ढाका : बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये हातिर तलावात बुधवारी एका महिला टीव्ही पत्रकाराचा मृतदेह आढळून आला. ३२ वर्षीय महिला टीव्ही पत्रकार सारा रहनुमा यांचा मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सारा रहनुमा या बांगला भाषेतील टीव्ही चॅनेल गाझी टीव्हीच्या न्यूजरुम संपादक होत्या.
ढाका ट्रिब्यूनने दिलेल्या माहितीनुसार, तलावाजवळून जाणाऱ्या एका व्यक्तीला ढाकातील हातिर तलावात टीव्ही महिला पत्रकार सारा रहनुमा यांचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यानंतर त्या व्यक्तीने याबाबत पोलिसांत माहिती दिली. तात्काळ मृतदेह बाहेर काढत ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात आणण्यात आला. मात्र मंगळवारी रात्री उशिरा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
सारा रहनुमा यांनी मंगळवारी रात्री फेसबुकवर काही पोस्ट केल्या होत्या. त्यांनी पोस्ट लिहत एका फहीम फैसल नावाच्या व्यक्तीला टॅग केली होती. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलेलं, की तुझ्यासारख्या मित्राला भेटून चांगलं वाटलं. अल्लाह तुझं भलं करो. तु लवकरच तुझी स्वप्न पूर्ण करशील. आपण एकत्र मिळून अनेक योजना आखल्या होत्या, पण मला माफ कर, आपण या योजना पूर्ण करू शकलो नाही.
त्याआधी लिहिलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेलं, की मेल्यासारखं जीवन जगण्यापेक्षा मरण येणं अधिक चांगलं आहे. त्यांच्या या पोस्टमुळे आता अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. दरम्यान, असंही समोर येत आहे की सारा यांना त्यांच्या पतीपासून घटस्फोट घ्यायचा होता. त्यांचा लवकरच घटस्फोट होणार होता अशी माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून सारा यांनी मृत्यूपूर्वी केलेल्या पोस्टमुळे गूढ निर्माण झालं आहे.
मंगळवारी सकाळी सारा नेहमीप्रमाणे ऑफिसला गेल्या होत्या. मात्र त्या रात्री घरी पोहोचल्या नाहीत. त्यानंतर एका व्यक्तीला त्यांचा मृतदेह तलावात तरंगताना दिसला आणि साराच्या मृत्यूची माहिती समोर आली. काही दिवसांपूर्वी गाझी टीव्हीचे मालक गुलाम दस्तगीर गाझी यांना अटक करण्यात आली होती.
हेही वाचा:
मालवणचा राजकोट आणि राजकारण्यांचा येळकोट!
राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना आज यलो अलर्ट
“सरकार उलथवून टाकण्यासाठी एकत्र या”: उद्धव ठाकरे यांचे सरपंचांना आवाहन