ठोकाठोकीच्या वळणावर महाराष्ट्राचे राजकारण…..!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : पुण्यात भारतीय जनता पक्षाचा महामेळावा (Politics)झाला. आता गप्प बसू नका, ठोकून काढा असे प्रक्षोभक आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी त्या मेळाव्यात केले. ठोकून काढा म्हणजे आक्रमक व्हा असे त्यांना म्हणायचं होतं. त्यानंतर मुंबईच्या रंग शारदा भवन येथे झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी”एक तर ते राहतील, नाहीतर मी”अशी आव्हानात्मक भाषा वापरली. त्यानंतर संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे शिवराळ भाषा केली. राज ठाकरे राज ठाकरे हे सुपारीबाज नेते आहेत असा आरोप अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे तर संभाजी राजे यांनी स्वतःला छत्रपती म्हणून घेण्याचा अधिकार गमावला असल्याचे स्फोटक वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. एकूणच महाराष्ट्राचे राजकारण आता ठोकाठोकीच्या वळणावर पोहोचले आहे.

पंतप्रधान पदाच्या व्यक्तीवर करायचीच असेल तर संयत भाषेचा टीका करावी(Politics) असे सर्वसाधारण संकेत आहेत. पण रंग शारदा भवन येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना वापरलेले भाषा सर्वसामान्य जनतेला खटकणारी होती. नकली संतान असा शब्दप्रयोग नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेसाठी वापरला होता त्याचेही समर्थन करावे असे नाही.

लोकसभेच्या निवडणुकीत मस्ती उतरवलीच आहे, नरेंद्र मोदी यांनी मुंबईत प्रचाराला यावे, तेव्हा उरली सुरली मस्ती उतरवतो इतकी जहाल भाषा ठाकरे यांनी वापरली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी वापरलेली भाषा शिवराळ आहे. लफंग लोकांची टोळी घेऊन फिरणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या नादाला लागावेच, नाही त्यांना वीस फूट जमिनीत गाडले तर बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे नाव घेणार नाही अशी प्रतिज्ञा त्यांनी केली आहे.

आमदार अमोल मिटकरी हे वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक राजकीय मंडळींना विनाकारण अंगावर घेतले आहे. खळखट्याक अशी ओळख असलेल्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुपारी बाज नेता असे म्हटल्याने मिटकरी हे मनसेच्या रडारवर आले. त्यांच्याच गावात त्यांच्या गाडीवर मनसेच्या सैनिकांनी हल्ला केला. हा राडा सुरू असताना मनसेचा एक कार्यकर्ता हार्ट अटॅक येऊन मरण पावल्यानंतर वातावरण आणखी चिघळले. मनसेचे एक पदाधिकारी कर्णबाळा दुबनळे यांनी अमोल मिटकरी यांना सोडवल्याशिवाय राहणार नाही अशी शपथच घेतली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी विरुद्ध मनसे असा सामना रंगला आहे आणि रंगणार आहे.

विशाळगड प्रकरण आता चर्चेतून बाहेर गेले आहे(Politics). विशाळगडावर जो दंगलीचा, तोडफोडीचा, अल्पसंख्या समाजावर हल्ला होण्याचा जो प्रकार घडला त्याला शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी राजे छत्रपती यांना थेट जबाबदार धरले आहे. स्वतःला छत्रपती समजण्याचा अधिकार आता संभाजी राजेंना राहिलेला नाही या त्यांच्या विधानाने स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते संतापले. त्यांनी मुंबईत जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर गुरुवारी हल्ला केला. विशाळगड प्रकरण शांत होत असताना आव्हाड यांनी थेट छत्रपती घराण्यावर निशाणा साधने अपेक्षितचा नव्हते. आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याची कारणे वेगवेगळी असली तरी त्यामागे राजकीय हेतू आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी असहिष्णुता यापूर्वी कधीही नव्हती. वसंत दादा विरुद्ध राजारामबापू पाटील, यशवंतराव चव्हाण विरुद्ध बाळासाहेब देसाई, बॅरिस्टर अंतुले विरुद्ध शालिनीताई पाटील, स.का. पाटील विरुद्ध आचार्य अत्रे, मोरारजी देसाई विरुद्ध बाळासाहेब ठाकरे असे कितीतरी वाद महाराष्ट्रात गाजले पण टिकेची भाषा अतिशय संयत होती. तेव्हाचे नेते सुसंस्कृत होते. चुकून असंसदीय शब्द तोंडातून गेला तर, तातडीने दिलगिरीही व्यक्त केली जायची. पण गेल्या काही वर्षांपासून राजकारण एका वेगळ्याच वळणावर गेलेले आहे. ठोकून काढण्याची भाषा, मस्ती उतरवतो , तुडवल्याशिवाय राहणार नाही , अशी भाषा आता राजकारणात सर्रास वापरली जाऊ लागली आहे.

हेही वाचा :

विधानसभेसाठी मनोज जरांगेंनी दंड थोपाटले, किती जागांवर निवडणूक लढवणार? वाचा…

टीम इंडियाला 1 कोटी बक्षिस देणाऱ्या राज्य सरकारने स्वप्निल कुसाळेला 50 लाख बक्षिस दिलं

बिग बॉस ओटीटीमधून बाहेर पडताच अरमान मलिकची मोठी खरेदी, मुंबईमध्ये आलिशान घराची घेतली मालकी