किरीट सोमय्या यांच्याविरोधात ठाकरे गटाची पोलिसात तक्रार

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

एक मोठी बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात (opposition) पुणे पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रारीचे निवेदन दिले आहे. किरीट सोमय्या यांनी केलेल्या एका ट्वीट विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाकडून पुण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत किरीट सोमय्या यांनी समजत तेढ निर्माण होईल, असे ट्वीट केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीच्या पत्रात म्हटलं आहे की, ”लोकसभा 2024 च्या झालेल्या निवडणुकीमध्ये मुंबई शहरातील ईशान्य मुंबई या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय दिना पाटील सर्वसामान्य सर्व जाती धर्मातील जनतेने दिलेल्या भरघोस मताने खासदार म्हणून निवडून आले. त्यासंदर्भात भाजपाचे नेते जाणीवपूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे वेगवेगळ्या पद्धतीचे विधानं करीत आहेत. त्यातील एक उदाहरण म्हणजे किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलेले विधान खालील प्रमाणे आहे.”

किरीट सोमय्या यांनी काय केलं होतं ट्वीट?

संजय मोरे यांनी आपल्या तक्रारीच्या पत्रात सोमय्या यांनी ट्विटरवरून केलेल्या वक्तव्याबद्दलही माहिती दिली आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे की, ” सोमय्या यांनी ट्वीट केलं होतं की, “भाजप मिहीर कोटेचा ईशान्य मुंबई 29,861 मताने पराभूत. मानखुर्द मध्ये 87, 971 मताची तूट. मुलुंड ते घाटकोपर 58,110 मतांचा लीड. मानखुर्द विधानसभा (वांगलादेश परिसर) उद्धव ठाकरे सेना 1,16,072 मतं, तर भाजपला 28,101 मतं. आम्ही बंगलादेशी परिसरात हरलो, पराभूत झालो.”

संजय मोरे यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, ”या विधानाचा अर्थ असा होत आहे की, मुंबई शहरातील हा भाग मुंबईचा नसून बांगलादेशचा आहे. असे त्यांनी त्यांच्या विधानामधे स्पष्ट उल्लेख केला आहे. हे विधान देशाच्या अखंडतेला तडा देणारं आहे. देशाच्या अखंडतेवर बोलणे व त्यावर शंकास्पद विधान करणे हे देशद्रोह करण्यासारखे आहे. भारत देश हा अखंड आहे. मुंबईच काय तर देशातील कोणत्याही राज्याचा भाग हा शेजारील राष्ट्राचा होऊ शकत नाही. असे विधान करणे म्हणजे केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या कार्यपद्धतीवर अविश्वास करण्यासारखे आहे. त्या भागाला जर ते बंगलादेशी परिसर म्हणत असतील तर त्यांच्याकडे असे कोणते पुरावे आहेत, ज्यामुळे ते हे सिद्ध करू शकतात? याचीही चाचणी एटीएस अथवा एनआयएच्या मार्फत करणे क्रमप्राप्त आहे. कारण सदर व्यक्ती ही देशातील व राज्यातील सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ नेते आहेत.”

तक्रारीत पुढे म्हटलं आह की, ”त्यांच्या विधानाची पडताळणी करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी सदर व्यक्तीस ताब्यात घेऊन त्यांनी केलेल्या विधानाची त्यांच्याकडे चौकशी करण्यात यावी. तसेच मानखुर्द हा भाग महाराष्ट्रातील मुंबई या शहरातील आहे. त्याबद्दल असे विधान करणे हे त्या भागातील दलित व अल्पसंख्याक लोकांचा अपमान करण्यासारखे आहे. त्यामुळे सदरचा गुन्हा हा अॅट्रॉसिटी अंतर्गत येत असल्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील चौकशी करण्यात यावी.”

हेही वाचा :

लोकसभा जिंकताच शरद पवारांची विधानसभेसाठी मोठी खेळी, काय आहे मेगाप्लॅन?

दिल्लीत मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक; फडणवीस आजच देणार राजीनामा?

बॉलिवूडला खडेबोल सुनावत कंगना रणौतकडून ‘इमर्जन्सी’चा प्रचार