राजकारणी म्हणत आहेत अगा, जे घडलेची नाही…!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कोणत्याही खळबळ वाजवणाऱ्या गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्यात राजकारण्यांनी (Politicians) लक्ष घातले, त्यावर चर्चा सुरू केली की, तो गुन्हा राजकीय विषय बनतो. मग तपास अधिकाऱ्यांना खातेबाह्य मार्गदर्शन केले जाते, सूचना केल्या जातात, त्यातून मग मीडिया ट्रायल सुरू होते. आरोपीला फासावर लटकवा अशी सामान्य जनतेची उस्फूर्त प्रतिक्रिया आणि मागणी असते. राजकारणीही त्यांच्या आवाजात आपला आवाज मिसळतात. बदलापूर मध्ये दोन चिमूरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेत काही महिन्यापूर्वी असेच झाले होते.

आता या प्रकरणातील आज हयात नसलेल्या आरोपी अक्षय शिंदे याने त्या चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केलेच नाहीत असा दावा माझी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड(Politicians) यांनी केला आहे. पण त्यातून आपण त्या दोन चिमुरड्या मुलींच्या आई-वडिलांना खोटे ठरवत आहोत, बदलापूरच्या जनतेला खोटे ठरवत आहोत, त्यांच्या भावनांशी आपण खेळत आहोत याचे भान त्यांना राहिलेले दिसत नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.

संघ परिवाराशी निगडित असलेल्या बदलापूर येथील नामांकित शिक्षण संस्थेच्या शाळेत दोन चिमूरड्या मुलींवर तेथील चतुर्थ श्रेणी कर्मचारी अक्षय शिंदे यांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडल्यानंतर राज्यभर नव्हे तर संपूर्ण देशभर खळबळ उडाली होती. अक्षय शिंदे याला अटक केल्यानंतर मीडियामध्ये तेव्हा संशयित अक्षय शिंदे हा लिंग पिसाट आहे, त्याची एकापेक्षा अनेक लग्न झालेली आहेत अशा बातम्या झळकत होत्या. त्याचवेळी संबंधित शाळेच्या व्यवस्थापनालाही अक्षम्य दुर्लक्ष केले म्हणून टीका करण्यात आली होती.

त्यानंतर शाळेच्या शिक्षिका तसेच व्यवस्थापनातील दोन संचालक यांच्यावरही पोक्सो कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर या संवेदनाशीला प्रकरणाचा तपास सुरू असतानाच अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर करण्यात आले. या एन्काऊंटर बद्दल शंका घेतली जाऊ लागल्यानंतर त्याची न्यायालयीन चौकशी करण्यात आली. या चौकशीचे अहवाल चारच दिवसापूर्वी जाहीर झाले आणि त्यानंतर अक्षय शिंदे यांने त्या दोनच चिमूरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केलेच नव्हते तर ज्यांनी हे अत्याचार केले त्यांना वाचवण्यासाठी त्याचे एन्काऊंटर करण्यात आले असा आरोप आणि दावा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड(Politicians) यांनी केल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही तशाच प्रकारचा दावा केला.

अशा लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास हा वैद्यकीय अहवालावर अवलंबून असतो. संबंधित त्या चिमुरड्या मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती, या तपासणीत संशयित आरोपी अक्षय शिंदे याचे सिमेन्स आढळले होते काय?
त्याचे अंतर्वस्त्र तपासले जाते. त्याच्यावर सिमेन्स चे डाग होते काय? याची तपासणी केली जाते.

आता ही वैद्यकीय तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलिसांना त्यासंबंधीचे अहवाल दिले गेले असतील. याशिवाय त्या दोन चिमूरड्या मुलींनी आपल्यावर लैंगिक अत्याचार कोणी केले हे पालकांना विशेषता आईला सांगितले असेल. म्हणूनच अक्षय शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी आंदोलन करणाऱ्यांच्या कडून अक्षय शिंदे याला फासावर लटकवा अशी मागणी केली गेली होती आणि त्यामध्ये राजकीय पक्षांचे नेते सुद्धा मागे नव्हते.

अक्षय शिंदे यांचे एन्काऊंटर हे फेक असल्याचे निष्कर्ष न्यायालयीन चौकशीतून बाहेर पडल्यानंतर काही राजकीय मंडळींना अक्षय शिंदे हा धुतल्या तांदळासारखा स्वच्छ होता असे वाटू लागले आहे. बहुतांशी एन्काऊंटर ही संशयास्पद असतात. तसेच अक्षय शिंदे याचेही इन्काऊंटर संशयास्पद असू शकते पण त्याचा अर्थ त्याने त्या दोन चिमूरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केलेच नाहीत असा होत नाही.

शालेय व्यवस्थापनातील अन्य कुणीतरी त्या दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले आणि त्यांना या प्रकरणातून वाचवण्यासाठी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला असे जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुख यांचे म्हणणे आहे. पोलिसांवर दडपण आणून अक्षय शिंदे याला संपवण्यात आले.

असे नवीनच समीकरण मांडताना आपण त्या दोन मुलींच्या पालकांवर अविश्वास दाखवत आहोत, त्यांनाही या गटात संबंधितांनी सामील करून घेतले आहे, असे अप्रत्यक्षपणे म्हणत आहोत, वैद्यकीय अधिकाऱ्यांना खोटा अहवाल दिला आहे किंवा त्यांनी खोटी प्रक्रिया राबवली आहे असे अप्रत्यक्षपणे म्हणत आहोत याचे भान या गुन्ह्याचे नवे समीकरण मांडताना संबंधितांना राहिलेले नाही असे म्हणावे लागेल.

हेही वाचा :

क्रिसभाऊनं जिंकलं! कॉन्सर्टमध्ये बुमराहला पाहताच एका क्षणात रचलं गाणं… Video

13व्या मजल्यावरून खाली कोसळली 2 वर्षांची मुलगी, अपघाताचा हा थरार…Video Viral

‘सितारा जमीन पर’ या दिवशी होणार प्रदर्शित; अभिनेता आमिर खानने शेअर केला मास्टर प्लॅन!