राजकीय, सामाजिक, हिंदुत्व तीन विचार ,पाच दसरा मेळावे

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : विजयादशमीचे निमित्त साधून शनिवारी मुंबई, मराठवाड्यातील बीड, विदर्भातील नागपूर या तीन ठिकाणी पाच दसरा मेळावे संपन्न झाले. सर्वच ठिकाणी प्रचंड गर्दी होती. प्रत्येक ठिकाणी विशिष्ट विचाराने बांधलेला श्रोता वर्ग होता. राजकीय(Political), सामाजिक, हिंदुत्व या विषयांवर मंथन झाले. आरोप, प्रत्यारोप, इशारे, प्रति इशारे, आव्हान, आवाहन, हिंदू संघटन आणि हित हे सर्व या दसरा मेळाव्यात झाले. आणि त्याला विधानसभा निवडणुकीची, सध्याच्या राजकारणाची, समाजकारणाची पार्श्वभूमी होती. विचारांचं सोनं वाटणारा उधळणारा, एकही दसरा मेळावा झाला नाही. त्यामुळे विचारांचे धन घेऊन श्रोते किंवा कार्यकर्ते माघारी गेले असे झाले नाही.

मुंबईतील शिवाजी पार्कवर “उबाठा” सेनेचा, आझाद मैदानावर शिंदे सेनेचा, बीड येथील भगवान गडावर पंकजा मुंडे गटाचा, नारायण गडावर मनोज जवंगे पाटील यांचा आणि नागपूर येथे संघ मुख्यालय परिसरात रा. स्व. संघाचा असे एकूण पाच दसरा मेळावे शनिवारी झाले. शिंदे गटाचा दुसरा आणि मनोज जरांगे पाटील यांचा पहिला मेळावा होता. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, डॉक्टर मोहन भागवत, पंकजा मुंडे आणि मनोज रंगे पाटील यांची या मेळाव्याचा प्रमुख भाषणे झाली. अर्थात विषय वेगळे होते, विचार वेगळे होते, मांडणी वेगळी होती. जातकलह थांबला पाहिजे, वर्ग संघर्ष थांबला पाहिजे, धार्मिक तेढ संपली पाहिजे, संहिष्णु वातावरण तयार झालं पाहिजे, हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवून विचार मंथन झाले नाही हे या मेळाव्याचे वास्तव होते.

शिवाजी पार्क वरून बोलताना उद्धव ठाकरे(Political) यांनी भाजपचा हायब्रीड असा उल्लेख करून भाजप नेत्यांना झोडपून काढले. गाईला राज्य मातेचा दर्जा देण्याच्या निर्णयावर आधी आईला वाचवा मग गाईला वाचवा अशी टीका त्यांनी केली. शिवाजी महाराज हे मतदान यंत्राचा विषय होता कामा नये. ईव्हीएम मशीन बनता कामा नयेत. जय श्रीराम च्या घोषणेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेचा आवाज लुप्त होतो आहे.

प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांची मंदिरे झाली पाहिजेत असे त्यांनी यावेळी सांगितले. अजित दादा पवार, हसन मुश्रीफ ही मंडळी महाविकास आघाडीच्या अर्थात उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात होती. पण त्यांनाच समोर ठेवून उद्धव ठाकरे यांनी प्राचार्य माणसांना घेऊन राज्य करता, चोरांना सत्तेत बसवता अशी टीका करून भाजप हा आता पूर्वीचा राहिला नाही. बाजपेयी, आडवाणींचा तो राहिला नाही. तो आता भ्रष्टाचाऱ्यांची गर्दी असलेला हायब्रीड पक्ष झाला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या भाषणात भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, आरक्षण, जातकलह, शेतकरी हे विषय होते. यंदाची
विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्राची ओळख ठरवणारी असल्याचे स्पष्ट करून शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी शपथ घ्यायला लावली.

आझाद मैदानावर झालेल्या दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले. गर्व से कहो हम हिंदू है ही हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची घोषणा आता ते विसरले आहेत. हिंदुत्वाची काही जणांना ऍलर्जी झालेली आहे. गर्व से कहो म्हणताना त्यांची जीभ कचरू लागली आहे. हिरव्या पोटी गारगोटी जन्मास आली. हिंदू म्हणवून घेण्याची आता त्यांना लाज वाटू लागली आहे.

स्वतःला मुख्यमंत्री (Political)करा म्हणून ते आता दिल्लीत जाऊन मुजरे करू लागले आहेत. मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधी ठरवा असे म्हणू लागले आहेत. पण त्यांचा चेहरा आता महाराष्ट्राला चालणार नाही हे सत्य आहे अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आसूड ओढले. एकनाथ शिंदे यांच्या भाषणात गेल्यावर्षी झालेल्या दसरा मेळाव्याचे काही मुद्दे होते. बीमानांच्या हातात असलेली शिवसेना आम्ही वाचवली. बाळासाहेबांचे विचार आम्ही वाचवले. आम्हीच खरे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत हे मुद्दे त्यांनी गेल्या दसरा मेळाव्यात मांडले होते. त्याच मुद्द्यांची त्यांनी शनिवारी पुनरुक्ती केली.

बीडच्या भगवानगडावर दसरा मेळाव्याची गेल्या काही वर्षांची परंपरा आहे. शनिवारी झालेल्या या मेळाव्याला पंकजा मुंडे यांच्या बरोबरीने धनंजय मुंडे हे त्यांचे काल परवाचे राजकीय(Political) शत्रू या मेळाव्याला उपस्थित होते. हा मेळावा राजकीय नाही असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे काही राजकीय विचार मांडले. मनोज जरांगे पाटील यांच्यावरही नकळतपणे टीका केली. ओबीसी समाज समोर ठेवून त्यांचे भाषण झाले.

नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांनी पहिला मराठा समाजाचा दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी सरकारवर प्रचंड टीका केली. या सरकारला आता सोडणार नाही. 14 महिने चाललेल्या माझ्या आंदोलनाची फसवणूक या सरकारकडून होत आहे. मला चारही बाजूंनी घेरले जात आहे. मराठ्यांनो तुम्ही तुमची एकी सोडू नका असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या भाषणात मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गेल्या 14 महिन्यापासून च्या आंदोलनाचा संदर्भ होता.

नागपूरला दरवर्षी विजयादशमीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे संचलन होते आणि नंतर स्वयंसेवकांच्या समोर सर संघ चालक भाषण करतात. शनिवारी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचे भाषण झाले.
त्यांच्या भाषणात देशातील हिंदू आणि जगातील हिंदू हा विषय प्रामुख्याने असतो. यंदाच्या भाषणात त्यांनी बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराचे लक्ष वेधले. तेथील हिंदूंवरील हल्ले थांबले पाहिजेत.

हिंदू विस्कळीत झाला की त्याच्यावर हल्ले वाढतात. म्हणून हिंदूंनी एक झाले पाहिजे. डॉक्टर भागवत यांनी आपल्या भाषणात अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप प्रणित एनडीए सरकारच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले. देशाची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकूणच शनिवारी झालेल्या पाच दसरा मेळाव्यातील भाषणांकडे हिंदूंचे आणि समस्त महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मात्र या पाचही मिळाव्यामध्ये वैचारिक मंथन झाले नाही असे म्हणावे लागेल.

हेही वाचा:

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कांद्याचे लिलाव सुरु, प्रतिक्विंटल कांद्याला 6161 रुपयांचा दर

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानचा मोठा निर्णय!

रोहित शर्माच्या घरी कधी हलणार दुसऱ्यांदा पाळणा? जुनियर हिटमॅनचे या महिन्यात होणार आगमन