धुळ्याचे राजवर्धन आणि कोल्हापूरचे राजकारण

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील(political news) महायुतीचे अर्थात शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे अर्थात काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती हे दत्तक वारसदार आहेत, ते रक्ताचे वारसदार नाहीत असा एक मुद्दा राजकारणाचा एक भाग म्हणून पुढे आणला होता.

त्यावरून चर्चेचा फड रंगला होता. या चर्चेत एक लपलेले व्यक्तिमत्व(political news) होते आणि ते म्हणजे धुळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे. आता या कदमबांडे यांचा कोल्हापूरशी संबंध काय असा एक प्रश्न आजच्या पिढीसमोर असू शकतो, तर याच राजवर्धन कदमबांडे यांना कोल्हापूरचे नरेश तत्कालीन छत्रपती शहाजीराजे यांनी दत्तक घ्यावे यासाठी एक मोठे आंदोलन कोल्हापुरात उभे राहिले होते आणि याच कदमबांडे यांनी 1984 ची लोकसभा निवडणूक हातकणंगले मतदारसंघातून लढवली होती.

शेतकरी कामगार पक्षाच्या माजी खासदार विजयमाला राणीसाहेब यांच्या सावत्र कन्या पद्माराजे कदम बांडे यांना कोल्हापूर मुक्कामी पुत्ररत्न झाले. त्यांचेच नाव राजवर्धन. त्यांना छत्रपती शहाजी राजे महाराज यांनी दत्तक घ्यावे यासाठी कोल्हापुरात एक मोठे जन आंदोलन उभे राहिले होते. मात्र शहाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या कन्येचे चिरंजीव दिलीप सिंह यांना कोल्हापूरच्या गादीसाठी दत्तक घेतले. तेच सध्याचे श्रीमंत शाहू छत्रपती होत. तेच सध्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

राजवर्धन कदमबांडे हे धुळ्याचे सरदार. ते राजकारणात आले आणि पदार्पणातच ते धुळे शहराचे आमदार बनले. ते शरद पवार यांच्या समर्थक. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील तत्कालीन खासदार बाळासाहेब माने यांचे पक्षांतर्गत काही राजकीय विरोधक होते. माने यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला पाहिजे म्हणून काँग्रेस अंतर्गत हालचाली वाढल्या होत्या. या विरोधकांनी राजवर्धन कदमबांडे यांना कोल्हापूरच्या राजकारणात ओढले.

त्यांना शरद पवार यांनी त्यांच्या समाजवादी काँग्रेसच्या वतीने हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दिली आणि बाळासाहेब माने विरुद्ध राजवर्धन कदमबांडे असा एक रणसंग्राम हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सुरू झाला. धुळे येथून कोल्हापुरात येऊन राजवर्धन यांनी काँग्रेसच्या बाळासाहेब माने यांना चांगले आव्हान दिले होते. राजवर्धन यांच्या प्रचारात छत्रपती विजयमाला राणीसाहेब या उतरल्या होत्या.

शेतकरी कामगार पक्षाचे ही समर्थन राजवर्धन यांना मिळाले होते. ही निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. या लढतीत बाळासाहेब माने हे विजयी झाले पण त्यांचे मताधिक्य खूप घटले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी बोलताना, माझ्यासाठी ही निवडणूक घाम फोडणारी होती. पण जनतेने मला साथ दिली अशी प्रतिक्रिया दिली होती.

कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज यांचे नातू म्हणून राजवर्धन यांचा कोल्हापूरशी संबंध आहे. त्यांना दत्तक घेण्यासाठी गाजलेल्या जन आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्यासाठी म्हणून त्यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली होती.

ही लोकसभा निवडणूक राजवर्धन यांनी जिंकली असती तर कदाचित कोल्हापूर हीच त्यांची राजकीय कर्मभूमी ठरली असती. तर असा हा राजवर्धन यांचा कोल्हापूरशी रक्ताचा नातेसंबंध आणि राजकीय संबंध आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी राजवर्धन यांना अप्रत्यक्षपणे काही दिवसापूर्वी प्रचारात आणले होते.

हेही वाचा :

कोल्हापूरात रात्रीस खेळ चाले.. राजकारणाच्या डावात भंडारा, परडी, लिंबू-मिरच्या अन् भानामती

‘मविआ’विरोधात बंड कराल तर… ; माघारीसाठी विशाल पाटलांवर काँग्रेसचा प्रचंड दबाव

जोतिबा मंदिर सलग 79 तास खुले राहणार; मानाच्या सासनकाठ्या डोंगराकडे मार्गस्थ, चैत्र यात्रेला प्रारंभ