सावधान, झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करताय?

तुम्हीसुद्धा झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोवरून आता खाद्यपदार्थ ऑर्डर करणे महागणार आहे. आपले जानेवारी ते मार्च या तिमाहीत निकाल जाहीर करण्यापूर्वीच झोमॅटोने प्लॅटफॉर्म फी २५ टक्क्यांनी वाढवून पाच रुपये प्रति ऑर्डर करून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करण्याच्या काही आठवड्यांपूर्वी ही घोषणा केली आहे. यासोबतच झोमॅटोने इंटरसिटी लीजेंड्स फूड डिलिव्हरी सेवा स्थगित केली आहे.

झोमॅटोने गेल्या वर्षी ऑगस्ट २०२३ मध्ये आपले मार्जिन वाढवण्यासाठी आणि कंपनीला नफा मिळवून देण्यासाठी दोन रुपये प्लॅटफॉर्म फी सुरू केली. त्यानंतर तीन रुपये आणि १ जानेवारीला ४ रुपये करण्यात आली. तर यापूर्वी ३१ डिसेंबर रोजी कंपनीने प्लॅटफॉर्म फी तात्पुरती ९ रुपये केली होती.

विश्लेषकांनी सांगितले की प्लॅटफॉर्म फी वाढीमुळे डिलिव्हरी शुल्कावरील जीएसटीचा परिणाम अंशतः कमी होईल. झोमॅटो दरवर्षी सुमारे ८५-९० कोटी ऑर्डर पूर्ण करते. तर आता सुविधा शुल्कातील प्रत्येक १ रुपये वाढीचा EBITDA वर ८५-९० कोटी रुपयांचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो, जो सुमारे ५% आहे. मात्र, ही वाढ सध्या काही शहरांमध्येच प्रभावी असेल.

झोमॅटोने आपली इंटरसिटी लीजेंड्स सेवा बंद केली आहे, जी प्रमुख शहरांमधील टॉप रेस्टॉरंट्सकडून इतर शहरांतील ग्राहकांपर्यंत ऑर्डर पोहोचवायची. झोमॅटो ॲपवरील ‘लेजेंड्स’ टॅबवर क्लिक केल्यावर, संदेश पॉप अप होतो की, “ही सेवा अपग्रेड करणे सुरू असून आम्ही लवकरच तुमच्या सेवेत परत येऊ.”

झोमॅटोच्या फूड डिलिव्हरी व्यवसायाने डिसेंबर तिमाहीत समायोजित महसुलात वार्षिक ३०% वाढ नोंदवली आणि २,०२५ कोटी रुपये झाली आहे. या कालावधीत ब्लिंकिटचा महसूल दुप्पट होऊन ६४४ कोटी रुपये झाला. झोमॅटोच्या मुख्य व्यवसायातील वाढता नफा आणि त्याच्या ब्लिंकिटच्या जलद वाढीमुळे झोमॅटोच्या शेअरची किंमत वाढत आहे.

झोमॅटोने एका वर्षापूर्वी ३४७ कोटींच्या निव्वळ तोट्याच्या तुलनेत १३८ कोटींचा एकत्रित नफा नोंदवला. महसूलही गेल्या वर्षीच्या १,९४८ कोटींवरून ३,२८८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.