ओंकार कसा आम्हाला सोडून गेलास रे तू…

संपुर्ण महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राला हदरावणारी घटना तीस सप्टेंबर सोमवारी घडली. बारामती येथे बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या आमच्या पोळ परिवारातील ओंकारवर खुनी हल्ला होऊन त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला. मीडियाच्या माध्यमातून ही घटना सर्वत्र पसरली, ज्या पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी इतर ठिकाणी पाठवले आहे अशा सर्व पालकांच्या यावेळी काळजात धस्स झाले. अनेकांनी या दिवशी काळजीपोटी आपल्या मुलांना आवर्जून फोन केले, खुशाली विचारली. झालेल्या घटनेमुळे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील विदारक वास्तव स्थिती समोर आली; शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ओंकारच्या अंत्यविधीला तिसऱ्या दिवसाच्या विधीला बहुसंख्येने लोक हजर होते, यामध्ये तरुण मुलांची संख्या मोठी होती. तिसऱ्या दिवशी रक्षा सावरण्याच्या विधीला उपस्थित असलेले ओंकारचे जेऊर व बारामती येथील 30 ते 40 मित्र त्याच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी थांबले होते. भेटल्यानंतर ओंकारच्या आईने मोठ्याने हंबरडा फोडला आणि त्याच्या बारामतीच्या मित्राला “कसं रे तुम्ही माझ्या ओंकारला जाऊ दिलं” असा प्रश्न केला. या प्रश्नाचं उत्तर त्या मित्रांकडे तर नव्हतच, पण कुणाजवळही नव्हतं. ऐन सतरा वर्षांचा मुलगा गमावलेल्या मातेची ती स्थिती पाहून उपस्थित सर्वांच्या अश्रूंचे बांध फुटले. खरोखरच आपल्या मुलांचे भविष्य चांगलं असावं यासाठी प्रत्येक आईवडील त्यांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घेत असतात. आपली प्रापंचिक स्थिती कशीही असली तरी त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होऊ न देता वेळोवेळी त्यांना सर्व पुरवतात. परंतु जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा फार मोठा पश्चात्ताप त्यांना सहन करण्याची वेळ येते.

ओंकारचा खून पूर्वनियोजित होता, व ज्या निर्घृण पद्धतीने तो करण्यात आला, ते पाहिल्यानंतर आरोपींना कठोरात कठोर शासन झाले पाहिजे असे प्रत्येकाला वाटते. त्यांना शिक्षा होईल की कायद्यातील काही पळवाटा शोधून ते सुटतील याचं उत्तर आज तरी देणं कठीण असलं तरी जर त्यांना शिक्षा झाली नाही तर भविष्यात अशा घटनांना पायबंद बसणार नाही.

कॉलेज काळात दंगामस्ती, किरकोळ वाद हे जरी पूर्वीपासून असले तरी अलीकडच्या काळात त्याचं स्वरूप हे निश्चितच बदलत असून ते चिंताजनक झालं आहे. करमाळा तालुक्यातील पालकांची पहिली पसंती असलेल्या बारामतीसारख्या शहरात घडलेल्या या घटनेनंतर अनेक विद्यार्थी व पालक भयभीत झाले आहेत. आपल्या मुलांच्या शिक्षणाची व भवितव्याची चिंता लागून राहिली आहे.

या प्रकारच्या घटनांना केवळ एकाच घटकाला जबाबदार धरता येणार नाही, त्याला अनेक गोष्टी जबाबदार आहेत. परंतु भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी निश्चितपणे काहीतरी करणे गरजेचे आहे.

…………✒️ गजेंद्र पोळ शेटफळ ता. करमाळा