परभणीचे खासदार संजय जाधव यांचा मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा

परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला तसंच मराठा आरक्षणाला (reservation system) जाहीर पाठिंबा दिला आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी सविस्तर पत्र लिहिलं आहे. राज्य शासनाला यासंदर्भात निर्णय घेण्याच्या तात्काळ सूचना द्याव्यात असं त्यांनी यात म्हटलं आहे.

राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय?

आपणास नम्र निवेदन करण्यात येते की, मराठा समाजाला ओबीसीमधून (OBC) आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील 8 जून 2024 पासून आंतरवाली-सराटी (जि. जालना) इथं आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून मनोज जरांगे यांनी अन्न, पाणी वर्ज्य केलं आहे. विशेष म्हणजे ते डॉक्टरांचे उपचार सुद्धा घेत नाहीत. त्यामुळं जरांगे यांची प्रकृती वरचेवर खालावत चालली आहे. मात्र, महाराष्ट्र शासन ही बाब गांभीर्यानं घेताना दिसत नाहीए. याप्रकरणी शासनाकडून असंच वेळकाढूपणाचं धोरण चालू राहिलं आणि मनोज जरांगे यांची प्रकृती आणखीनच खालावली तर संपूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहे. तसं झालं तर त्याचे गंभीर परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागण्याची शक्यता आहे.

तरी आपण याप्रकरणी तात्काळ आणि गांभीर्याने लक्ष घालून मनोज जरांगे यांच्या मागणीप्रमाणं मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यासंबंधी महाराष्ट्र शासनाला सूचित करावं, ही विनंती.

लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा परिणाम

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर मराठवाड्यात महत्वाचा ठरला होता. यामुळं भाजपसह मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला यामुळं मोठा फटका बसला होता. खुद्द परभणीच्या जागेवर महायुतीच्या महादेव जानकर यांनी मोठा जोर लावला होता. पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरुन मराठा समाज नाराज असल्यानं त्याचा फटका जानकरांना बसल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा :

शेतकऱ्यांना ‘या’ तारखेला मिळणार PM किसानचा 17वा हप्ता, वाचा सविस्तर माहिती

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मिशन विधानसभा

इचलकरंजीत ऐन पावसाळ्यात तीव्र पाणी टंचाई