कॉँग्रेस(Congress) खासदार राहुल गांधी हे आज 5 ऑक्टोबररोजी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या हस्ते कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. या कार्यक्रमात त्यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत महत्वाचं वक्तव्य केलं. तसेच भाजपवर देखील त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.
“शिवाजी महाराजांनी आपल्याला संदेश दिलाय, की हा देश सर्वांचा आहे. इथे कोणावरही अन्याय होता कामा नये. त्याच विचारांचं प्रतिबंध आज आपल्याला संविधानात दिसून येतं. त्यांच्या विचारांचा आणि संविधानाचा थेट संबंध आहे. संविधानात अशी एकही तरतूद नाही, जी शिवाजी महाराजांच्या विचारातून आलेली नाही. त्यांच्या विचारातून संविधानाची निर्मिती झाली आहे.”, असं राहुल गांधी म्हणाले.
महाराष्ट्रात आरक्षणावरून वाद असताना राहुल गांधी यांनी थेट आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठं भाष्य केलं. कालच शरद पवार यांनी केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून 75 टक्क्यांवर न्यावी, असं म्हटलं. त्यानंतर आज राहुल गांधी यांनी देखील आरक्षणाबाबत मत मांडलं.
“आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा काँग्रेस (Congress)आणि इंडिया आघाडी बदलणार. आम्ही अशी आश्वासन देत नाही. आम्ही जे बोलतो ते करतोच.”, असं राहुल गांधी म्हणाले. जातीनिहाय जनगणनाबाबत देखील त्यांनी भाष्य केलं. देशात ओबीसी किती आहे, हे कुणाला माहीत नाही. लिगली कुणाला माहीत नाही. जातीगणनेनंतर अधिकृत माहिती मिळेल, असं त्यांनी म्हटलं.
“देशात मीडिया, न्यायालय, नोकरशाहीत किती दलित, ओबीसी , आदिवासी आहेत. कोण किती बजेट सांभाळत आहे. एखाद्याला मार लागला आणि डॉक्टरांनी एक्सरे करायला सांगितलं तर आपण करतो. जातीनिहाय जनगणना हा हिंदुस्थानचा एक्सरे आहे. आपल्याला मार लागला हे माहीत असतं पण नेमकं किती लागलंय हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे नेमकं काय होतंय हे आम्हाला जाणून घ्यायचंय. त्याचा आम्ही एक्सरे करणार आहोत.”, असं राहुल गांधी म्हणाले.
“जातीनिहाय जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा आम्ही वाढवणारच. राज्य सभा आणि लोकसभेत मंजूर करून घेणार. आम्ही कायदा करणार. मोदी असो की भाजप कोणीही रोखू शकणार नाही. जातीनिहाय जनगणना सुरू झाली तर सर्व डेटा आपल्या हाती असेल.”, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं.
हेही वाचा:
श्री अंबाबाईची विजयादशमी निम्मित रथारूढ पूजा
कोल्हापुरातील वारं राहुल गांधींनी फिरवलं; टेम्पो चालकाच्या घरी स्वतः झाले ‘कुक’
तरूण बाईकवर स्टंट करत कूल बनण्याचा करत होता प्रयत्न अन्… Video