पाटण : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका(political) होणार आहेत. मात्र त्यापूर्वी सत्ताधारी व विरोधक यांच्यामधील वाद जोरदार रंगले आहे. पाटणमध्ये शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटामधील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे पाटणमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाटण तालुक्यात झालेल्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांच्या आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चाला शह देण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई गटाकडूनही प्रतिमोर्चा काढण्यात आला.
विधानसभा निवडणूकीमुळे(political) पक्षांमधील वादविवाद वाढले आहे. पाटणमध्ये एकमेकांना शह देण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटच्या कार्यकर्त्यांनी मोर्चे काढले. यावेळी जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर दोन्ही गटात जोरदार राडा झाला. पाटण तालुक्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या काळात कोट्यवधी रुपयांची निकृष्ठ दर्जाची विकासकामे झाल्याचा आरोप करून याची पोलखोल करण्यासाठी पुराव्यासह माहिती शासनाला देण्यासाठी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
यावेळी उबाठा गटाचे शिवसैनिक मोर्चाला उपस्थित राहत असताना पोलिसांवर दबावतंत्र वापरून हा मोर्चा मोडीत काढण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांनी केल्याने केल्याचा आरोप करत हर्षद कदम व ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांचा जाहीर निषेध केला. या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये दिवसभर पाटण शहरात राज्य राखीव पोलीस दलासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शुक्रवारी (दि.27) पाटण शहरात हे दोन्ही मोर्चे नवीन बसस्थानक परिसरात समोरासमोर आल्यानंतर दोन्ही बाजूने प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. पन्नास खोके एकदम ओके…अशा घोषणा उबाठा गटाने दिल्या तर शंभूराज देसाई जिंदाबादच्या घोषणा शिंदे गटाकडून देण्यात आल्या. याच दरम्यान प्रचंड तणाव लक्षात घेता पोलिसांनी कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्ग काही काळ बंद ठेवून पोलीस वाहनांच्या सहाय्याने हे दोन्ही मोर्चे रोखण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील कार्यकर्त्यांनी याला छेद देत रस्त्यावर आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला.
दोन्ही गट(political) आमने-सामने भिडल्याने काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. देसाई समर्थकांचा मोर्चा काही काळानंतर शांत झाला. मात्र पोलिसांनी उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवल्याने व झेंडे काढून घेतल्याने झेंडा चौकात उबठा गट व पोलिसांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. झेंडा चौकातच उबठा गटाकडून ठाण मांडण्यात आले. झेंडा चौक येथे उबाठा गटाच्यावतीने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या व जाणीवपूर्वक षडयंत्र रचून हा मोर्चा अयशस्वी व्हावा यासाठी पालकमंत्र्यांनीच हा प्रकार केल्याचा आरोप करून सार्वत्रिक निषेध व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, दोन्ही गट एकाच ठिकाणी आल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. देसाईंच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी कडे करून अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र देसाई गटाचे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी पोलिसांचे कडे तोडून आगेकूच केल्याने पोलीस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली होती. यात काही पोलिसांना धक्काबुक्की देखील झाली.
मोर्चाच्या परवानगीबाबत पोलिसांना विचारले असता दोन्ही गटाकडून मोर्च्याच्या परवानगीसाठी अर्ज करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली नव्हती. कारवाईबाबत विचारले असता याबाबत माहिती घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हेही वाचा:
आवाडे पिता-पुत्रांच्या हातात आता “कमळ”!
‘उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत’, चंद्रहार पाटलांकडून 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
‘धर्मवीर- 2’ अत्यंत बोगस, बकवास आणि काल्पनिक सिनेमा…; ‘या’ सीनवरुन खासदार संजय राऊत आक्रमक