राजकारण कालचे, आजचे आणि दि. ४ जून नंतरचे….!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : मुंबईसह १३ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक(Politics) प्रक्रिया सोमवारी पार पडल्यानंतर महाराष्ट्रातील निवडणुकीचे वातावरण शांत झाले आहे. आता सर्वांचे लक्ष दिनांक 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागून राहिले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी कडून “विजय आमचाच “असल्याचा दावा करण्यात येतो आहे. मात्र लोकसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातील काही नेत्यांचे राजकीय महत्त्व कमी होणार असून काही नेत्यांचे महत्त्व अधोरेखित होणार आहे आणि त्याचबरोबर राजकारणाचे संदर्भ बदलून काही नवीन समीकरणे पुढे येणार आहेत.

मुंबई शहरात एकूण सहा लोकसभा(Politics) मतदारसंघ आहेत. हे शहर या लोकसभा निवडणूक प्रचाराचे प्रमुख केंद्र
नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांचे मुख्यालय आहे आणि तरीही तिथे झालेली मतदान टक्केवारी चिंता करावी अशी आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ती आपल्याच ताब्यात असली पाहिजे हा प्रत्येक राजकीय पक्ष नेत्यांचा मनसुबा असतो. मुंबईत लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षाची सरशी होईल त्याच्या हाती मुंबई महापालिका जाईल. आणि या महापालिकेच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. पण मुंबईतल्या मतदारांनी मतदान करण्यात फारच उदासीनता दाखवली आहे. वाढलेले तापमान, आणि ढिसाळ निवडणूक मतदान प्रक्रिया नियोजन असे काही घटक त्यास कारणीभूत आहेत.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा अर्थात लोकशाहीचा उत्सव संपन्न झाला पण मतदारांनी या उत्सवात सहभागी होण्यासाठी फारसा उत्साह दाखवलेला नाही. आता सर्वांचे लक्ष दिनांक चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे वेधून राहिले आहे. महाराष्ट्रात महायुती (एन डी ए) विरुद्ध महाविकास आघाडी (इंडिया) यांच्यात प्रामुख्याने लढत झाली. दोन्हीकडून ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करण्यात आली आहे.

‌2019 चा देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचा झालेला पहाटेचा शपथविधी, त्यानंतर त्या दोघांचे आलेले सरकार केवळ 80 तासात कोसळल्यानंतर एकसंघ शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी, शिवसेनेला कायम शत्रूस्थानी मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस यांच्याशी केलेली राजकीय युती ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला आवडलेली आहे का? त्यांचे हे सत्तेचे राजकारण स्वतःला मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी होते आणि त्यासाठी त्यांनी आपला विचार सोडला हे सर्व सामान्य जनतेच्या पचनी पडलेले आहे काय?

भारतीय जनता पक्षाने, अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे(Politics) यांच्या अथक प्रयत्नातून मजबूत झालेली शिवसेना फोडली. त्यानंतर शरद पवार यांनी 1999 मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडले, हे थोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला मान्य झालेले आहे काय? निवडणूक चिन्हासह शिवसेना ताब्यात घेतलेल्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या खासदारांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांचे समर्थन पुन्हा मिळणार का? पक्षप्रमुखांना दगा देऊन पक्षा बाहेर गेलेल्या लोकप्रतिनिधींना नंतरच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागते हा इतिहास आहे, त्याची पुनरावृत्ती या निवडणुकीत होणार काय?

सुमारे पन्नास वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी प्रबोधनकारांचे आशीर्वाद घेऊन स्थापन केलेल्या शिवसेनेचा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही विस्तार झाला. बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्वाणानंतर शिवसेनेची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे आली. ती शिवसेना देवेंद्र फडणवीस, यांनी फोडल्यानंतर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला धक्का बसला होता. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मतदारांची सहानभूती मिळणार काय?

सोनिया गांधी या विदेशी आहेत असा ठपका ठेवून राष्ट्रीय काँग्रेस मधून बाहेर पडलेल्या शरद पवार यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. नंतर राष्ट्रीय काँग्रेस बरोबरच आघाडी करून सत्तेत स्थान मिळवले. पक्ष मजबूत केला,
पण अजित दादा पवार यांना खिंडीत गाठून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फुट पाडण्यास भाग पाडले. अजितदादा पवार यांनी जवळजवळ हा पक्ष आपल्या ताब्यात घेतला.

त्यानंतर पवार कुटुंबात राजकीय कलह निर्माण झाला. त्यातून शरद पवार यांना सर्वसामान्य मतदार या निवडणुकीत सहानुभूती दाखवणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे दिनांक 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीतून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला मिळणार आहेत. आणि त्यानंतर राजकारणातील नवीन समीकरणे पुढे येणार आहेत.

हेही वाचा :

रेसिपी : नाश्त्यामध्ये झटपट बनवा चवदार रवा डोसा

लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी अटक टाळली

सांगली हादरलं! प्रवासी बॅगेत पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह