्ष्मण हाके यांनी धनंजय मुंडे यांना मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या धमकीवर देखील उत्तर दिले आहे. लक्ष्मण हाके म्हणाले की, “धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरवून द्यायला कोण आहेत ते जरांगे? जरांगे गुंड आहेत? जरांगे कुणी एस पी आहेत? कोण आहेत जरांगे? कायदा यांच्या मालकीचा आहे का? त्यामुळे असल्या चितावणीखोर बोलणं तुमच्या तिकडे कोणालातरी ऐकवा, अशा धमक्या या महाराष्ट्रामध्ये खूप लोकांच्या बघितलेल्या आहेत,” अशा कडक शब्दांत लक्ष्मण हाके यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा :

घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान युझवेंद्र चहलची सोशल मीडियावर भावुक पोस्ट

क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला

‘अजित पवारांना संतोष देशमुख प्रकरणात…’; थेट फडणवीसांना इशारा! राजकारण तापलं